Monday, December 12, 2011

५३. आरसा

एका झेन आश्रमात नितांत रमणीय सकाळी साधक गुरुची वाट पाहतायत. गुरू येतात, सर्व श्रोतृवृंदाकडे सस्मित पाहतात, शांतपणे आसनस्थ होतात. त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानापाशी लावलेला सुंदर बिलोरी आरसा बरोबर आणलाय. तो सर्वांना दाखवून ते विचारतात ‘हा आरसा कुणाचाय? ’
साधकात निरव शांतता पसरते कारण प्रश्नाचं सरळ उत्तर अपेक्षित असतं तर गुरुंनी प्रश्नच विचारला नसता. आरसा तुमचाय किंवा आश्रमाचाय ही काही त्या प्रश्नाची उत्तरं नव्हेत. कुणी उत्तर देईल म्हणून गुरू प्रतीक्षा करतात पण साधक विचारात गुंतल्यानं उत्तर येत नाही. मग गुरू हातातला आरसा सोडून देतात, तो बिलोरी आरसा जमिनीवर पडून फुटतो आणि गुरू निघून जातात.
आश्रमातला एक प्रज्ञावान साधक आश्रमाच्या खरेदीसाठी बाजारात गेलेला असतो, आल्यावर त्याला प्रसंग कळतो आणि तो म्हणतो,
‘अरेरे, इतका सुरेख बिलोरी आरसा निष्कारण फुटला’.
‘काय उत्तर द्यायला हवं होतं आम्ही? ’ साधक विचारतात.
‘तो आरसा आपल्या सर्वांचाय किंवा बिलोरी आरसा कुणाचाही नाही यापैकी कोणतंही उत्तर चाललं असतं’ प्रज्ञावान म्हणतो!
ही एक झेन पॅराबल आहे, इतक्या लहानशा गोष्टीत साऱ्या अध्यात्माची उकल आहे.
___________________________________
आरसा आपल्या स्वरूपाचं सर्वात यथार्थ वर्णन करणारं रूपक आहे.
मागे मी म्हटलं होतं की जीवनातलं सर्व दु:ख जोडलं गेल्यामुळे आहे, दुसऱ्या बाजूनं बघितलं तर आपण आरसा आहोत हा बोध झाला तर आपण जोडले जात नाही. आपण आरसा आहोत याचं विस्मरण दु:खाचं कारण आहे!
ओशोंनी ईशावास्य उपनिषदात पूर्णाची व्याख्या करताना म्हटलंय, ‘परमात्मा बिना छुए सबको सम्हाले हुवे है! ’ ही आकार धारण करून, आकारात राहून आकाराला स्पर्श न करण्याची किमया म्हणजे आरसा. परमात्मा हा शब्द त्यांनी त्या निरूपणाला साजेसा म्हणून योजलाय, पण त्याचा अर्थ कुणी देव नाही तर ही चराचर व्यापून राहिलेली अथांग शून्यता असा आहे. या शून्यातच सर्व प्रकटीकरण, चलन आणि विलय आहे आणि तरीही ते शून्य जसंच्यातसं आहे हा आरशाचा अर्थ आहे.
सजगतेचा अर्थ या आरशाचं सतत स्मरण, आपण व्यक्ती भासतोय तरी आरसा आहोत या वस्तुस्थितीचं एकसंध स्मरण.
___________________________________
काय असेल कारण स्वरूपाच्या विस्मृतीच? तर आपली सदैव स्मृतीशी असलेली संलग्नता!
क्षणोक्षणी, हरेक प्रसंगात, प्रत्येक कामासाठी आपल्याला स्मृतीचा वापर करावा लागतो. स्मृती ही आरशानं जाणलेल्या वस्तूंची, व्यक्तींची, घटनांची, अनुभवांची मेंदूत झालेली नोंद आहे. स्मृतीच्या सतत वापरामुळे आरशात सदैव कसलं तरी प्रतिबिंब पडत असतं या प्रतिबिंबाशी आपण इतके एकरूप होतो की आपल्याला आपण आरसा आहोत याचा विसर पडतो.
पुढेपुढे परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की आपण स्वत:ला प्रतिबिंबच मानायला लागतो. हे इतकं कमालीच्या वेगानं घडत की लक्षात देखील येत नाही. आरशात समोरच्या व्यक्तीचं प्रतिबिंब पडतं, स्मृती ओळख पटवते आणि सांगते ‘पत्नी’ की आपण स्वत:ला पती समजायला लागतो; एका क्षणात आरशाचं पतीत रूपांतर होतं! आपण रस्त्यानं चालतोय शेजारून एक देखणी कार जाते, स्मृती सांगते ‘मर्सिडिज’, एका क्षणात आपण निर्धन वाटायला लागतो! सकाळी पेपर वाचत असतो, इतक्या हजार कोटीचा घोटाळा, याच्या किमती भडकल्या, त्याची दरवाढ झाली, खलास! आपल्याला वाटतं आपलं कसं होणार? आरसा विसरूनच जातो की जगात काय वाटेल ते होवो आपल्याला काहीही होणार नाही!
