Monday, December 27, 2010

चेहरा पुसून टाका

रिंझाई नांवाच्या झेन मास्टरची कथा फार रम्य आहे. रिंझाई जेव्हा सिद्ध झाला तेव्हा त्यानं त्याच्या गुरुला विचारलं ‘मास्टर व्हेअर एम आय? ’ रिंझाई हरवला..... हे स्वतःला हरवणं सिद्ध होणं आहे! रिंझाईला स्वतःचा चेहरा पुसून टाकता आला, रिंझाई आता कुठेही नाही आणि सर्वत्र आहे!

झेन संप्रदायात ‘सिद्ध’ वगैरे असा फार मोठा शब्द नाही ‘नो माइंड’ असा साधा शब्द आहे. जेव्हा तुम्हाला आपल्या खांद्यावर काही नाही असं वाटेल तेव्हा तुम्ही सिद्ध झाला असाल, त्याला ते ‘नो माइंड’ म्हणतात.

तुमचा चेहरा हरवलेला असेल, तुम्ही नसाल,... नुसती अथांग मोकळीक असेल, अनिर्बंध मुक्तता असेल, नुसतं मोकळं आकाश असेल, एक निस्तब्ध शांतता आणि रम्य माहौल असेल!

कधी तरी पहाटे उठा, उशीला पाठ टेकून शांत बसा आणि कल्पना करा की आपल्याला चेहरा नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, सतत चालू असलेल्या विचारांमुळे आपल्याला चेहरा आहे असं वाटतं किंवा जो काही चेहरा आहे तो आपला आहे असं वाटतं. वास्तविकात आपल्याला चेहरा नाही, आपण एक चेहरा रहित अस्तित्व आहोत. चेहऱ्यामुळे व्यक्तिमत्त्व आहे आणि व्यक्तिमत्त्व हा एकमेव पेच आहे. व्यक्तिमत्त्वातून मुक्तता म्हणजे ‘नो माइंड’ अवस्था आहे, संपूर्ण अस्तित्वाशी एकरूपता आहे, आपलं वेगळेपण हरवून जाणं आहे.
काही क्षण जरी तुम्हाला आपल्या खांद्यावर काहीही नाही असा अनुभव आला तरी तुम्हाला इतकं हलकं वाटायला लागेल की विचारता सोय नाही, त्या क्षणी तुम्हाला रिंझाई त्याच्या मास्टरला जे म्हणाला त्याची प्रचिती येईल, तुम्ही स्वतःलाच विचाराल ‘व्हेअर एम आय? ’. तुमची ही अवस्था जितका वेळ टिकेल तितका वेळ तुम्हाला एक तरंगाईतता जाणवेल, तुमचे काहीही आणि कितीही प्रश्न असोत, सारे प्रश्न एका क्षणात संपल्या सारखे वाटतील. जन्मोजन्मीचा ताण एकदम नाहीसा झाल्यासारखा वाटेल, एकदम शांत वाटायला लागेल.

झाडं, पक्षी, प्राणी, सगळे निवांत दिसतायत कारण त्यांना आपण वेगळे आहोत असं वाटत नाही, हे ‘वेगळे आहोत असं वाटणं’ ही आपली अस्तित्वापासून झालेली फारकत आहे. ही फारकत वास्तविक नाही काल्पनिक आहे पण तीचं मूळ आपण आपल्याला व्यक्ती समजतो हे आहे. चेहरा विसर्जित झाला की फारकत संपली!

पाश्चिमात्य आणि आपल्या विचार सारणीत हाच फरक आहे, पाश्चिमात्य विचार सरणी व्यक्तिमत्त्व दृढ करा म्हणते आणि अध्यात्म व्यक्तिमत्त्व विसर्जित करा म्हणते. सगळं लौकिक जग हे आकाराचा गौरव करणारं असल्यामुळे जवळजवळ प्रत्येकजण व्यक्तिमत्त्व सघन करण्यामागे असतो. सघन व्यक्तिमत्त्वाचं समाजाला अपरिमित आकर्षण आहे, त्यातून लौकिक दृष्ट्या कितीही प्रगती झाली तरी अस्वस्थता कायम राहते. एकदा चेहरा सघन झाला की तोच आपली सामाजिक ओळख होतो आणि मग समाज त्याचा असा काही उदोउदो करतो की आपण कितीही चेहरा विसर्जित करण्याचा प्रयत्न केला तरी समाज तो विसर्जित होऊ देत नाही. खरं तर इतका कष्टानं कमावलेला चेहरा संबंधीत व्यक्तीच विसर्जित होऊ देत नाही, समाजाकडून त्याचं सतत शिक्कामोर्तब मिळवत राहते आणि चेहरा हरवला तर काय हीच भीती होऊन बसते!

काही वर्षांपूर्वी मी अनुपम खेरची मुलाखत बघत होतो, तो म्हणाला ‘आज मी इतका प्रसिद्धीच्या झोतात आहे की या झोतातून जेव्हा मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा माझं काय होईल मला सांगता येत नाही. एखाद्या दिवशी मी गाडीतून उतरेन आणि माझा ऑटोग्राफ घ्यायला कुणी पुढे येणार नाही त्या दिवशी बहुदा मी आत्महत्या केलेली असेल! ’ इतका चेहरा महत्त्वाचा आहे.

म्हणजे एकतर चेहरा लोकांनी मानावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्नात आहे, अत्यंत थोडे लोक त्या प्रयत्नात यशस्वी होतात आणि मग चेहरा हरवणं ही कल्पना सुद्धा करवत नाही.

जो चेहरा अजून फारसा समाज मान्य नाही तो खरं तर सुदैवी आहे कारण असा चेहरा स्वतःला पुसायचं साहस करू शकतो. एकदा हा चेहरा हरवून बघा, रिंझाई सारखा अनुभव एकदाच घेऊन बघा... ‘व्हेअर एम आय? ’ एकदा चेहरा हरवण्याची मजा कळली की आपण किती सुदैवी आहोत ते तुम्हाला कळेल. हा दिलासा नाही, वस्तुस्थिती आहे.

