Sunday, June 26, 2011

२७. पैसा

श्वासात अडकला पैसा,
पैशात अडकला श्वास;
श्वासाने सार्थक पैसा की
पैशाने चाले श्वास?

स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारला आहे. स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोमन धारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.

मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे मी लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर जे लिहिलंय त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा.

तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्याकडे आचरणात आणता येईल असं उत्तर आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. म्हणजे पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळू शकेल पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.

तर पहिली गोष्ट, स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे एक कारण आहे ते असं की प्रत्येकानं स्वतःकडे असलेल्या पैशाचं ‘रेव्हेन्यू आणि कॅपिटल’ असं विभाजन केलं आहे. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!

कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका ‘भांडवली पैसा’ हवा की त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्म असंच चालू राहील!

मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.

हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार घटना आपसूक घडतात त्या अशा:

एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा ‘वापरणं’ म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.

दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.

तीन, तुमच्या वागण्यात एक बिनधास्तपणा सहजच येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात सक्रिय न होऊ देता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!

चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात यायला लागतं. पैसा ही कल्पना आहे, आपण सार्थक आहोत, आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.

पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.

इथे मला अजून एक गैरसमज दूर करावा असं वाटतं, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झाली आहे. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
हा गैरसमज दूर झाल्यावर पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!

मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!

एक दिवस तुम्ही ही माझ्यासारखी जीवनाची प्रायॉरिटी पूर्णपणे बदलू शकाल, तीस सप्टेंबर ही इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची अंतिम तारीख असताना जे कोणताही सी ए करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल, केवळ मजा वाटते म्हणून इथे लिहू शकाल!

माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी त्याला म्हणालो अरे असं जगून बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भीतीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

Wednesday, June 22, 2011

४५. सिनेमा, सिनेमातला सिनेमा आणि आपण

प्रथम ‘सिनेमातला सिनेमा’ काय चीज आहे ते पाहू.

रात्रंदिवस आपल्या डोळ्यासमोर असंख्य चित्र सरकतायत आणि मनात संवाद उमटतायत, आपल्याला त्यांची जाणीव इतकी न्यून आहे की असं चाललंय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. अर्थात सगळ्यांचीच अशी स्थिती असल्यानं हा अहोरात्र चाललेला सिनेमा आपल्या जीवनाचा भागच झालंय म्हणजे या सिनेमाशिवाय सभोवतालच्या जगाशी आपला प्रत्यक्ष संबंध येऊ शकेल याची आपल्याला कल्पना देखील नाहीये. हा सिनेमा जगण्याचा इतका अविभाज्य भाग झालाय की हा सिनेमा बघत बघतच आपण बाकी आयुष्य जगतो.

तुम्हाला खरं वाटणार नाही पण रात्री आपल्याला दिसणारी स्वप्न हा त्या सिनेमाचा केवळ अंधार व्यवस्थित झाल्यानं होणारा बोध आहे म्हणजे सिनेमा सकाळी सुरूच असतो पण पडदे उघडल्यावर थिएटरमध्ये जसा पिक्चर फिक्का दिसायला लागतो तसा तो एकदम तीव्रतेनं जाणवत नाही एवढंच.

थोडक्यात आपल्याला सभोवतालच्या जगाचं दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध स्वाद यांनी होणारं ज्ञान, हा सिनेमा बघताना जेवढी काही उसंत मिळते त्यातून झालेलं असतं. या सिनेमानं आपलं लक्ष संपूर्ण वेधून घेतलंय हे लक्षात येणं, हा बोध तो सिनेमा बंद करणारी पहिली कृती आहे.

हा सिनेमा म्हणजे मन आहे आणि सभोवतालचं जग हा खरा सिनेमा आहे, जोपर्यंत हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद होत नाही तोपर्यंत जग खरं वाटतं, आणि एकदा हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद झाला की मग जग निव्वळ सिनेमा होतं!

__________________________________________

आता सिनेमा म्हणजे काय ते बघू.