______________________________
स्मृतीचा वापर करणं वेगळं आणि तिच्या चकव्यात सापडणं वेगळं. काय आहे स्मृतीच्या चकव्यातून मुक्त झाल्याची खूण? तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसू लागेल आणि आजूबाजूचं सुस्पष्ट ऐकू यायला लागेल. ही स्थिती क्षणभर जरी टिकली तरी तुम्हाला आरशाचा बोध होईल. हा आरसा सर्वत्र आहे आणि सर्व व्यापून आहे त्यामुळे तो आहे निश्चित पण नक्की कुठे आहे ते दाखवता येत नाही. ज्या क्षणी मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला वाटेल, किती सोपी गोष्ट होती!
सारं अध्यात्म फक्त दोनच गोष्टीत एकवटलंय, एक, या आरशाचा अनुभव आणि दोन, आपण देखील मुळात आरसाच आहोत हा बोध. या दोन्ही गोष्टी जवळजवळ समकालीन आहेत, एक उलगडा झाला की दुसरा व्हायला वेळ लागत नाही. सकाळी उठल्यावर डोळे उघडून स्वस्थ बसा, समोर पाहा आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐका, तुम्हाला एकदम शांत वाटायला लागेल. ही शांतता त्या आरशाचा अविभाज्य पैलू आहे, स्मृतीचा चलतपट थांबल्यानं येणारा तो निवांतपणा आहे. एकदा तुम्हाला हा निवांतपणा कळला की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या निवांतपणाशी एकरूप व्हा.
या निवांतपणाशी एकरूप होण्याला निसर्गदत्त महाराजांनी, ‘फक्त असा’ म्हटलंय, हे नुसतं असणं इतकं स्थैर्यप्रद आहे की तुम्ही कोणत्याही प्रसंगात त्याच्या केवळ स्मरणानं अविचल राहू शकता. जितके आपण अविचल तितकी आपली प्रसंग हाताळण्याची क्षमता जास्त.
________________________________
मला विचाराल तर प्रज्ञेचं एकमेव लक्षण म्हणजे स्मृतीचा उपयोग करताना आरशाचं स्मरण, आपण आरसा आहोत या वस्तुस्थितीच स्मरण!
____________________________
झेन गुरुनं बिलोरी आरसा हातातून सोडून दिला, आरशाचा फुटण्यातून त्याला स्वरूप जाणण्याची आर्जन्सी साधकांना सुचवायची होती, त्याला सांगायचं होतं की मी इथे आहे तोपर्यंत स्वरूप जाणून घ्या, एकदा मी गेलो की तो बोध तुम्हाला देणारा दुसरा मिळणं दुर्लभ आहे. पण स्वरूपाचा आरसा एकसंध आहे, सर्वव्यापी आहे तो फुटेल कसा? तोच जर सर्व धारण करून आहे तर तो निखळेल कसा? आणि निखळून पडणार कुठे? कारण सर्वत्र तोच तर आहे! असे आपण आहोत, आरशासारखे, जाणतोय सर्व, पण निर्लिप्त!
एकसंध, अंतर्बाह्य, यत्रतत्र सर्वत्र, अनादी, अविभाज्य, आणि अस्पर्शित. सकाळी जागे व्हाल तेव्हा आरशात पाहण्यापूर्वी नुसता आरसा पाहा तुम्हाला स्वरूपाच स्मरण होईल, रात्री निजण्यापूर्वी मंद प्रकाशात रिकामा आरसा निरखा तुम्हाला स्वरूपाचा बोध होईल, मग त्या बोधात निद्रिस्त व्हा. एक दिवस तुमचा बोध इतका सघन होईल की तुमचा आरसा शरीर झोपलंय हे दर्शवेल, तुम्ही शरीर आणि मनापासून वेगळे झालेले असाल.

संजय