एकहार्टनी ‘पॉवर ऑफ नाऊ’ च्या प्रस्तावनेत म्हटलंय की त्याला स्वतः बरोबर राहणं अशक्य झालं, अत्यंत निराशेत त्यानं अनेक वेळा सगळं संपवण्याचे प्रयत्न देखील केले. एक दिवस त्याच्या मनात विचार आला ‘ स्वतः बरोबर राहणं मला असह्य झालंय म्हणजे नक्की काय झालंय? कुणाला कुणाबरोबर राहणं असह्य झालंय? मी एक आहे की दोन? या दोन मी पैकी एकच खरा असेल आणि या विचारा सरशी त्याचं मन थांबलं! म्हणजे विचार थांबले, डोक्यात सदैव सुरू असलेला संवाद थांबला आणि तो ‘नो माइंड’ ला उपलब्ध झाला!

ही ‘नो माइंड’ स्थिती तुम्हाला रोज पहाटे उपलब्ध आहे, प्रत्येक शांत झोपेनंतर सांजवेळी उपलब्ध आहे, तुम्ही फक्त तिची दखल घ्या. एकदा ही स्थिती कळली की मग तुम्हाला ती प्रत्येक प्रसंगात आणता येईल, प्रत्येक कृत्यात आणता येईल, वरवर सगळं चालू राहील आणि सभोवताली मात्र एक कायमची शांतता असेल.

एकहार्ट म्हणतो, त्याच्या जीवनात नंतर किती तरी सुंदर अनुभव आले आणि गेले पण ही शांतता मात्र कायम आहे. ही कायमची शांतता पहिल्यापासूनच आहे पण मनाच्या गोंधळामुळे, या सदैव चाललेल्या बडबडीमुळे ती लक्षात येत नाही.

मी देखील तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही फक्त आपल्या खांद्यावर काही नाही या अनुभवात खोल उतरा, तुम्हालाही कळेल चेहरा फसवा होता शांतता वास्तविक होती.

संदीप खरे 'आताशा असे हे मला काय होते' या कवितेत म्हणतो :

कशी ही अवस्था, कुणाला कळावे
कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?

एकदा चेहरा पुसला की जीवनात एक तोल येतो, प्रसंग काहीही असो तुम्ही स्थिर राहता. नृत्याचा सगळा रियाज फक्त हा तोल साधण्यासाठी आहे. एकदा हा तोल साधला की तुमच्या प्रत्येक कृत्यात डौल येतो, साधं चालणं देखील मजेचं होतं.

एकदा चेहरा पुसला की तुम्हाला गाण्याची सम काय आहे ते कळतं, तुमचे शब्द स्वर होतात आणि बोलणं लयबद्ध होतं!

एकदा चेहरा पुसून तर बघा!

संजय

Monday, December 06, 2010

५. संसार, संन्यास, कर्मयोग, भक्तीयोग

अध्यात्मात ज्यांना समजले नाही त्यांनी अनेक प्रकारचा गोंधळ घालून ठेवला आहे, असा गोंधळ मनातून दूर झाल्याशिवाय सहज आणि सोपा असलेला निराकार गवसत नाही.

अध्यात्म हे युगानुयुगे संसार विरोधी मानले गेले आहे. शाश्वताच्या शोधात निघालेल्याने क्षणभंगुराचा त्याग केला पाहिजे ही कल्पना जनसामान्यात अत्यंत रूढ झालेली आहे. पु. लं. नि सुद्धा विनोदाने 'द्राक्षही नाही आणि रुद्राक्ष ही नाही' अशी आध्यात्मिक अपयशाची खिल्ली उडवली आहे, त्यामुळे आध्यात्मिक नेहमी दोलायमान स्थितीत दिसतो आणि अध्यात्म जीवन विरोधी आहे असे वाटते. पण वस्तुतः ते तसे नाही. आकार आणि निराकार मिळून अस्तित्व झाले आहे, अस्तित्वात कोणताही अंतर्विरोध नाही. सगळा अंतर्विरोध न कळलेल्यांच्या मनात आहे.

संन्यास ही सर्वात चुकीची कल्पना या गैरसमजातून निर्माण झालेली आहे. वास्तविक संन्यासाचा अर्थ सम-न्यास म्हणजे श्वास मोकळा होणे (सम होणे) इतका साधा आहे. तुम्ही जेव्हा निराकाराला जाणता तेव्हा तुम्ही निश्चिंत होता आणि तुमचा श्वास मोकळा आणि एकसारखा होतो. संन्यास म्हणजे घरदार सोडून षड्रिपूंशी सामना करायला अरण्यात किंवा कुठल्याश्या आश्रमात निघून जाणे, तासन्तास ध्यान लावून बसणे, शरीराची हेळसांड करणे नाही. यातून विषाद शिवाय काहीही मिळत नाही. बुद्धाला शून्याचा उलगडा झाल्यावर तो राजनगरीत परत आला. यशोधरा त्याला म्हणाली तुम्ही सत्य शोधायला गेला होतात तर मग आम्हाला न सांगता, अशी अपरात्री सोडून जाण्याची काय आवश्यकता होती? ती पुढे जे म्हणाली त्यांनी बुद्ध देखील निरुत्तर झाला, ती म्हणाली की तुम्ही म्हणता तसे सत्य जर सर्वत्र आहे तर ते इथे गवसले नसते का? आणि हीच खरी निराकाराला शोधण्यातली मौज आहे, संसारात राहून शोधले तर ते खरे सत्य नाही तर आश्रमातल्या शांततेचा घरी आल्यावर कसा टिकाव लागणार? निराकाराची शांतता इथे काय आणि हिमालयात काय सारखीच आहे.