कोणताही सिनेमा बघणाऱ्यावर किती परिणाम करणार हे बघणारा त्यातल्या संकल्पना किती खऱ्या मानतो यावर अवलंबून असतं म्हणजे कुणीही कुणाचा प्रियकर किंवा प्रेयसी, आई किंवा वडील नसतं, कुणीही विलन नसतं पण दिग्दर्शक अशी काही मांडणी करतो आणि सिनेमात काम करणारी मंडळी असा काही प्रभावी अभिनय करतात की आपल्याला ते सगळं खरंच वाटायला लागतं! आपण त्या सिनेमात संपूर्ण गुंतून जातो, कुणीही कुणाचं काहीही नसताना आपल्याला पात्रांचा विरह दुखवून जातो, खलनायकाची चीड येते, आईचं ममत्व भावनिक करतं आणि बापाचा विरोध अनाठायी वाटायला लागतो, दुष्टांचं निर्दालन व्हावं आणि काहीही करून प्रेमिकांचं मिलन व्हावं आणि सुखांत शेवट व्हावा असं वाटायला लागतं.

तुम्हाला मी जरी उगीच स्टोरी लावतोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमची टिवी सिरियल्स मधली इनवॉल्वमेंट बघा, उत्तम टिआरपी असलेल्या सिरियल्सचं यश पाहा आणि तरीही नाही पटलं तर क्रिकेटचे सामने आणि त्यात प्रचंड जनसमुदायाचे असलेले आंतरिक लागेबांधे पाहा, वास्तविक बोल्ड, कॅच, एलबीडब्ल्यू, स्कोर सगळ्या मानवी कल्पना आहेत पण मॅच चालू असताना जरा काही व्यत्यय आला किंवा तुमचा भरवशाचा फलंदाज आऊट झाला तर आपली होणारी अस्वस्थता पाहा म्हणजे मी काय म्हणतोय ते समजेल.

तर थोडक्यात काय की प्रेक्षकाचं सिनेमा किंवा समोरचं दृश्य खरं मानणं त्याच्यावर किती परिणाम करणार हे ठरवतं. तुम्हाला एकदा तुमची इनवॉल्वमेंट तुमच्या धारणेवर अवलंबून आहे हे समजलं की परिणाम शून्यता यायला लागते, प्रसंग खरा न वाटता सिनेमा सारखा वाटायला लागतो, मग तो सिनेमा असो की क्रिकेट असो की वास्तविक आयुष्यातला प्रसंग असो!
________________________________

सिनेमाला दृक आणि श्राव्य असे दोन परिणाम आहेत आणि याच दोन संवेदनांनी आपल्या जाणीवेचा नव्वद टक्के भाग व्यापला आहे, बाकीच्या तीन संवेदना (स्पर्श, गंध आणि स्वाद) फक्त दहा टक्के आहेत.

आता हे समजून घेणं एकदम महत्त्वाचं आहे, कोणत्याही जाणीवेचा उलगडा होण्यासाठी प्रथम जाणीव त्या संवेदनेकडे उन्मुख व्हावी लागते आणि जाणीव उन्मुख होता क्षणी आपल्या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या दृष्टी आणि श्रवण या दोन फॅकल्टीजनी आपण ती डिकोड करायचा प्रयत्न करतो. त्यातही, म्हणजे नव्वद टक्क्यातल्या दृकश्राव्य आकलनात, दृक भाग जवळजवळ पंचाहत्तर टक्के आहे आणि श्राव्य भाग पंधरा टक्के यामुळेच गायक आणि वादक दुर्मिळ आहेत कारण त्यांची श्राव्य संवेदना इतरांपेक्षा जास्त आहे.

हे लिहिण्याचं कारण असं की जर तुम्हाला दृकश्राव्य परिणामाची तीव्रता कमी करायची असेल तर इतर तीन संवेदना हळूहळू तीव्र केल्या पाहिजेत आणि त्या तीव्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या वापरायला हव्यात.

तुम्ही कधी दखल घेऊन बघा, आइसक्रीम खाताना आपल्याला पहिल्या स्वादाला एकदम ‘अहाहा! ’ वाटतं मग पुन्हा आपलं लक्ष संवाद किंवा सभोवतालच्या दृश्याकडे वेधलं जातं आणि मग एकदम आइसक्रीम संपल्यावरच लक्षात येतं, अरे संपलं!

