Friday, May 20, 2011

४२. भोजन

विषयाला सुरुवात करण्यापूर्वी:

भोजन हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.

जे लिहिलंय तो माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यावर कोणताही विचार न करता, स्वतः प्रयोग करून न बघता काही मिनिटात प्रतिसाद देणं अयोग्य होईल. प्रयोग करून बघणार असाल तर कोणताही प्रश्न स्वागतार्ह आहे.
-----------------------------------------------------
आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले आनंद आहेत.
हे आनंद नैसर्गिक आहेत याचा अर्थ ते मिळवायला कोणत्याही प्रशिक्षणाची किंवा कौशल्य संपादनाची गरज नाही, ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत.

हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही, मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय आणि उत्सर्गाच्या आनंदाची 'आहार, विहार आणि निद्रा' ही परिमाणं आहेत. सरते शेवटी प्रणयासाठी लागणारी ऊर्जा या चारही प्रक्रियांवर अवलंबून आहे.
त्यामुळे भोजनाचा विचार हा (प्रणय वगळता) इतर तीन आनंदांशी संबंधीत आहे.
भोजनाचा आनंद दुर्लभ होण्याचं मुख्य कारण भूक लागल्यावर न जेवता वेळ झाली म्हणून जेवण्याची लावून घेतलेली सवय हे आहे. मुळात वेळ ही कल्पना आहे आणि भूक ही संवेदना आहे त्यामुळे भोजनासाठी भूक लागणं महत्त्वाचं आहे.

सर्व मानवी जीवनाची मुख्य दिशा अर्थ प्राप्ती असल्यामुळे भोजनाचा आधार भूके ऐवजी वेळ झालाय. भूक लागो न लागो सर्वांनी एकाच लंच टाइमला जेवणं यामुळे भोजन हा केवळ उपचार राहिला आहे त्यात आनंद वगैरे उरला असेल तर तो फक्त सणासुदीला!
भूकेची संवेदना प्रखर होण्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विहार आहे. काय वाटेल ते झालं तरी सकाळी सहाच्या आत उठून तीन प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत.

एक, पोटावर दाब येईल अशी योगासनं, यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वज्रासनात बसून कपाळ समोर जमिनीला टेकवणं आणि ते करत असताना हाताच्या मुठी क्रमाक्रमानं, नाभी जवळ, पोटाच्या मध्य भागी आणि मांडी वर ठेवल्या तर पोटाला उत्तम मसाज होऊन पचन क्रियेत कमालीची सुधारणा होते.

कपाळ जमिनीवर टेकवताना श्वास सोडणं आणि वर येताना श्वास घेणं या क्रिया इतक्या सहजतेनं होतात की त्यामुळे श्वसनाचा जोम वाढून श्वास पोटा पर्यंत पोहोचायला लागतो.
उत्तम श्वसन आणि पोटाची लवचीकता हे भूक, उत्सर्ग आणि सर्वांगीण शरीर स्वास्थ्य एकाच वेळी साधतात.

दोन, दोन्ही पायांची लवचीकता आणि स्नायूंचा जोम यावर शारीरिक चापल्य आणि उत्साह अवलंबून आहे त्या साठी दोन्ही हात आणि पायांच्या तळव्यांवर दहा बाय दहाच्या रूमला किमान दहा फेर्‍या मारणं (वॉकिंग ऑन फोर) हा उत्तम व्यायाम आहे.
तीन, सकाळी चहा घेण्या पूर्वी अंतरा अंतरानं किमान तीन ग्लास (सहाशे मिली) पाणी पिणं शरीराचं डिटॉक्सीकेशन करतं.

एकदा शरीरात पुरेशी लवचीकता आली की टेकडी चढणं किंवा टेबल टेनिस सारखा खेळ खेळणं ही संपूर्ण दिवसाची अत्यंत विधायक सुरुवात आहे.
-------------------------------------------
उत्तम उत्सर्गा साठी सर्वात महत्त्वाची पण संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट म्हणजे उत्छ्वासाचा जोम आहे. या विषयावर काढे आणि चूर्ण यांचं वर्णन करणारं अत्यंत निर्बुद्ध आणि दिशाभूल करणारं लेखन प्रकाशित झालंय आणि त्यावर तितक्याच सुमार दर्जाचे प्रतिसाद दिले गेलेत पण उत्सर्गाचं खरं रहस्य रेचकात नाही तर उत्छ्वासात आहे.

उत्तम उत्छ्वास तीन गोष्टी साधतो : एक, पोटाच्या स्नायूंची लवचीकता, दोन, जोमदार श्वासाची निर्मिती आणि तीन, अपरिग्रह! अपरिग्रह म्हणजे (उत्सर्गाच्या संदर्भात) शरीरावर असलेली आपली पकड सोडण्याची (किंवा ढिली करण्याची) चित्तदशा.
अपरिग्रह ही मनोदशा आपला मूड सकाळ पासूनच लाइट ठेवते आणि लाइट मूड उत्सर्गाच्या आनंदाची प्रचिती देतो.