भक्तियोग आणि सांख्ययोग (किंवा ज्ञानयोग) यात फरक आहे. ते दोन विरुद्ध मार्ग आहेत. ज्ञानयोगात मुळात ऐक असलेल्या निराकाराला सरळ जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तर भक्तियोग आधी साधकाला ऐक आकार कल्पायला सांगतो, या आकाराला देव अशी संज्ञा दिली जाते. त्यामुळे प्रत्येकाचा देव वेगळा असू शकतो. अश्या संकल्पनेचा मूळ उद्देश मन ऐका आकारावर केंद्रित करणे हा असतो. यामुळे मनातले असंख्य विचार जाऊन साधक ऐका कल्पनेवर लक्ष्य केंद्रित करू शकतो. पण कोणतीही कल्पना सुरुवातीला विचार या स्वरूपात असल्यामुळे साधकाला या विचाराचा आकार करणे फार जिकिरीचे होते. असे बघा ताजमहाल बांधावा असा शहाजहानच्या मनात प्रथम विचार येतो. त्या विचाराचे हळूहळू कल्पनेत रुपांतर होते, मग त्याला कल्पनेतला ताजमहाल दिसू लागतो. मग तो ती संकल्पना वास्तुविशारदांच्या मदतीने कागदावर आणतो आणि मग यथावकाश ताजमहाल निर्माण होतो. साधकाला अश्याच प्रकारे विचाराचे कल्पनेत आणि कल्पनेचे त्याच्या मनासमोर दिसेल असे रूप तयार करायचे असते. हे ऐकतर जिकिरीचे असते आणि त्यातून देव दिसल्यावर (किंवा भेटल्यावर) तुझे सगळे प्रश्न सुटतील अशी त्याला समजूत करून दिलेली असते त्यामुळे मनाला (भासात्मक का होईना) काल्पनिक देव दिसला की त्याला सगळे काम झाले असे वाटते. वास्तविक ह्या मनाच्या एकाग्रतेमुळे निर्माण झालेल्या काल्पनिक आकाराला सोडता क्षणी मनाचा सगळा गोंधळ संपून त्याला निराकार दिसणार असतो पण साधक इतक्या प्रयासाने तयार केलेला आकार सोडायला जाम तयार होत नाही. त्यात त्याला आता आपल्या कल्पनेतला आकारच आपले सगळे प्रश्न सोडवेल अशी खात्री असल्यामुळे प्रकरण फारच गंभीर होते. म्हणून कल्पनेने कल्पनेचे निराकरण ही भक्तियोगाची प्रणाली ऐकतर साधकांना समजत नाही आणि दुसरे म्हणजे कल्पना सोडून देता न आल्यामुळे निराकाराची जाणीव होणे दुरापास्त होते.

कर्मयोगाचा खरा अर्थ क्रियेतून अकर्त्याला शोधणे असा आहे. निराकार हा अकर्ता आहे हे आपण चौथ्या लेखात पाहिले आहे. अकर्त्याला शोधण्यासाठी सूफी पंथाने ऐक प्रक्रिया शोधली आहे. (मी ही पद्धत फक्त सांगतो आहे, तिचा पुरस्कार करत नाही.) तुम्ही कोणताही अडथळा नसलेल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेवर, उपाशी पोटी, स्वतः भोवती फिरण्यास सुरुवात करा. कितीही चक्कर आली तरी फिरत राहा. कितीही तोल जातो वाटला तरी काळजी करू नका. पडलात तरी पुन्हा उठा आणि फिरायला सुरुवात करा. अनेक तासांनी ऐक क्षण असा येईल की तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल, शरीर फिरते आहे आणि आपण स्थिर आहोत हे तुम्हाला जाणवेल. तुम्हाला कळेल की या व्यक्त जगात सगळे हालते आहे पण आपण स्थिर आहोत. तुम्हाला अकर्ता हे निराकाराचे परिमाण गवसेल.

खरं तर इतकं काही करायची आवश्यकता नाही. कोणताही शास्त्रीय गायक, वादक किंवा नर्तक आपल्या सादरीकरणात पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा त्याला असे वाटते की आपण गात, वाजवत किंवा नर्तन करत नाही. तुम्हीही कलाकारांचे या अर्थाचे बोलणे वाचले असेल. त्याला ते नीट सांगता येत नाही पण त्या क्षणी मनाच्या एकाग्रतेमुळे तो शरीरा पासून वेगळा झालेला असतो, अकर्ता झालेला असतो आणि त्यामुळे आपण सादर करणाऱ्यापेक्षा वेगळे आहोत हे त्याला जाणवते. मनाची एकाग्रता संपली की पुन्हा अकर्ता हे निराकाराचे परिमाण अनुपलब्द्ध होते. अश्या प्रकारे कोणत्याही क्रियेत तुम्ही निमग्न होऊन शरीर आणि मनापासून वेगळे होऊ शकता हा कर्मयोगाचा खरा अर्थ आहे.

आता आपण कर्मयोगाची काय अवस्था केली आहे ते बघा. अपेक्षा किंवा फलरहित कर्म या ऐका निरर्थक कल्पनेवर आजपर्यंत किती लिहिले गेले आहे? आणि त्यातून काय साधले आहे? भारतात तर दैवनिहीत कर्म, ईश्वर समर्पित कर्म (फलरहितच्या जोडीला) आणि काय वाट्टेल त्या कल्पनांनी सगळ्यांच्या मनाची द्विधा अवस्था करून टाकली आहे आणि कर्माचा बाजा वाजवला आहे. एकजण धड काम करत असेल तर शपथ असे म्हणायची पाळी आली आहे आणि प्रत्येकाला कधी संपवतो हे काम असे वाटू लागले आहे. काम करावे तरी पंचाईत आणि पैसे मागावे तरी पंचाईत अशी परिस्थिती होऊन बसली आहे. वास्तविक याचा कर्मयोगाशी काहीही संबंध नाही. पण त्यामुळे भारतीय उत्पादनाचा दर्जा जगन्मान्यात पावू शकत नाही. पाश्चिमात्य लोक कसोशीने काम करतात कारण त्यांना कर्मयोग कळला आहे असे नाही तर त्यांच्या मनात गोंधळ नसल्यामुळे तो त्यांना नकळत साधला आहे. तुम्ही मन लावून कोणतेही काम करून बघा तुम्हाला कळेल की शरीर आणि मन काम करते आहे तुम्ही निष्काम आहात. तुम्ही त्या शरीर आणि मनाच्या अवतीभवती असलेली स्पेस (अवकाश) झाला आहात. तुमचे मूळ स्वरूप, निराकार तुम्हाला गवसेल, तुम्हाला पहिल्यांदा कर्माचा आनंद काय असतो ते कळेल.

 
संजय

४. वेळ, अंतर आणि काम

वेळ, अंतर आणि काम या रोजच्या मानवी जीवनात ताण निर्माण करणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी निराकराला जाणल्यावर कश्या सहज होतात ते बघू.