स्पर्शाची संवेदना तर इतकी पुसट झालीये की फक्त तारुण्यातच काय तो स्पर्शाचा मोह असतो आणि मग नंतर सगळं इतकं रूटीन होतं की स्पर्शाप्रती आपण जवळजवळ बधिरच होतो. अंघोळ करताना पहिला पाण्याचा स्पर्श झाला की पुढे ‘सिनेमातला सिनेमा’ असा काही अवधान वेधून घेतो की बाकीचं सगळं यंत्रवत करून आपण एकदम रेडी, चलो नेक्स्ट आयटम!

श्वासाकडे तर निव्वळ दुर्लक्षच आहे आणि त्यामुळे तो इतका उथळ झालाय की गंधाची जादू अभावानंच लक्षात येते.

तर सांगायचं म्हणजे आपण स्पर्श, गंध आणि स्वाद या संवेदना जितक्या प्रगल्भ करू तेवढ्या सर्व संवेदना बॅलन्स होतील आणि मग अनायासे दृकश्राव्याचा परिणामही संतुलित होईल.

बोधाच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक प्रसंगात स्वस्मरण कोणत्याही प्रसंगाचा आपल्यावर होणारा परिणाम न्यून करतं कारण आपण जाणीवेचे जाणते आहोत, शुद्ध जाणीव आहोत म्हणजे इंद्रियगम्य जाणीवेचे जाणते आहोत, निराकारावर कसलाही परिणाम होत नाही!
________________________________________

दृष्टीत आणि श्रवणात सुस्पष्टता (क्लॅरिटी) आणणं मनाचा किंवा ‘सिनेमातल्या सिनेमाचा’ परिणाम शून्य करत जातं.

इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करतो, मनाचा प्रोजेक्टर नेहमी जे नाही ते दाखवत असतो, म्हणजे तुम्ही घरी आहात पण तुम्हाला ऑफिसची दृश्य आणि संवाद दिसत आणि ऐकू येत असतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या समोर घरचे प्रसंग चालू असतात.

साधनेच्या दृष्टीनं तुम्हाला दृष्टी आणि श्रवणाच्या मेंदूत गेलेल्या लिंक्स क्लिअर करायला हव्यात.

यासाठी सर्वोत्तम साधना म्हणजे निवांत वेळ मिळेल तेव्हा शांत पाठ टेकून बसणं आणि डोळे मिटून आतून मेंदूकडे बघणं आणि असं करत असताना आजूबाजूला जे चालू आहे ते अत्यंत अवधानपूर्वक ऐकणं. ही दुहेरी साधना आहे आणि ती मेंदूकडे डोळे आणि कानामार्फत येणाऱ्या दृकश्राव्य लिंक्स क्लिअर करत नेते.

या साधनेच्या प्रगतीचा निकष म्हणजे शरीर बसलंय आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येतंय हा अनुभव तुम्हाला येईल आणि मनाचा चलतपट थांबल्यानं शांत वाटायला लागेल. तुम्ही जसजसे या साधनेत प्रगत होत जाल तसे डोळे उघडे असताना तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसेल आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येईल, तुम्ही सदैव वर्तमानात राहाल, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्यकाळाची भीती तुम्हाला सचिंत करणार नाही. तुम्ही एकदम फोकस्ड होत जाल.
__________________________________

आता सिनेमाची संकल्पना माणसाला जीवनावरून सुचलीये म्हणजे जे वास्तविकात घडतंय ते कथा म्हणून वेगवेगळ्या प्रसंगातून आणि आकर्षक मांडणीतून दृकश्राव्य माध्यमातून दाखवणं म्हणजे सिनेमा.

जसा सिनेमाचा परिणाम बघणाऱ्याच्या मान्यतेवर आहे तसाच आयुष्यातल्या घटनांचा परिणामही आपल्या धारणेच्या सघनतेवर आहे. आपण स्वत:ला भारतीय मानलं तर इतर देशांचा धोका वाटतो, आपण स्वत:ला स्त्री मानलं तर जगात पुरुषी वर्चस्व वाटतं किंवा पुरुष मानलं तर स्त्रिया अनाकलनीय वाटतात, आपली स्वत:विषयीची मान्यता किंवा धारणा आपल्यावर प्रसंगाचा काय परिणाम होणार ते ठरवते.