जोमदार उत्छ्वासामुळे साधलेला अपरिग्रह मनातला मत्सर (जेलसी) हा दोष दूर करतो, मनाला विधायक आणि उमदं बनवतो.
----------------------------------------
उत्तम भूकेचं एकमेव लक्षण म्हणजे काय खावं ते आतून उमगणं आहे. भूकच तुम्हाला शरीराला काय हवंय ते सांगते. ही संवेदना रस स्वरूप असते म्हणजे : आंबट, गोड, तिखट या तीन प्रमुख आणि तुरट, खारट आणि कडू या दुय्यम रसांपैकी नक्की कोणता रस किती प्रमाणात सेवन करावा हे तुम्हाला कळतं.

सुरुवाती सुरुवातीला जरी आवेगानं जे समोर येईल ते खावं असं वाटलं तरी सकाळी लवकर उठण्याचा दिनक्रम जसजसा नियमित होत जाईल तशी रस संवेदना प्रगल्भ होत जाईल आणि नेमका आहार घेण्या कडे कल होत जाईल.

जेवण हे नेहमी रस परिपोष करणारं हवं. जेवण रस परिपोषक आहे की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जेवताना साधलेली तन्मयता (तुम्ही जेवताना बोलूच शकत नाही), ते सुरू राहावं अशी चित्तदशा आणि नंतर येणारी तृप्ती आणि कृतज्ञता!

भूकेनं जेवताना येणारा एक अफलातून अनुभव म्हणजे जेवण किती ही रसपूर्ण असलं तरी केव्हा थांबावं याची होणारी जाणीव. ही जाणीव एका थ्रेशोल्ड पॉंईंट सारखी असते, तुम्ही तिच्या कडे सहज दुर्लक्ष करू शकता पण एकदा त्या पॉंईंटला थांबायची मजा कळली की तुम्हाला कोणतंही डाएट करावं लागत नाही. ती जाणीव हाच सर्वोत्तम डाएट पॉंईंट आहे.
------------------------------------------------
संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे त्यामुळे उत्तम भोजन, उत्तम शरीर स्वास्थ्य, उत्तम निद्रा, उत्तम उत्सर्ग आणि उत्तम ऊर्जा अशी साखळी आहे.

आयुर्वेदाचं सूत्रंच असं आहे की योग्य आहार कोणताही शारीरिक दोष दूर करतो त्यामुळे केव्हा खाऊ नये (उपवास) आणि नक्की कोणता आणि किती आहार घ्यावा हे एकदा साधलं की कोणत्याही औषधाची जरूर नाही, अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे.
--------------------------------------------------
माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते', तुम्हाला तो पदार्थ, ती रेसिपी 'दिसते'.

मला सुरुवातीला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण मग नंतर लक्षात आलं की ही निसर्गाची अंतर्निहित योजनाच आहे. माणूस सोडला तर सर्व सजीव सृष्टी आपलं अन्न याच पद्धतीनं शोधते कारण निसर्गाशी एकरूप असल्यानं त्यांना एकाच वेळी अन्न आणि ते कुठे आहे ती दिशा यांचा बोध होतो.

प्रगल्भ भुकेचा अत्यंत सहज आणि आपसूकपणे येणारा दुसरा पैलू म्हणजे शरीराला आवश्यक असणार्‍या अन्नाची कमीत कमी प्रयास आणि वेळेत होणारी उपलब्धता! याचं ही कारण तितकंच नैसर्गिक आहे, निसर्गच भूक निर्माण करत असल्यानं तिच्या तृप्तीची योजना निसर्ग स्वयेच करत असतो.

भूक, भोजन आणि उत्सर्ग या तीन्ही प्रक्रिया निसर्गाच्या अंगभूत येजनेचा (कॉस्मिक इंटेलिजन्स) भाग असल्यामुळे एकदा भूक हे परिमाण साधलं की आपण निसर्गाच्या बुद्धीमत्तेशी संलग्न होतो आणि मग इतर दोन प्रक्रिया सहजपणे घडतात.

भोजनाचा, इतर सजीव सृष्टीला जाणीवेची प्रगल्भता नसल्यामुळे न गवसू शकणारा, पण मानवाला आनंदित करणारा तिसरा पैलू म्हणजे कृतज्ञता आहे. भूक, तिच्या मुळे होणारं अन्नाचं दर्शन ( द व्हिज्युअल साईट ऑफ फूड), रस परिपोष करणारं भोजन आणि त्यातून निर्माण होणारी तृप्ती यानी आपण इतके भारून जातो की अन्नाला ब्रह्म का म्हटलंय ते कळतं!

भोजन केवळ एक नित्यक्रम न राहता उत्सव होतं आणि रोजच्या जगण्याला आनंदाचं एक नवं परिमाण उपलब्ध होतं.