निरकारात वेळ कोठेही नाही. निरकार सनातन आहे. सतत निर्माण होणाऱ्या आकाराकडेच आपले लक्ष्य असल्यामुळे वेळेचा भास होतो. अशी कल्पना करा की तुम्ही पृथ्वी पासून सरळ काही किलोमीटर वर आकाशात गेला आहात. तुम्हाला जाणवेल की पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होत आहेत. अंतराळात वेळ कुठेही नाही. वेळ ही माणसानी उपयोग म्हणून निर्माण केलेली कल्पना आहे. वेळेचा उपयोग निश्चीत आहे पण ती कल्पना आहे. निराकार जाणवण्यासाठी मनात खोल गेलेली वेळेची कल्पना शून्य झाली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही वेळ पाळणार नाही असा नाही. मनावर सतत असलेले वेळेचे दडपण निघून जाईल. वेळ स्वतःपेक्षा महत्त्वाची वाटणार नाही. वेळ ही वस्तुस्थिती नसून कल्पना आहे हे कळल्यावर सारखे घड्याळाकडे बघणे आणि निर्णय घेणे कमी होईल. तुम्हाला हळूहळू अस्तित्वाशी एकतानता साधायला लागेल.

कृष्ण निराकाराला सनातन वर्तमान म्हणतो कारण वर्तमान हा एकच काळ अस्तित्वात आहे. ओशोंची सगळी आध्यात्मिक शिकवण केवळ एका संकल्पनेवर अधारलेली आहे 'नाऊ अँड हिअर', कृष्णमूर्ती म्हणतात : 'नाऊ इज द अल्टिमेट सिक्युरिटी', एकहार्ट ची अध्यात्मिक ओळखच जगाला त्याच्या 'पॉवर ऑफ नाऊ' मुळे झाली. तुम्ही जे काय करणार, आठवणार, योजणार ते फक्त एका क्षणात होऊ शकत आणि तो म्हणजे ' हा क्षण '. मागे जे घडले ते आठवायचे असेल तरी हाच क्षण, पुढचे ठरवायचे असेल तरी हाच क्षण आणि काही करायचे असेल तरी हाच क्षण.

मनातली वेळ ही संकल्पना गेली की तुम्हाला कळेल आपल्याला वय नाही. शरीर जुने होईल पण आपण नाही. आपण सदैव तसेच रहातो. वेळेचे दडपण गेल्यामुळे तुमच्या जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण होईल. हा आनंद आणि उत्साह तुम्ही कालरहित निराकाराशी जोडला गेल्यामुळे येतो.

निराकार एकसंध आहे. निराकार कुठे आहे हे स्थान म्हणून दर्शवता येत नाही कारण निराकार अमुक ठिकाणी आहे आणि तमुक ठिकाणी नाही असे नाही, ते सर्वत्र आहे. निरकारात अंतर नाही. यामुळे निरकाराचा दुसरा अत्यंत लोभस पैलू तयार होतो, ते कुठेही जात- येत नाही, ते अचल आहे. ज्या क्षणी अंतरही कल्पना तुमच्या मनातून दूर होते त्या क्षणी तुमच्या लक्ष्यात येते की आपण ही हलत नाही. शरीर हलते, विचार हलतात, आपण स्थिर आहोत. शरीर आणि मन या पासून आपलं असलेलं वेगळेपण तुम्हाला जाणवतं. कुठेही असलात तरी तुम्ही असल्या जागी स्थिर होता. कुठेही निघालात तरी एक न हलणारा घटक तुमची कायम साथ करतो. तुमच्या हालचालीत एक स्वस्थता येते. तुमच्या बोलण्यात, विचारात एक लयब्द्धता येते. तुम्ही कोणत्याही प्रसंगात असाल तरी थोडेसे त्या प्रसंगा बाहेर रहता. अचल निरकाराशी तुमचा दुवा जुळल्याचा तो परिणाम असतो.

निरकाराला अकर्ता म्हंटले आहे. त्याच्या शिवाय काही घडू शकत नाही पण तो स्वतः काही करत नाही. तो चित्रपटाच्या पडद्या सारखा आहे, तो असल्यामुळे चित्रपट दिसतो पण तो स्वतः चित्रपटात काहीही काम करत नाही. बुद्धाची सारी विपश्यना निराकाराच्या या अकर्त्या पैलूला जाणून घेण्याची आहे. तुम्ही थोडे शांत बसलात, थोडे निश्चींत झालात तर तुमच्या लक्ष्यात येईल की जीवन आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती बुद्धीमान आहोत, आपण किती महान कार्य करतो आहोत, आपल्याला किती समाज मान्यता आहे या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही ते आपल्या नकळत चाललेल्या आपल्या श्वासावर अवलंबून आहे. तुम्हाला त्या क्षणी कळेल की इतकी महत्वाची गोष्ट आपण फक्त जाणू शकतो करू काहीही शकत नाही. ज्या क्षणी तुम्हाला या महिती आहे असे वाटणाऱ्या पण क्वचित जाणवणाऱ्या गोष्टीची जाणिव होईल तेंव्हा तुम्हाला कळेल की आपण अकर्ता आहोत. पहिल्यांदा तुमच्या जीवनात 'लेट गो' येईल, घटना घडवण्याच्या अट्टहासाचा सगळा ताण जाऊन तुम्ही घटना घडू देऊ लगाल. रोजचे कंटाळवाणे वाटणारे काम एक नवीन परिमाण घेईल. हा अकर्ता जर तुम्हाला गवसला तर तुम्हाला कळेल आपण कधीच काही केले नाही, जे घडले ते शरीर आणि मनाच्या स्तरावर होते, आपण सिनेमाच्या पडद्या सारखे तिथे फक्त उपस्थित होतो. तुमचे काम तुम्हाला मजेचे वाटायला लागेल. तुमच्या जीवनाची दिशा घडवण्या ऐवजी घडू देण्याकडे बदलेल. तुम्ही निश्चींत होऊ लागाल.
 