जर आपण स्वत:विषयी कोणतीही धारणा ठेवली नाही तर आपण शुद्ध जाणीव होतो, खरं तर आपण शुद्ध जाणीवच आहोत हे आपल्या लक्षात येतं. मग प्रसंग फक्त घडतो आणि आपल्याला कळतो, आपण मात्र जसेच्या तसे राहतो अगदी सिनेमा बघून त्याची मजा घ्यावी तसे. सिनेमाची मजा निश्चित येते पण त्याचा आपल्यावर परिणाम मात्र काहीही होत नाही.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

Wednesday, June 08, 2011

साधक, साधना आणि साध्य! (दोन)

साधना निवडीचा पर्याय हा व्यक्तीगत चॉइस आहे आणि ते तुमचं स्वातंत्र्य आहे. एखाद्या गायकानी अभिव्यक्तीसाठी एखादं घराणं निवडावं किंवा एखाद्या चित्रकारानी स्वत:ला एक्सप्रेस करायला एखादी स्टाईल निवडावी तशी ती हृद्य प्रक्रिया आहे.
नामस्मरण या सकृद्दर्शनी सोप्या वाटणार्‍या प्रक्रिये विषयी इथे लिहावंस वाटतंय.
____________________________________

आपलं मन ही रेकॉर्डिंग आणि आयडेंटिफिकेशन करणारी प्रोसेस आहे, म्हणजे मनामुळे आपण विविध घटना, वस्तु, प्रक्रिया, व्यक्ती वगैरे लक्षात ठेवून त्यांचं पुन्हा रिट्रायवल करू शकतो. ही प्रोसेस जगायला अत्यंत उपयोगी आहे आणि मानवाकडे सर्वात प्रगल्भ मन किंवा रेकॉर्डिंग सिस्टम आहे.

पण मानवी मन अनकंट्रोल्ड झालंय हा मानवी जीवनातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मनाची प्रक्रिया अनैच्छिक झालीये. तुम्हाला हवं असो की नसो ती प्रक्रिया प्रत्येक स्टिम्युलंटनी असंख्य स्मृती किंवा रेकॉर्डिंग्ज सुरू करते आणि ती प्रक्रिया इतकी अनिर्बंध झालीये की तिनी सर्व जीवनावर नियंत्रण मिळवलंय.

उदाहरणार्थ, घड्याळ दिसायचा आवकाश की किती वाजलेत, मग आता काय करायला हवं, बापरे! इतका वेळ गेला किंवा अजून झोप कशी आली नाही, आता उठायला हवं, आता जेवायला हवं किंवा तत्सम विचार आणि लगोलग शारिरिक हालचाली सुरु होतात. वेळ हा भास आहे हे आपण विसरुनच जातो आणि जाणिवेकडे दुर्लक्ष करून, म्हणजे शारिरिक हालचाल (विहार किंवा व्यायाम) करावा अशी सुक्ष्म जाणिव होत असून देखील आपण जेवायला बसतो!

आध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं हे प्रार्थमिक मानलं गेलंय. आता बोधाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर मनाचं नियंत्रण हे विविध धारणांमुळे आहे, म्हणजे वेळ वास्तव आहे या धारणेमुळे जाणिवेकडे दुर्लक्ष होऊन किती वाजले हे मानसिक इंटरप्रिटेशन आपण काय करणार याचं निर्णायक होतं.

जात, पत्रिका, कुंडली या मानसिक कल्पनांमुळे विवाह, व्यक्तीची पारख, पारस्पारिक अनुकूलता आणि एकमेकातलं आकर्षण या अत्यंत महत्वाच्या गोष्टीं ऐवजी भलत्याच निकषांना प्राधान्य देऊन होतं आणि मग सहजीवनातली मजाच संपून जाते.
आता बोध असेल तर विवाहा सारखा दूरगामी परिणाम करणारा निर्णय संपूर्ण व्यक्तीगत जवाबदारी घेऊन आणि सहजीवनाला पूरक असणा‍र्‍या गोष्टी लक्षात घेऊन घेता येतो.

अशा तर्‍हेनी मनाच्या अनिर्बंध प्रक्रियेतून सुटका आपल्याला वस्तुनिष्ठ बनवते, आपण वर्तमानात राहून अत्यंत समर्थपणे प्रसंग किंवा परिस्थिती हाताळू शकतो म्हणून आध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं आगत्याचं मानलं गेलंय. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे आपण ‘दॅट वीच इज’ या फॅक्च्युअल स्टेटला येऊ शकतो किंवा ओशो म्हणतात तसे ‘हिअर अ‍ॅंड नाऊ’ मधे येऊ शकतो.
_____________________________________

तर या मानसिक बंधनातून किंवा अनैच्छिक मानसिक प्रक्रियेतून मुक्ती साठी मन एकाच दिशेनी नेणं, त्याचं इंटररिलेटेड कोऑर्डिनेशन असलेल्या स्मृती प्रवाहातून स्वैर भ्रमण थांबवणं यासाठी साधकाला नामस्मरण ही प्रक्रिया सांगीतली जाते. म्हणजे तुमचं मन एकच प्रक्रिया ऐच्छिकपणे प्रदीर्घ कालावधीसाठी करु शकेल अशी अपेक्षा असते.

पण नामस्मरण ही इतकी ढोबळ प्रक्रिया आहे की गाडी चालवतांना जसं आपण एकीकडे गाडी चालवतोय आणि दुसरीकडे विचार करतोयं असं लिलया करु शकतो तशी परिस्थिती सहज येते आणि त्या प्रक्रियेचा काहीही उपयोग होत नाही.

त्यात एखाद्यानी फारच मनावर घेऊन एकाजागी बसून अत्यंत परिश्रमपूर्वक नामसाधना प्रलंबीत काळ केली तर पुनरुक्ती आणि मोनोटोनीनी त्याचा मेंदू बधीर होऊन त्याला वेगवेगळे भास व्हायला लागतात. म्हणजे ‘दॅट वीच इज’ या फॅक्चुअल रियालिटीला येण्या ऐवजी तो एका भ्रामक विश्वात जायला लागतो, त्याला जे नाही ते दिसायला लागतं आणि ऐकू यायला लागतं!

त्यामुळे साधना निवडतांना सजग रहाणं अनिवार्य आहे.
______________________________________

बोधाच्या दृष्टीनी बघीतलं तर स्पेस किंवा शून्य हे सर्वव्यापी आहे आणि ती निर्विवाद वस्तुस्थिती आहे. स्पेस नाही अशी कोणतीही जागा नाही किंवा प्रत्येक आकाराच्या आत-बाहेर स्पेस आहेच.

ही स्पेस किंवा शून्य अंतीम आहे कारण आकारांचं प्रकटीकरण, अस्तित्व आणि विघटन यानी ती अनाबाधित रहाते.

सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि मग ती स्पेस किंवा तो निराकर हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे हे जाणणं आहे.

बोधाच्या दृष्टीनी ही स्पेस इतकी शाश्वत आहे की आपण जरी तिला आपलं स्वरूप मानत नसलो तरी त्यामुळे तिच्या शाश्वततेवर कोणताही परिणाम होत नाही आणि अर्थात ही गोष्ट उघड आहे.

त्यामुळे बोध किंवा सांख्ययोग म्हणतो की या स्पेसची निव्वळ दखल,केवळ स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल! आपणही शाश्वत आहोत याची प्रचिती देईल.

कोणत्याही प्रसंगात किंवा परिस्थितीत किंवा अस्वस्थ मन:स्थितीत केवळ या निराकाराच्या असण्याचं स्मरण किंवा स्वत:चं स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल, मानसिक उहापोहातून मुक्त करेल कारण सरते शेवटी तुम्ही आणि स्पेस एकच आहात!

संजय

जे जगतो तेच लिहीतो

सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

Friday, June 03, 2011

साधक, साधना आणि साध्य!

प्रथम आध्यात्मिक जगात साध्य काय आहे ते पाहू.
आध्यात्मिक अर्थानं साध्य म्हणजे स्वत:ची स्वत:शी भेट. मीटिंग वनसेल्फ!

अध्यात्म हा सर्वात मोठा पॅराडॉक्स आहे, पॅराडॉक्स म्हणजे संभ्रम नाही; पॅराडॉक्स म्हणजे विनोद कारण भेट व्हायला आपण स्वत:पासून दुरावलेलोच नाही!