संजय

३. चमत्कार, रहस्य आणि ध्यान

अस्तित्वातल्या कोणत्याही घटनेचा मागोवा घेऊन तिचा कार्य-कारण भाव बुद्धीने शोधला जाऊ शकतो पण एका ठराविक मर्यादे नंतर बुद्धी उत्तर शोधू शकत नाही तिथे रहस्य सुरू होते. सफरचंद खाली का पडते याचा उलगडा न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून केला पण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? हे त्याला सांगता आले नाही आणि ते कोणालाही सांगता येणार नाही कारण ते रहस्य आहे.

ह्या अस्तित्वाची निर्मिती कशी झाली याला एकमेव आणि अत्यंत अलौकिक उत्तर अष्टावक्रानी आपल्या गीतेत दिले आहे. तो म्हणतो ह्याची सुरुवात झालेली नाही हे सुरुवाती पासून असेच आहे.

निराकार आणि आकार हे अस्तित्वाचे स्वरूप कालात सुरू झालेले नाही ते सुरुवाती पासूनच तसे आहे आणि म्हणून त्याच्या मागे जाता येत नाही, ते एक रहस्य आहे.

इतक्या सोप्या आणि सुरेख रहस्याचा जे जगायला आणि उपभोगायला आता या क्षणी उपलब्ध आहे, माणसाने चमत्काराचा ध्यास घेऊन आणि काल्पनिक कथा रचून पूर्णपणे बाजा वाजवला आहे.

सिद्धी आणि चमत्कार यांनी माणसाच्या मनाचा इतका आध्यात्मिक गोंधळ उडवून दिला आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे आपल्या निराकार स्वरूपाचा बोध होणे जवळ जवळ दुरापास्त झाले आहे.

अमक्याने स्वतःचा देह सरळ आकाशात नेला, तमक्याला पाण्यावरून चालत इकडून तिकडे जाता आले, कुणी इथे बसून पृथ्वीच्या त्या टोकाला काय चालले असेल ते सांगितले, एक ना अनेक पण या सगळ्या काल्पनिक कथा आहेत. समजा एकाला पाण्यावरून सरळ चालत जाता आले तर त्या घटनेचा मागोवा घेऊन पुन्हा ती घटना तशीच घडवता येईल, त्याचा कार्य-कारण भाव शोधता येईल. पण चमत्कार आणि निराकाराचा बोध याचा काहीही संबंध नाही. निराकाराच्या बोधाने तुमच्या जीवनात स्वास्थ्य येईल, तुम्हाला कोणताही चमत्कार करता येणार नाही.

चमत्कार ही हातचलाखी आहे. त्यामुळे मला चमत्कार करता येत नाही म्हणजे मला सत्याचा बोध झाला नाही हा गैरसमज मनातून दूर करा. निसर्गदत्त महाराजानी, ज्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज त्यांच्या 'सुखसंवाद' वरून येऊ शकतो, कोणताही चमत्कार केला नाही. ओशो म्हणाले ' मी कोणताही चमत्कार करत नाही हा एकच चमत्कार करतो. एकहार्ट सारखा दिग्गज इतका साधा आहे की तुम्ही त्याचे 'पॉवर ऑफ नाऊ', 'स्टिलनेस स्पिक्स' किंवा 'न्यू अर्थ' वाचत नाही तोपर्यंत त्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना देखील येणार नाही, कृष्णमूर्ती ज्यांनी अध्यात्माला नवं परिमाण दिलं काहीही चमत्कार केला नाही.

अस्तित्व हे रहस्य आहे, काव्य आहे, त्या रहस्यात मशगुल होणे, त्या रहस्याप्रती कृतज्ञ होणे हा जगण्याचा सोपा मार्ग आहे. आकार आणि निराकार या एकसंधतेशी आपली मुळात असलेली एकरूपात जाणण्याचा ह्या रहस्यात जगणे हा उपाय आहे. हे अस्तित्व स्वतःच ऐक चमत्कार आहे, निराकाराने कुठेही स्पर्श न करता आकार सांभाळला आहे हाच खरा चमत्कार आहे.

सांख्य योगात ध्यानाला खरं तर स्थान नाही. अष्टावक्र आपल्या गीतेत म्हणतात : ' मुक्तीसाठी अनुष्ठान करणे हेच बंधन आहे' कारण वियोग झालेलाच नाही. तरीही अगदी सहज हाताशी असलेली आणि सांख्याला अनुरूप आशी ध्यान पद्धत बघू.

ध्यानाचा साधा अर्थ 'लक्ष्य' असा आहे. हिंदीत ज्या अर्थाने 'आपका ध्यान किधर है? ' म्हणतात, तो ध्यानाचा खरा अर्थ आहे. मी सुरुवातीला म्हटले तसे व्यक्तिमत्त्व हा निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा आहे. ह्या व्यक्तिमत्त्वाची सुरुवात मुलाचे लक्ष्य पहिल्यांदा जेंव्हा वेधले जाते तेव्हा पासून होते. लक्ष्य वेधल्यामुळे निराकार जाणीवेला दिशा निर्माण होते आणि मुलाचे लक्ष्य बहिर्गामी होते. निराकाराला स्वतःचा विसर पडतो. हेच लक्ष्य (ध्यान) परत निराकाराकडे वळवले की निराकाराचा बोध होतो. या साठी फक्त ऐकच करा समोर बघा, बस्स! तुम्ही कुठल्याही प्रसंगात असाल, काहीही अडचण असेल तर फक्त समोर बघा! ऐका क्षणात तुमचे ध्यान परत तुमच्याकडे येईल. व्यक्तिमत्त्व हे मनोनिर्मीत असल्यामुळे ज्या क्षणी तुम्ही समोर बघता त्या क्षणी तुम्ही वास्तवात येता. तुमचे लक्ष्य खरे तर मनानेच वेधून घेतलेले असते. मन म्हणजे सतत डोळ्यासमोर आणि काना मध्ये चालू असलेला घटनांचा ऑडियो-व्हिजुअल आहे. तुमचे लक्ष्य त्याच्या पासून निघाले की ते निराकारावर स्थिरावते. कोणत्याही प्रसंगात तुम्ही शांत राहू शकता.