पण हे सुरुवातीला लक्षात येत नाही, म्हणजे आपण जर स्वत:पासून दुरावलेलो नाही तर मग भेट कसली? असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणू शकत नाही कारण तो तुमचा अनुभव नाही त्यामुळे हा पॅराडॉक्स आहे हे कळण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रिया काय आहे ते समजावून घ्यावंच लागतं.

काय उपयोग आहे या साध्याचा? तर, एकदा आपण स्वत:ला भेटलो की सगळे प्रश्न संपले, अक्षरशः एका क्षणात सगळं जीवन आल्हाददायक होतं. जे जीवन उगीच ओढूनताणून जगत होतो ते स्वप्नवत वाटायला लागतं, नव्हे स्वप्नवत होतं! जे खरं वाटत होतं, सार्थ वाटत होतं, ज्यात बदल करावासा वाटत होता आणि बदल झाला की सुखाला पारावर राहणार नव्हता ते सगळं पिक्चर सारखं वाटायला लागतं. घडतंय सगळं, कळतंय सगळं पण होत काही नाही अशी आपली स्थिती होते. वी रिमेन अनफेक्टेड बाय द इव्हेंटस ऑर द सिट्यूएशन!

_________________________________________

मुळात आध्यात्मिक साधनेचा हेतू एक भ्रम दूर करणं आहे, तो भ्रम इतकाच आहे की निराकार स्वत:ला आकार समजतोय, किंवा निराकाराला आपण आकार आहोत असा भास होतोय.

आता, भास कितीही सघन असला तरी त्यामुळे निराकाराचं आकारात रूपांतर होत नाही आणि त्यामुळे कोणतीही साधना आपल्याला स्वरूप उपलब्ध करून देऊ शकत नाही!

साधनेनं स्वरूप बदलू शकत नाही त्यामुळे प्राप्तही होऊ शकत नाही.

थोडक्यात, आपण निराकारच होतो, निराकारच आहोत आणि निराकारच असू शकतो या बोधाप्रत आणण्याचं काम साधना करते.

किंवा, द अदर वे, साधना आपल्याला आपण आकार आहोत हा वाटणारा भास दूर करते.

हे लिहिण्याचं कारण एवढंच की साधना निवडताना फार सजग असावं लागतं, जर साधनेचा हेतू आणि साध्य लक्षात घेतलं नाही तर साधना, भ्रम दूर करण्या ऐवजी सघन करत जाते!
____________________________________

साधनेची निवड हा अध्यात्मातला अत्यंत महत्त्वाचा भाग कसा आहे ते पाहू.

वेळ हा आपल्याला क्षणोक्षणी होणारा भास आहे कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे रात्र झाली किंवा दिवस उजाडला असं वाटतं. ही गोष्ट सर्वज्ञात आहे पण वेळ हा भास आहे हे आपण मंजूर करत नाही.

आता वेळ हा भास आहे हा उलगडा होण्यासाठी सूर्य सदैव प्रकाशमान आहे या गोष्टीचं स्मरण पुरेसं आहे. या उलगड्यानी वेळेचं मनावरचं दडपण शून्य होतं. अध्यात्मात सांगितलेली समयशून्यता सहज उपलब्ध होते, जीवनातली घाईगडबड एकदम कमी होते.
तुमच्या लक्षात येईल की कालरहितता साधण्यासाठी कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही, केवळ, अस्तित्वात वेळ नाही किंवा वेळ हा भास आहे हे स्मरण पुरेसं आहे.

या बोधाला आणखी एक पैलू आहे, ज्याला वेळ हा भास आहे हा बोध होतो तो स्वत:ही कालातीत होतो कारण ज्याला वेळ खरी वाटते तो स्वत:लाही कालबद्ध समजत असतो!

आता आपण कालरहित आहोत हे समजण्यासाठी तुम्ही कोणतीही साधना केलीत तर तुम्ही वेळेशी झुंजत राहाल आणि मग या आयुष्यात तुम्हाला तो बोध होणं शक्य नाही कारण वेळ होतच राहणार! फक्त वेळ हा भास आहे हा बोध होऊ शकतो, वेळ नाहीशी होत नाही.