कृष्णमूर्ती या घटनेला 'दॅट विच इज' म्हणतात. ओशो 'नाऊ ऍंड हिअर' म्हणतात, कृष्ण या स्थितीला 'सनातन वर्तमान' म्हणतो, बुद्ध या घटनेला 'क्षणस्थ' होणे म्हणतो. तुम्ही निराकाराशी परत जोडले जाता, किंवा जो वियोग केवळ आपले लक्ष्य (ध्यान) नसल्यामुळे झाला असे वाटत होते तो कधीही झाला नव्हता हे तुमच्या लक्ष्यात येते.

झेन पंथात साधकाला वर्षानुवर्षे भिंतीकडे चेहरा करून बसायला सांगितले जाते. एका क्षणी डोळ्यासमोरून चाललेला मनोचित्रपट त्याला दिसतो, मनाची लक्ष्य वेधून घेणारी बडबड थांबते आणि त्याला समोर कायम हजर असलेला निराकार दिसू लागतो. तुम्हाला भिंती समोर बसायची गरज नाही फक्त समोर बघायची सवय करा निराकार सदैव हजर आहे.

एकदा तुम्हाला निराकाराशी जोडलं जाण्याची ही सोपी पद्धत जमू लागली की तुम्हाला सगळीकडे निराकारच दिसू लागेल. ज्याला गुर्जिएफ 'गेस्टाल्ट चेंज' म्हणतो त्याची तुम्हाला प्रचिती येईल. तुमचे लक्ष्य चित्राकडून पडद्याकडे जाईल. जोपर्यंत पडदा दिसत नाही तो पर्यंतच चित्रपट खरा वाटतो, ज्या क्षणी पडदा दिसतो त्या क्षणी चित्रपटाचा परिणाम शून्य होतो. तुम्हाला शाश्वताची प्रचिती येईल. तुमच्या जीवनात शांतता येईल.
 

संजय

२) निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व

आधी निराकार ही कल्पना समजून घेऊ. समजा तुम्ही एका उंच टेकडी वरील विस्तीर्ण पठारावर एकटेच आहात, तुम्ही आणि आकाश या मध्ये कोणीही नाही. तुमच्या चहूबाजूला आकाशाशिवाय काही नाही. तुम्ही आकाशाकडे पाहत राहिलात तर तुमच्या लक्ष्यात येईल की आकाश असे काही नाही, एक अनंत पोकळी सर्व काही व्यापून आहे. ती पोकळी केवळ वरच नाही तर पृथ्वीच्या खाली सुद्धा आहे. ही पोकळी अंतहीन आहे तुम्ही कितीही खोल, कितीही वर किंवा कोणत्याही दिशेला गेलात तरी तुम्हाला शेवट मिळणार नाही. मग तुम्हाला हे देखील जाणवेल की ही पोकळी केवळ दूरवर नाही तर आता आणि इथे तुमच्या शरीरातून आरपार गेली आहे. तुम्ही आणखी शांत झालात की तुम्हाला कळेल आणि जाणवेल की तुमच्या दोन विचारांमध्ये सुद्धा ती पोकळी आहेच. ही शांत आणि रम्य पोकळी सर्व अस्तित्व व्यापून आहे. दखल घेत नव्हतो म्हणून लक्ष्यात येत नव्हती इतकेच.

ही सर्वव्यापी पोकळी म्हणजेच निराकार. ती इतकी डोळ्यासमोर आहे की बुद्धाला जेव्हा तिचा उलगडा झाला तेव्हा त्याला मनापासून हसू आलं तो म्हणाला डोळ्यासमोर असलेली आणि इतकी प्रकट गोष्ट मी किती वर्ष शोधत होतो, मी इतक्या सोप्या गोष्टीसाठी कायकाय प्रयास केले. बुद्ध या पोकळीला शून्य म्हणतो.

जसे चित्र कॅन्व्हासवर प्रकटते, तो कॅन्व्हास असल्या शिवाय कोणतेही चित्र निर्माण होऊ शकत नाही आणि आकारा मागे जरी झाकला गेला तरी तो कॅन्व्हास सारे चित्र व्यापून असतो तशी ही पोकळी किंवा हा निराकार सारे अस्तित्व व्यापून आहे. अस्तित्व या दोनच घटकांचे बनले आहे, एक निराकार आणि दुसरे त्यात प्रकट झालेले सगळे आकार. हा निराकार सगळ्या व्यक्त जगाचा मूळ आधार आहे, तो सगळ्या निर्मितीचा स्रोत आहे. सगळे सूर्य, तारे, ग्रह, ही पृथ्वी, सगळी जीवसृष्टी या निराकारात प्रकट झाले आहेत.

ह्या निराकारात स्वतःला जाणण्याची क्षमता आहे तो निर्जीव नाही. तो एका सार्वभौम उपस्थिती सारखा सदैव हजर आहे त्यामुळे कृष्णानी त्याला साक्षी म्हटलं आहे. ज्ञानी त्याला आत्मा म्हणतात आणि प्रत्येक आकाराच्या आत, बाहेर, तोच निराकार असल्यामुळे तो प्रत्येक आकाराचे मूळ स्वरूप आहे. आकार निर्माण होतील आणि विलीन होतील पण निराकार जसाच्या तसा राहील.

आकार निर्मिती ही निराकाराची संभावना (पोटेंशियालिटी) आहे, पण आकार नसला तरी निराकार असणारच. निराकाराचा बोध होणे आणि आपण मुळात निराकारच आहोत ही वस्तुस्थिती होणे एकच आहे कारण निराकारात अंतर नाही. निराकाराचा बोध होणे आणि आपण निराकार आहोत हे कळणे एकच आहे. या बोधाला कृष्णमूर्ती 'द नोअर बिकम्स द नोन' म्हणतात आणि ओशो त्याही पुढे जाऊन 'अँड देअर ईज नो वन' असं म्हणतात कारण निराकार म्हणजे वस्तुतः कोणीही नाही. संपूर्ण शांतता! म्हणून बुद्ध सत्याला शून्य म्हणतो. निसर्गदत्त महाराज या सृष्टीला पोकळ देखावा म्हणतात कारण कुणाच्याही आत कुणीही नाही.

खरं तर निराकार इतका डोळ्यासमोर आणि प्रकट आहे की त्याचा बोध तुम्ही वर लिहिलेलं नुसतं मन लावून आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचलं की तुम्हाला होईल. पण आपण मुळात निराकारच आहोत हे तुम्हाला मान्य होणार नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाने आपण स्वतः कोण आहोत याची करून घेतलेली कल्पना किंवा व्यक्तिमत्त्व. ओशो अष्टावक्र गीतेत म्हणतात : 'तुम्हारी कल्पना ही तुम्हारा कारागृह बन गयी है!'

आता इथे मुक्ती म्हणजे काय ते समजावून घेणे उपयोगी होईल. निराकार अनिर्बधं आहे, संपूर्ण मोकळीक आहे, कोणताही आकार निराकाराला बांधू शकत नाही; आपण निराकार आहोत हा बोध तुम्हालाही आपण कधीही आणि कोणत्याही बंधनात नव्हतो याची तत्क्षणी अनुभूती देतो. त्यामुळे सत्याच्या बोधाला मुक्ती असं म्हटलं आहे. आता तुम्हाला ओशोंच्या वाक्याचा अर्थ लक्ष्यात येईल. हे कारागृह काल्पनिक आहे, तुमच्या गैरसमजा शिवाय कोणतेही बंधन नाही.

माणूस म्हणून जन्माला येणे हा मुक्तीचा एकमेव मार्ग आहे कारण केवळ माणसाला त्याच्या जाणीवेच्या प्रगल्भतेने निराकाराचा बोध होऊ शकतो. पण माणूस म्हणून जन्माला येणे आणि व्यक्तिमत्त्वाच्या बंधनात अडकणे हे अनिवार्य आहे, ते कुणालाही चुकले नाही. म्हणून आता व्यक्तिमत्त्व कसे तयार होते ते पाहू.

मूल जन्माला आल्यावर आकार (देह) आणि निराकार (शून्य) यात अंतर नसते. चित्र आणि कॅन्व्हास एकच असतात. मुलाची जाणीव त्याच्या नकळत आत्ममग्न असते. मुलाच्या जाणीवेत त्याच्या शिवाय दुसरे कोणीही नसते. म्हणजेच जाणीव मोकळ्या आकाशा सारखी असते. निराकाराला आपण निराकार आहोत हा बोध नसतो. ज्या क्षणी मुलाचे आप्त त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात त्या क्षणी ही एकसंध जाणीव उन्मुख (ओरियंट) होते, एकसंध आकाशाला दिशा येते आणि जाणलेले आणि जाणणारा हे द्वैत तयार होते. ज्यावेळी त्या मुलाला नावाने हाक मारली जाऊ लागते, समजा 'संजय, संजय' तेव्हा कुठेही आणि कोणीही नसलेला काल्पनिक संजय केवळ हाके मुळे तयार होतो. मुलाची ओरियंट झालेली जाणीव हळूहळू संजय अशी हाक मारली की हाक मारणाऱ्याकडे बघू लागते आणि इथून व्यक्तिमत्त्व तयार होऊ लागते. हा

संजय दोन्ही बाजूनी तयार होऊ लागतो; सगळे त्याला संजय समजू लागतात आणि तो ही स्वतःला संजय समजू लागतो. पुढे 'संजय इकडे ये' आशी हाक मारल्यावर देह इकडून तिकडे जातो पण अचल निराकाराला आपणच चालतो आहोत असे वाटायला लागते. नाती-गोती निर्माण झाली की हा गोंधळ पुढे पुढे भावनिक स्तरावर जाऊन पोहोचतो. त्यातून यथावकाश मुलाचे लग्न वगैरे झाले की मग हे प्रकरण फारच गंभीर स्वरूप धारण करते.

तत्पूर्वी मुलाच्या शाळेत जाण्याने त्याचे दोन सखोल गैरसमज होतात पाहिला स्वतःच्या रूपाविषयी आणि दुसरा स्वतःच्या बुद्धिमत्ते विषयी. स्वतःला देह समजल्यामुळे आपल्या दिसण्या विषयी प्रत्येकाचा गैरसमज असतोच असतो आणि बुद्धीचा तर शेवट पर्यंत साथ सोडत नाही. दोनच प्रकारचे गैरसमज मूल करून घेते : एक मी सुंदर आहे किंवा सुमार आहे आणि दोन : मी बुद्धिमान आहे किंवा माझ्याकडे हवी तशी बुद्धिमत्ता नाही. पुढे मूल स्वतःच्या पायावर उभे राहून कमावायला लागले की एक सार्वजनिक आणि सर्वमान्य गैरसमज त्याचा श्वास घुसमटवतो आणि तो म्हणजे मी श्रीमंत आहे किंवा गरीब. अश्या त्रिपैलू (रूप, बुद्धी आणि संपती) गैरसमजाचे ओझे व्यक्तिमत्त्व निर्माण करते. त्यामुळे कोणीही काहीही म्हणो एक न्यूनगंड मनात कायमचा घर करून बसतो. हा न्यूनगंड हेच अस्वास्थ्याचे मूळ कारण आहे. जो लौकिक दृष्ट्या यशस्वी होतो तो वरून कितीही स्वस्थ दिसला तरी निराकाराशी संपर्क तुटल्यामुळे अस्वस्थच असतो आणि अयशस्वी माणसाला तर अस्वस्थतेनी हे जीवनच नकोसे होते.

सगळी मनुष्यता या दोनच विभागात विभागलेली आहेः एक यशस्वी आणि अस्वस्थ आणि दोन : अयशस्वी आणि अस्वस्थ. पण साऱ्या अस्वस्थतेचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः विषयी करून घेतलेली कल्पना, तुम्ही निर्माण केलेले आणि समाजानी तुम्हाला दिलेले व्यक्तिमत्त्व. पण मजा अशी आहे की कोणत्याही गैरसमजाचा तुमच्या मूळ स्वरूपावर काहीही परिणाम होत नाही, तुम्ही मूळ आहात तसेच म्हणजे शांत, व्यापक, अनिर्बंध राहता पण जगण्यातली मजा निघून जाते, आपण निराकार आहोत हे विसरल्यामुळे ऐक अनामिक अस्वस्थता कायमची सतावत रहाते. अध्यात्म म्हणजे या शांत आणि स्वस्थ निरकाराचा बोध घेऊन आकारात जगणे, मग जीवनात एक निश्चींतता येते कारण काळजी करणाराच कोणी राहत नाही.