मला एकानं अत्यंत निर्बुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली होती तेव्हा मी म्हटलं होतं की अशा प्रश्नांना उत्तरं देण्यात माझा वेळ जातो. यावर त्यानं लिहिलं की वेळ हा भास आहे तर मग वेळ जातो असं तुम्ही कसं म्हणता?

आता वेळ जातो असं बोली भाषेत म्हणतात, खरं तर त्रास होतो असं म्हणायला हवं, पण त्रास होतो असं म्हटलं की सत्य गवसलेल्याला त्रास कसा होईल? हा पुन्हा प्रश्न!

तर सांगायची गोष्ट म्हणजे वेळ हा भास आहे हे उघड आहे आणि व्यक्त जगात वेळ सार्थ आहे हे ही तितकंच खरंय पण आपण कालबद्ध नाही हा बोध तुम्हाला वेळ उत्तम मॅनेज करायला मदत करतो, हा त्या बोधाचा लाभ आहे, तुम्हाला वेळेचं टेन्शन येत नाही!

मुद्दा असा आहे की जीवनातलं वेळेचं प्रचंड दडपण घालवण्यासाठी तुम्ही साधना किंवा टाइम मॅनेजमेंट सारख्या उपाय योजना सुरू केल्यात तर वेळेचं दडपण जाणं तर दूरच पण वेळ अधिकाधिक खरी वाटायला लागेल!
___________________________________

आता मूळ भ्रमाकडे किंवा भासाकडे वळू.

निराकाराला आपण आकार आहोत असा होणारा भास म्हणजे अहंकार! हा अहंकार दूर करण्यासाठी अनेक क्लिष्ट आणि जाचक प्रक्रिया निर्माण झाल्यायेत. उदाहरण म्हणून आपण परिक्रमा ही अत्यंत खडतर साधन बघू.

निराकार निश्चल आहे, तो कुठेही जात येत नाही. या निश्चलाचं वर्णन अष्टावक्रानी त्याच्या संहितेत, ‘न क्वचित गंता न आगंता’ असं केलंय. आता या निश्चलाला भेटण्यासाठी आपण चालायला सुरुवात करणं हीच प्रार्थमिक चूक आहे.

या प्रार्थमिक चुकीतून पुढेपुढे किती गोंधळ होत जातो ते बघण्या सारखं आहे. पहिली गोष्ट, परिक्रमा ही अनेक वर्ष किंवा महिने चालणारी साधना आहे त्यामुळे परिक्रमेची सुरुवात आणि शेवट कालाचा भास सघन करते, म्हणजे सत्य किंवा स्वरूप जे आता, या क्षणी उपलब्ध आहे ते काही वर्षांनी किंवा महिन्यांनी, परिक्रमेची सांगता झाल्यावर मिळेल असा भ्रम निर्माण होतो.

आता जे परिक्रमेची सुरुवात होण्यापूर्वीच उपलब्ध आहे ते परिक्रमेची सांगता झाल्यावर कसं उपलब्ध होईल? म्हणजे ते परिक्रमेच्या सांगतेला उपलब्ध नाहीये असं नाही पण ज्यानं ते परिक्रमे नंतर उपलब्ध होईल या धारणेनं परिक्रमा सुरू केलीये त्याला ते सांगते नंतरही गवसणार नाही कारण शोध निश्चलाचा आहे हेच त्याच्या लक्षात आलेलं नाही! किंवा शोध निश्चलाचा आहे हे लक्षात न आल्यानंच तर त्यानं परिक्रमा सुरू केलीय!

पुढेपुढे तर आणखी मजा आहे. निश्चल, किंवा निराकार,किंवा खुद्द आपण अजिबात हालत नाही, ज्यानं परिक्रमा केली जाते ते शरीर असतं पण परिक्रमेचा ध्यासच इतका प्रगाढ असतो की ती करणाऱ्याला आपणच परिक्रमा केली असं वाटायला लागतं!
आता आजूबाजूचं पब्लिक पण इतकं भारी असतं की अश्या परिक्रमा करणाऱ्याला ते
असं काही मानायला लागतं की परिक्रमा करणारा पुन्हा परिक्रमेचं अनुष्ठान करायला निघतो!