 
संजय

Sunday, December 05, 2010

१. अध्यात्म : पूर्वभूमिका

१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्यासारखे आहे.

जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे.

आपल्या मूळ स्वरूपाला सत्य, शाश्वत, अमृत, शून्य, आत्मा, निराकार, अनंत, अपरिवर्तनीय अशी अनेक नांवे आहेत पण सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्यामुळे अध्यात्मात शब्दाला महत्त्व नसून कळण्याला आहे.

सत्य कळले की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग किंवा पुरावा तुमच्या जीवनातली चिंता पूर्णपणे नाहीशी झाली की नाही, तुम्हाला जगण्याची मजा यायला लागली की नाही, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात पूर्णपणे स्वस्थ वाटते की नाही हा आहे.

अध्यात्मातला पॅरॅडॉक्स असा आहे की तुम्हाला सत्य कळले नाही म्हणून तुमचे स्वरूप किंवा मूळ रूप बदलत नाही. स्वरूप कळल्याने तुम्ही निश्चिंत होता आणि न कळल्याने किती जरी प्रयत्न केला आणि मनाजोगते झाले तरी सचिंत राहता एवढाच फरक आहे.

२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणाऱ्याच्या ओपननेसवर अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्यापर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.

आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणाऱ्याचा आनंद हा ऐकणाऱ्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, नाहीतर ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल. तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका.

या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घरबसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्यं समजले नाही तरी तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही. काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजले आहे हे सर्वमान्य झाले पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही. जेंव्हा मला वाटेल की या लेखनाचा कुणालाही काही फायदा होत नाही तेव्हा मी लिहिणे बंद करीन.

३) जेव्हा एखाद्याला सत्य समजते तेव्हा तो आपल्या भाषेत आणि आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतो. तो कुणाचेही अनुकरण करत नाही. त्यामुळे गीता ही गीता आहे, उपनिषदे ही उपनिषदे आहेत, कुराण वेगळ्या पद्धतीने सत्यं मांडते, पातंजली त्यांची पद्धत सांगतात, बुद्ध त्याच्या भाषेत शून्याची उकल करतो, त्यामुळे सत्यं जरी एकच असले आणि सगळ्यांचा निर्देश एकाच गोष्टीकडे असला तरी मार्ग आणि अभिव्यक्ती भिन्न होतात आणि त्यात समन्वय होऊ शकत नाही. तुम्हाला माझं म्हणणं समजलं नाही तर तुम्ही गीता वाचा पण मला गीतेतल्या प्रमाणे सत्याची उकल करा असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण ते गीतेवर प्रवचन होईल. मी माझ्या पद्धतीनं उकल करीन. मला कॉंप्रमाईज करता येणार नाही.

४) सत्यं शोधनाचे खरं तर तीनच मार्ग आहेतः एक : सांख्य योग (म्हणजे ज्याला समजले आहे त्याचे फक्त ऐकणे), दोन : भक्ती योग (म्हणजे एखाद्या मानसिक आकाराशी तद्रूप होऊन निराकाराला जाणणे) आणि तीन : तंत्र (म्हणजे काही शारीरिक किंवा मानसिक प्रक्रियांनी सत्याप्रत पोहोचणे).

आपण सांख्य योगाचा मार्ग अवलंबणार आहोत. हा मार्ग भक्तिमार्गा पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला तुमची कुणावरही श्रद्धा असली तरी ती बाजूला ठेवावी लागेल. नाहीतर तुम्ही गोंधळात पडाल किंवा दुखावले जाल. सांख्य योगात निराकाराला सरळ समजून घेतले जाते त्यामुळे देव ही कल्पना निराधार ठरते. कारण देवाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक कल्पना हा आकार आहे, पण निराकार एकच आहे. तंत्र मार्ग म्हणजे पातंजलींचा अष्टांगयोग किंवा शिवाचे तंत्रसूत्र या शारीरिक किंवा मानसिक प्रक्रिया आहेत त्या ह्या चर्चेत येणार नाहीत. फक्त ऐकणे आणि समजून घेणे हा अत्यंत सहज आणि सोपा सांख्य मार्ग आपण बघणार आहोत.

५) ह्या लेखनाचा प्रत्येक लेख संपूर्ण असेल. जसे एका महालात जायला शंभर दारे आहेत तुम्ही कोणत्याही दराने आत जाऊ शकता तसे कुठलाही ऐक लेख तुम्हाला सत्याची उकल करू शकेल. एकदा महालात आल्यावर तुम्हाला कळेल की सगळी दारे एकाच ठिकाणी येत होती. तुम्हाला उकल होत नाही याचा अर्थ तुम्हाला दार सापडले नाही. एकदा उकल झाल्यावर तुम्हाला कळेल की मी ऐकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकाराने सांगत होतो कारण सत्य ऐकच आहे. कोणत्याही ऐका लेखनाची दुसऱ्या लेखनाशी विसंगती असू शकत नाही त्यामुळे तेव्हा तसे आणि आता असे अश्या चर्चा करण्यापेक्षा समोर असलेल्या लेखनावर चर्चा विधायक होईल.

चर्चेसाठी समान भाषा-समज आवश्यक आहे. निराकार हा माझा सत्याकडे निर्देश करण्यासाठी आवडता शब्द आहे. ओशो ज्याला 'नाऊ अँड हिअर' बुद्ध ज्याला शून्य, उपनिषदे ज्याला पूर्ण, आध्यात्मिक परिभाषेत ज्याला सत्य, कुराण ज्याला अल्ला, कृष्ण्मूर्ती ज्या प्रक्रियेला 'चॉईसलेस अवेअरनेस' निसर्गदत्त महाराज ज्याला सदवस्तू आणि एकहार्ट टोले ज्याला बीइंग म्हणतो त्याला मी निराकार म्हणणार आहे. आपण मुळात निराकार आहोत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. सध्या निराकार हा तुमच्यासाठी शब्द आहे पण मुळात निराकार हे आपले या क्षणी आणि काहीही न करता लाभलेले स्वरूप आहे.


संजय