आता खरंतर परिक्रमा न करू शकणाऱ्यांना आपण ती करू शकत नाही याची खंत असते आणि म्हणून ते परिक्रमीला मानतात आणि परिक्रमीला निश्चल न गवसल्यानं तो ही नम्रपणे आपण अजून साधक असल्याचं त्यांना सांगतो पण त्यांना वाटतं याला म्हणतात निरहंकारिता!

वास्तविकात अहंकार दूर होणं म्हणजे आपण आकार आहोत हा भास दूर होणं आहे पण परिक्रमीची विनम्रता हेच अहंकार दूर झाल्याचं लक्षण इतरांनी ठरवून टाकल्यानं परिक्रमी आणखीच विनम्र होतो! ही प्रक्रिया मग परिक्रमा न करू शकणाऱ्यांची खंत आणि परिक्रमीची विनम्रता यामुळे अव्याहत चालू राहते!

यात पुन्हा परिक्रमीच्या अनुभवांची भर पडते, ते एक आणखी बघण्या सारखं आहे!

श्री निसर्गदत्त महाराजांनी म्हटलंय की ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे’ आता ही गोष्ट एकदम अफलातून आहे. सगळे अनुभव जरी आपल्याला येत असले तरी आपण, किंवा निराकार, किंवा आपलं स्वरूप त्या अनुभवांनी अनाबाधित राहतं. अनुभव स्मृतीत राहतो पण प्रत्येक अनुभवानंतर आपण जसेच्या तसे राहतो.

हे प्रत्येक साधकाला लक्षात घेण्यासारखं आहे कारण अनुभव कोणताही असो तो आध्यात्मिक नसतो, अध्यात्म हा अनुभवणाऱ्याचा शोध आहे, अनुभवाचा नाही कारण अनुभव अनेक आहेत पण अनुभवणारा एक आहे!यामुळे सत्यप्राप्ती हा अनुभव नाही किंवा तो क्षणिक अनुभवासारखा वाटला तरी तो उलगडा आहे, अनुभव नाही!

आता परिक्रमे सारख्या खडतर साधनेत काय वाट्टेल ते अनुभव येतात आणि परिक्रमीचे अनुभव हीच त्याच्या साधनेची फलश्रुती असते. हे अनुभव मग इतरांना गूढ आणि आध्यात्मिक वाटायला लागतात आणि ते पुन्हा त्या अनुभवांच्या जोरावर परिक्रमीला श्रेष्ठत्व बहाल करतात. परिक्रमी पुन्हा विनम्र होतो कारण त्याचं लक्ष अनुभवांवर असल्यामुळे त्यालाही वाटत असतं की अजून बरेच अनुभव यायचेत, आता कुठे सुरुवात आहे! तो पुन्हा नवनवीन अनुभवांच्या शोधार्थ निघतो आणि अनुभवणाऱ्याला, किंवा स्वत:ला विसरतो, त्याला वाटतं की हा अनुभव आला की झालं आता सत्य गवसलंच आणि त्याच्या लक्षातच येत नाही की कोणताही अनुभव आपल्याला स्वत:प्रत आणणार नाही कारण आपण स्वत:पासून कधी दुरावलेलोच नाही!
_________________________________
असो, तर साधना अशी निवडा की ज्यातून फक्त भासाचं निराकरण होईल आणि भास काय आहे? तर आपण स्वत:ला निराकार असताना आकार समजतोय!

सगळ्यात सोपी साधना म्हणजे बोध आहे, जस्ट अंडरस्टॅंडींग, हा लेख नुसता वाचून देखील तुम्हाला बोध होईल कारण स्वत:ला शोधायला कशाला प्रयास हवा?

अष्टावक्र संहितेवर भाष्य करताना ओशोंनी म्हटलंय, ‘समझकी कमी साधनासे पूरी करनी पडती है, अन्यथा बोध काफी है! ’

_________________________________

या लेखाचा उद्देश खडतर किंवा वर्षानुवर्ष चालणारी साधना कशी स्वत:ला स्वत:ची भेट दुर्लभ करते हे सांगणं आहे. तिचा फायदा खडतर साधना करणार्‍यांना तर होईलच पण अशी साधना न करता येण्याची खंत असलेल्यांना ही होईल.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही