Monday, December 12, 2011

५३. आरसा

एका झेन आश्रमात नितांत रमणीय सकाळी साधक गुरुची वाट पाहतायत. गुरू येतात, सर्व श्रोतृवृंदाकडे सस्मित पाहतात, शांतपणे आसनस्थ होतात. त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानापाशी लावलेला सुंदर बिलोरी आरसा बरोबर आणलाय. तो सर्वांना दाखवून ते विचारतात ‘हा आरसा कुणाचाय? ’
साधकात निरव शांतता पसरते कारण प्रश्नाचं सरळ उत्तर अपेक्षित असतं तर गुरुंनी प्रश्नच विचारला नसता. आरसा तुमचाय किंवा आश्रमाचाय ही काही त्या प्रश्नाची उत्तरं नव्हेत. कुणी उत्तर देईल म्हणून गुरू प्रतीक्षा करतात पण साधक विचारात गुंतल्यानं उत्तर येत नाही. मग गुरू हातातला आरसा सोडून देतात, तो बिलोरी आरसा जमिनीवर पडून फुटतो आणि गुरू निघून जातात.
आश्रमातला एक प्रज्ञावान साधक आश्रमाच्या खरेदीसाठी बाजारात गेलेला असतो, आल्यावर त्याला प्रसंग कळतो आणि तो म्हणतो,
‘अरेरे, इतका सुरेख बिलोरी आरसा निष्कारण फुटला’.
‘काय उत्तर द्यायला हवं होतं आम्ही? ’ साधक विचारतात.
‘तो आरसा आपल्या सर्वांचाय किंवा बिलोरी आरसा कुणाचाही नाही यापैकी कोणतंही उत्तर चाललं असतं’ प्रज्ञावान म्हणतो!
ही एक झेन पॅराबल आहे, इतक्या लहानशा गोष्टीत साऱ्या अध्यात्माची उकल आहे.
___________________________________
आरसा आपल्या स्वरूपाचं सर्वात यथार्थ वर्णन करणारं रूपक आहे.
मागे मी म्हटलं होतं की जीवनातलं सर्व दु:ख जोडलं गेल्यामुळे आहे, दुसऱ्या बाजूनं बघितलं तर आपण आरसा आहोत हा बोध झाला तर आपण जोडले जात नाही. आपण आरसा आहोत याचं विस्मरण दु:खाचं कारण आहे!
ओशोंनी ईशावास्य उपनिषदात पूर्णाची व्याख्या करताना म्हटलंय, ‘परमात्मा बिना छुए सबको सम्हाले हुवे है! ’ ही आकार धारण करून, आकारात राहून आकाराला स्पर्श न करण्याची किमया म्हणजे आरसा. परमात्मा हा शब्द त्यांनी त्या निरूपणाला साजेसा म्हणून योजलाय, पण त्याचा अर्थ कुणी देव नाही तर ही चराचर व्यापून राहिलेली अथांग शून्यता असा आहे. या शून्यातच सर्व प्रकटीकरण, चलन आणि विलय आहे आणि तरीही ते शून्य जसंच्यातसं आहे हा आरशाचा अर्थ आहे.
सजगतेचा अर्थ या आरशाचं सतत स्मरण, आपण व्यक्ती भासतोय तरी आरसा आहोत या वस्तुस्थितीचं एकसंध स्मरण.
___________________________________
काय असेल कारण स्वरूपाच्या विस्मृतीच? तर आपली सदैव स्मृतीशी असलेली संलग्नता!
क्षणोक्षणी, हरेक प्रसंगात, प्रत्येक कामासाठी आपल्याला स्मृतीचा वापर करावा लागतो. स्मृती ही आरशानं जाणलेल्या वस्तूंची, व्यक्तींची, घटनांची, अनुभवांची मेंदूत झालेली नोंद आहे. स्मृतीच्या सतत वापरामुळे आरशात सदैव कसलं तरी प्रतिबिंब पडत असतं या प्रतिबिंबाशी आपण इतके एकरूप होतो की आपल्याला आपण आरसा आहोत याचा विसर पडतो.
पुढेपुढे परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की आपण स्वत:ला प्रतिबिंबच मानायला लागतो. हे इतकं कमालीच्या वेगानं घडत की लक्षात देखील येत नाही. आरशात समोरच्या व्यक्तीचं प्रतिबिंब पडतं, स्मृती ओळख पटवते आणि सांगते ‘पत्नी’ की आपण स्वत:ला पती समजायला लागतो; एका क्षणात आरशाचं पतीत रूपांतर होतं! आपण रस्त्यानं चालतोय शेजारून एक देखणी कार जाते, स्मृती सांगते ‘मर्सिडिज’, एका क्षणात आपण निर्धन वाटायला लागतो! सकाळी पेपर वाचत असतो, इतक्या हजार कोटीचा घोटाळा, याच्या किमती भडकल्या, त्याची दरवाढ झाली, खलास! आपल्याला वाटतं आपलं कसं होणार? आरसा विसरूनच जातो की जगात काय वाटेल ते होवो आपल्याला काहीही होणार नाही!
______________________________
स्मृतीचा वापर करणं वेगळं आणि तिच्या चकव्यात सापडणं वेगळं. काय आहे स्मृतीच्या चकव्यातून मुक्त झाल्याची खूण? तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसू लागेल आणि आजूबाजूचं सुस्पष्ट ऐकू यायला लागेल. ही स्थिती क्षणभर जरी टिकली तरी तुम्हाला आरशाचा बोध होईल. हा आरसा सर्वत्र आहे आणि सर्व व्यापून आहे त्यामुळे तो आहे निश्चित पण नक्की कुठे आहे ते दाखवता येत नाही. ज्या क्षणी मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला वाटेल, किती सोपी गोष्ट होती!
सारं अध्यात्म फक्त दोनच गोष्टीत एकवटलंय, एक, या आरशाचा अनुभव आणि दोन, आपण देखील मुळात आरसाच आहोत हा बोध. या दोन्ही गोष्टी जवळजवळ समकालीन आहेत, एक उलगडा झाला की दुसरा व्हायला वेळ लागत नाही. सकाळी उठल्यावर डोळे उघडून स्वस्थ बसा, समोर पाहा आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐका, तुम्हाला एकदम शांत वाटायला लागेल. ही शांतता त्या आरशाचा अविभाज्य पैलू आहे, स्मृतीचा चलतपट थांबल्यानं येणारा तो निवांतपणा आहे. एकदा तुम्हाला हा निवांतपणा कळला की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या निवांतपणाशी एकरूप व्हा.
या निवांतपणाशी एकरूप होण्याला निसर्गदत्त महाराजांनी, ‘फक्त असा’ म्हटलंय, हे नुसतं असणं इतकं स्थैर्यप्रद आहे की तुम्ही कोणत्याही प्रसंगात त्याच्या केवळ स्मरणानं अविचल राहू शकता. जितके आपण अविचल तितकी आपली प्रसंग हाताळण्याची क्षमता जास्त.
________________________________
मला विचाराल तर प्रज्ञेचं एकमेव लक्षण म्हणजे स्मृतीचा उपयोग करताना आरशाचं स्मरण, आपण आरसा आहोत या वस्तुस्थितीच स्मरण!
____________________________
झेन गुरुनं बिलोरी आरसा हातातून सोडून दिला, आरशाचा फुटण्यातून त्याला स्वरूप जाणण्याची आर्जन्सी साधकांना सुचवायची होती, त्याला सांगायचं होतं की मी इथे आहे तोपर्यंत स्वरूप जाणून घ्या, एकदा मी गेलो की तो बोध तुम्हाला देणारा दुसरा मिळणं दुर्लभ आहे. पण स्वरूपाचा आरसा एकसंध आहे, सर्वव्यापी आहे तो फुटेल कसा? तोच जर सर्व धारण करून आहे तर तो निखळेल कसा? आणि निखळून पडणार कुठे? कारण सर्वत्र तोच तर आहे! असे आपण आहोत, आरशासारखे, जाणतोय सर्व, पण निर्लिप्त!
एकसंध, अंतर्बाह्य, यत्रतत्र सर्वत्र, अनादी, अविभाज्य, आणि अस्पर्शित. सकाळी जागे व्हाल तेव्हा आरशात पाहण्यापूर्वी नुसता आरसा पाहा तुम्हाला स्वरूपाच स्मरण होईल, रात्री निजण्यापूर्वी मंद प्रकाशात रिकामा आरसा निरखा तुम्हाला स्वरूपाचा बोध होईल, मग त्या बोधात निद्रिस्त व्हा. एक दिवस तुमचा बोध इतका सघन होईल की तुमचा आरसा शरीर झोपलंय हे दर्शवेल, तुम्ही शरीर आणि मनापासून वेगळे झालेले असाल.

संजय

Thursday, November 03, 2011

५२. अभिव्यक्ती!

तुमच्या जीवनात आनंदाची विविध दालनं उघडू शकणारा हा लेख तुमच्या हाती देताना मला अतिशय आनंद होतोय, लक्षपूर्वक वाचा.
संवेदनाक्षम माणसाची एक मोठी दिशाभूल झालीये, त्याला सांगितलं गेलंय की एकतर तुला आनंद शोधायचाय किंवा मिळवायचाय आणि या मानसिकतेतून तो सदैव काही तरी शोधतोय किंवा मिळवण्याच्या मागे आहे. वस्तुस्थिती मात्र अशीये की तो स्वत: आनंद आहे आणि त्याला फक्त ‘अभिव्यक्त’ व्हायचंय.
जीवनातली घुसमट आनंद गवसला नाहीये म्हणून नाहीये तर अभिव्यक्त न होता आल्यामुळे आहे! यू डोंट हॅव टू अक्वायर बट जस्ट टू ऍकच्युअलाइज द पोटेंशियल यू ऑलरेडी हॅव.
_____________________________________
आपल्याकडे अभिव्यक्तीच्या आठ संभावना आहेत, प्रत्येकाकडे त्या कमी जास्त प्रमाणात आहेत पण एकदा एका संभावनेतून अभिव्यक्तीचा आनंद गवसला, ती सहजता आली, की बाकीच्या संवेदनाही तदनुरूप सक्रिय होतात;
म्हणजे तुम्ही सध्या चरितार्थासाठी काहीही करत असाल तरी तुमच्या अंगी असलेल्या पण तुम्ही वेध न घेतलेल्या सांगीतिक संभावनेतून तुम्हाला आनंद गवसला की मग तुमची शारीरिक, आंतर व्यक्ती, भाषिक आणि अवकाश संवेदना देखील सक्रिय होतात.
हे जरा समजून घेण्यासारखं आहे, ‘सांगीतिक संवेदना’ शांततेची जाणीव बरोबर घेऊन येते कारण शांततेच्या कॅनव्हासवर स्वराचं प्रकटीकरण आहे आणि ‘अवकाश संवेदना’ (फिल ऑफ स्पेस) स्वराच्या अभिव्यक्तीशी संलग्न आहे म्हणजे कोणत्याही ठिकाणी गोडवा निर्माण करण्यासाठी व्हॉल्यूम किती ठेवायचा याचा तुम्ही वेध घेऊ लागलात की तुम्हाला ‘स्पेसचा’ बोध व्हायला लागतो. स्पष्ट उच्चारणासाठी ‘भाषिक संवेदनेची’ प्रगल्भता लागते आणि संगीत दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं म्हटलं की ‘आंतर व्यक्ती’ (इंटर पर्सनल) संवेदना जागी होऊ लागते अशा प्रकारे आपल्या इतर अभिव्यक्तीच्या संभावना देखील एकामागोमाग एक सक्रिय होत जातात.
___________________________________
अभिव्यक्तीच्या एकूण आठ संभावना अश्या आहेत : १) भाषिक (लिंग्विस्टिक स्किल्स), २) सांगीतिक (म्युझिकल सेन्स), ३) आंतर व्यक्ती (इंटर पर्सनल), ४) अंतर्व्यक्ती संबंधी (ईंट्रा पर्सनल), ५) शारीरिक संवेदना (फिल ऑफ टोटल बॉडी) ६) अवकाश संवेदना (फिल ऑफ स्पेस), ७) निसर्ग विषयक संवेदना (फिल ऑफ नेचर अराउंड अस), आणि ८) तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता (लॉजिस्टिक अँड मॅथेमॅटिकल स्किल्स) (सौजन्य आणि धन्यवाद : अशुंमन खुर्जेकर, महाराष्ट्र टाईम्स, १९ ऑक्टोबर २०११)
(हा लेख अंशुमनच्या लेखाचं एक्स्टेन्शन नाही, त्या लेखावरून अभिव्यक्तीच्या संभावनेचा अत्यंत वेगळ्या अँगलनं घेतलेला समग्र वेध आहे)
माणसाची पूर्वापार अशी समजूत झालीये की तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता हाच बुद्धिमत्तेचा एकमेव निकष आहे! त्यामुळे तर्कपूर्ण विचारसरणी, पराकोटीची विश्लेषण क्षमता आणि त्या दोन क्षमतांच प्रश्न सोडवण्यासाठी केलेलं समायोजन यावरून एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. थोडक्यात विज्ञान आणि गणित यातली गती हा बुद्धीचा एकमेव मानदंड मानला गेलाय आणि भाषिक क्षमता संवादाचा अनिवार्य भाग असल्यानं त्यावरून बुद्धी जोखली गेलीये त्यामुळे इतर संवेदनाक्षमता दुय्यम समजल्या गेल्या आहेत.
पैसा ही मानवी जीवनाची एकमेव दिशा असल्यानं अभिव्यक्ती ऐवजी उपयोगिता प्रथम मानली गेलीये पण तुम्हाला अभिव्यक्तीची मजा घ्यायची असेल तर तुमची उपजत क्षमता आणि तदनुषंगिक अभिव्यक्ती यांचा तुम्हाला मेळ घालता यायला हवा.
ही उपजत क्षमता शोधणं आणि त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेशी मेळ घालणं हे खरं कौशल्य आहे.
____________________________________
हा मेळ घालण्यापूर्वी काही गैरसमज दूर करायला हवेत.
प्रथम ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अभिव्यक्तीला शारीरिक आणि मानसिक मर्यादा आहेत, म्हणजे कितीही प्रगाढ अनुभव असला तरी साहित्य आणि भाषेचा पुरेसा अभ्यास केल्याशिवाय लेखनातून हवी तशी अभिव्यक्ती होणार नाही.
कितीही चांगला आवाज आणि सांगीतिक समज असली तरी गाणं शिकल्याशिवाय सुरेल आणि सहज गाता येणार नाही, थोडक्यात योग्य दिशेनं पुरेसा सराव केल्याशिवाय अभिव्यक्तीची सहजता आणि आनंद दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे कितीही चांगली शारीरिक संवेदना असली तरी शारीरिक वयाला जमेल असंच क्रिडानैपुण्य प्राप्त होईल, म्हणजे कितीही थोर प्लेअर असेल तरी त्याचे रिफ्लेक्सेस वयानुरूप कमी होत जातील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती हा चमत्कार नाही, एखाद्याकडे जन्मजात कौशल्य असेल तर तो इतरांपेक्षा सरस ठरेल पण तुमचा रस, प्रयत्नांची योग्य दिशा आणि त्या अभिव्यक्तीसाठी लागणाऱ्या बौद्धिक क्षमतांची जाण यांचा योग्य मेळ घालून तुम्हाला कोणत्याही अभिव्यक्तीचा आनंद घेता येईल आणि हाच खरं तर या लेखाचा हेतू आहे.
______________________________
कोणत्याही अभिव्यक्तीत एकच महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो म्हणजे मन आणि शरीर यांचं समायोजन! बॉडी अँड माइंड कोऑरडिनेशन. मन आणि शरीर यांचं एकसंधत्व कोणत्याही सुखद अभिव्यक्तीसाठी अनिवार्य आहे.
जेव्हा एखादा बॅटसमन सुरेख फटके मारतो तेव्हा त्याला कळो अथवा न कळो, अशी प्रक्रिया घडलेली असते: बॉलच्या दिशेचा आणि उंचीचा संपूर्ण अंदाज त्याला आलेला असतो, त्या बॉलला फटका मारण्यासाठी काय शारीरिक हालचाल घडायला हवी याचा मनात प्लॅन झालेला असते आणि शरीरानं त्या प्लॅनबरहुकूम काम केलेलं असतं! आपल्याला क्रिकेट खेळता न येण्याचं कारण या तिन्ही पैकी एकही गोष्ट बॉल टाकल्याक्षणी आपल्या मनात किंवा शरीरात घडू शकत नाही, किंवा एखादा धुरंदर फलंदाज जेव्हा आऊट होतो तेव्हा त्याची या तीन पैकी एखादी गोष्ट हुकलेली असते!
तर मुद्दा असायं की अभिव्यक्ती कोणतीही असो, शरीर आणि मनाचं समायोजन हे अभिव्यक्तीच्या सहजतेचं आणि आनंदाचं गमक आहे.
जेव्हा एखादा गायक लीलया गातो तेव्हा त्याला जे गाणं किंवा जो राग तो गातोय त्याचं पूर्ण भान असतं, प्रत्येक क्षणी जे गायचंय ती फ्रेज त्याच्या संपूर्ण काह्यात असते (म्हणजे स्मृतीत तयार असते) आणि त्या फ्रेज बरहुकूम गळ्याचं समायोजन करून नेमक्या वेळात ती फ्रेज तो गाऊ शकतो त्यामुळे त्याला अभिव्यक्तीची आणि श्रोत्यांना श्रवणाची मजा येते.
गाताना यातला एक जरी घटक कमी पडला, म्हणजे गायकाचं गाण्याचं किंवा रागाचं भान हरवलं, स्मृतीत फ्रेज उमटू शकली नाही किंवा गळा स्मृतीबरहुकूम चालला नाही तर गाणं हुकतं, किमान त्या आवर्तनापुरतं तरी बेरंग होतं मग कसलेला गायक किंवा वादक श्रोत्यांना कळायच्या आत स्वत:ला सावरतो आणि पुढच्या आवर्तनात पुन्हा तो मेळ साधतो!
_____________________________________
अभिव्यक्तीसाठी लागणारी ‘दिशा’ तुमच्या त्या विषयातल्या रसामुळे निर्माण होते आणि तुमची त्या विषयाची ‘लगन’ तुमचं सरावातलं सातत्य कितपत टिकेल हे ठरवते. आपण जवळजवळ प्रत्येक कृत्य हे त्याच्या आर्थिक फलश्रुतीशी जोडल्यानं आपला रस अभिव्यक्तीच्या आनंदा ऐवजी आर्थिक लाभ आणि त्यासाठी पर्यायानंच जनमताचं शिक्कामोर्तब याकडे असतो त्यामुळे आपल्याला अभिव्यक्तीची दिशा गवसत नाही.
आनंदासाठी ‘अभिव्यक्त’ होण्याऐवजी आपण ‘निष्क्रिय पर्याय’ शोधतो. टीव्ही बघणं, एखादं क्रिडाकौशल्य स्वतः: आत्मसात करण्याऐवजी रात्रंदिवस क्रिकेट बघून त्यावर व्यर्थ पण अत्यंत जोरकस चर्चा करणं, स्वत: गाणं शिकण्या ऐवजी कोणता गायक किती महान होता आणि त्याच्या आयुष्याची नंतर काय वाताहत झाली किंवा अमकी गायिका (किंवा गायक) ग्रेट की तमकी यावर सविस्तर खल करणे, स्वत: लेखन किंवा काव्य करण्यापेक्षा बेसुमार वाचन करणे, निरर्थक आणि निरंतर पर्यटन करून रोजच्या जीवनात काहीही बदल न घडवता आपण ‘रूटीन ब्रेक केल्याचा’ भ्रामक दिलासा मिळवणे, असं काहीबाही करून आपण अभिव्यक्तीच्या आनंदापासून वंचित राहतो.
तुम्हाला अभिव्यक्त व्ह्यायचं असेल तर प्रथम तुमचा रस आणि मग त्यासाठी आवश्यक त्या (वर नमूद केलेल्या) संभावनांचं समायोजन केलं नाही तर तुमच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट सतत घडत राहील ती म्हणजे निष्क्रिय टाईमपास! स्वत:चं सक्रिय, ते कितीही साधं आणि अजिबात अपूर्व नसलं तरी तुम्हाला अभिव्यक्तीचं दालन उघडून देणारं असं विधायक काहीही हाती लागणार नाही.
जनमानसाची दाद, आर्थिक लाभ आणि एकदम काही तरी अलौकिक आणि लोकोत्तर घडवण्याची इच्छा हे निकष दूर ठेवून तुमच्या अभिव्यक्तीची दिशा ठरवा. तुम्हाला जे ओढ लावतंय, ज्यात तुम्ही देहभान विसरता असा कोणताही छंद निवडा, त्यात ‘सक्रिय सहभागी’ व्हा, मग तुमचं सरावातलं सातत्य तुम्हाला अभिव्यक्तीतली सहजता आणि नैपुण्य प्राप्त करून देईल.
_____________________________
लोकोत्तर आणि अलौकिक अभिव्यक्तीबद्दल थोडं लिहितो. जे काही जीनियस वगैरे वाटतं त्याला पराकोटीचा पूर्वानुभव, रियाज किंवा वारसा असतो. आपल्या पत्नीला दिवस गेल्याचं समजल्या क्षणी अल्लारखाँनी तिच्या कानात वेळीअवेळी तबल्याचे कायदे म्हणायला सुरुवात केली, स्वत: शिकवून रात्ररात्र वादनावर चर्चा केल्या आणि रविशंकरजी आणि रईसखाँ सारख्या दिग्गजांबरोबर पंधरा वर्षाचा असल्यापासून साथ करायला मिळाली हे झाकीरच्या लोकोत्तर होण्यामागचं (त्यानं स्वतः: सांगितलेलं) कारण आहे.
हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संगीताचा वारसा लाभलेल्या आणि त्यात चोहोबाजूनी आणि सर्वतोपरी निमग्न असलेल्या प्रतिभावान संगीतकारानं, कोणतीही नवी अभिव्यक्ती हे अंतर्मनात रुजलेल्या स्मृतींचंच वेगळं समायोजन आहे असं प्रामाणिकपणे कबूल केलंय.
आपल्या अभिव्यक्तीला मर्यादा असतील, ती काही विलक्षण आणि असामान्य असणार नाही पण तुम्ही मला समजावून घेतलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न अलौकिकत्वाचा नाहीये, अभिव्यक्त होण्याचा आहे.
तुमच्यातल्या अभिव्यक्तीच्या उपजत संभावनेचा वेध घेऊन, मन आणि शरीर यांचा मेळ घालून तुम्हाला अभिव्यक्ती साधायचीये. अर्थप्राप्ती, जनमानसाची वाह्व्वा किंवा अभिव्यक्तीतली असामान्यता या दिशाभूल करणाऱ्या परिमाणांकडे दुर्लक्ष केल्याशिवाय अभिव्यक्ती साधणं असंभव आहे.
ओढ लावणारी संभावना आणि शरीर आणि मनाच्या एकसंधतेतून होणारी अभिव्यक्ती हा आनंदाचा एकमेव निकष आहे आणि मी तुम्हाला निर्विवादपणे सांगतो की आनंद अभिव्यक्त होण्यात आहे, मग तो जगातल्या कोणाही दिग्गज वादकाचा, गायकाचा, किंवा प्रतिभावान चित्रकाराचा, लेखकाचा, कवीचा, की निष्णात प्लेअरचा, किंवा कमालीच्या लोकप्रिय अभिनेत्याचा की अभिनेत्रीचा अथवा खुद्द तुमचा असो तो एकच आहे!
संजय

Sunday, October 16, 2011

५१. विवाह!

विषयप्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करतो, विवाह हा मानवी जीवनातला अप्रतिम संस्कार आहे. विवाह ही निव्वळ कल्पना आहे हे मी निर्विवादपणे मांडणार असलो तरी कल्पना अफलातून आहे. लग्नाशिवाय मानवी मुलाचं योग्य संगोपन अशक्य आहे, स्वयंपूर्ण व्हायला निसर्गात सर्वाधिक कालावधी लागणारं माणसाचं मूल कुटुंबाशिवाय आयुष्यात उभंच राहू शकणार नाही. अयोग्य संगोपनातून असह्य व्यक्तीगत आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि त्याला पाश्चिमात्यांच्या जीवनाचा उडालेला बोजवारा साक्षी आहे. लग्न या संस्काराबद्दल मला नितांत आदर आहे.

खुद्द ओशो आणि असे अनेक विचारवंत जरी लग्नाच्या कितीही विरोधात असले आणि तो सोहळा अनैसर्गिक मानत असले तरी माझ्या मते मानवी आयुष्याचा जन्म ते मृत्यू असा समग्र विचार केल्यानंतर विवाहविरोधी विचारांशी मी संपूर्ण असहमती दर्शवतो.

विवाहाचा संस्कार कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक प्रगतीत अडसर नाही आणि तो भौतिक जीवन सुखद करतो फक्त ते नातं, त्या संबंधातली खुमारी कळायला हवी. ज्यांनी म्हणून अध्यात्मात संसार अडथळा मानलाय त्यांना संसारही जमला नाहीये आणि अध्यात्मही नाही हे मी आज दोन्ही सार्थ करून नि:संशयपणे सांगू शकतो.

या लेखनाचे दोन हेतू आहेत, एक म्हणजे तुम्हा सर्वांना उपयोग व्हावा, या अफलातून नात्याची मजा यावी म्हणून मी माझा व्यक्तीगत अनुभव तुमच्याशी शेअर करतोय आणि दोन, विवाहेच्छुक जे लिव्ह-इनची तकलादू स्वप्न बघतायत आणि मल्टीपल रिलेशन्सच्या मृगजळामागे धावतायत त्यांना वस्तुस्थितीची कल्पना यावी.

तुमच्या सध्याच्या वैवाहिक संबंधात मजा यावी हा माझा अत्यंत प्रार्थमिक हेतू आहे, सेपरेशन ही अत्यंत असह्य गोष्ट आहे आणि एकदा सवय लागली की मग जी धरसोड वृत्ती तयार होते त्यातनं स्वास्थ्य असंभव आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या धारणा, आतापर्यंतची त्या संबंधातली वाटचाल, तुमचे एकमेकांविषयीचे समज संपूर्णपणे बाजूला ठेवून ज्या प्रामाणिकपणे मी हा लेख लिहिलाय तितक्याच प्रामाणिकपणे हा रंग तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा अशी आशा आहे... आणि जर हा रंग तुमच्या जीवनात आधीच असेल तर तो इतरांशी शेअर करून या विषयाची विधायकता वृद्धींगत करावी अशी इच्छा आहे.
_________________________________

पहिली गोष्ट, पारस्परिक आकर्षण हा विवाहाचा प्रमुख पैलू आहे. हे आकर्षण काय आहे याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ते दैहिक आहे, मानसिक आहे आणि भावनिकही आहे आणि त्यात फक्त एकच गोष्ट नक्कीये की ती ‘संपूर्ण व्यक्ती’ आपल्याला प्रिय आहे! खरं तर आपण एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते हे मुद्देसूदपणे आपण सांगू शकलो तर ती व्यक्ती केव्हाही न आवडायला लागण्याची शक्यता आहे. हे विश्लेषण न करता येणारं आकर्षण विवाहाचा केंद्रबिंदू आहे.

तुम्ही जर वैचारिक विवाह केला असेल तर वैवाहिक संबंधाची मजा येण्याची शक्यता कमीये कारण तुम्ही कॅलक्युलेटेड डिसीजन घेतलाय, दोघांच्या व्यक्तिमत्त्वातली दरी दूर करणं जरा मुष्किल आहे. अर्थात याला पण उत्तर असेल पण हा पैलू मी तुमचे प्रतिसाद बघून मग त्यावर उत्तर म्हणून लिहीन.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमची पत्नी किंवा पती पूर्णपणे स्वीकृत असायला हवी आणि त्या स्वीकृतीचं तुमच्याकडे काहीही कारण नको. हा पूर्णपणे हृदयानं घेतलेला निर्णय हवा, बुद्धीनं नाही, त्यात कोणतीही कारणमीमांसा नको. तुम्ही स्वतःला:ला पूर्णपणे डावावर लावून खेळलेला तो जुगार हवा, इट हॅज टू बी अ मॅडनेस ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी!
काय असेल या पूर्ण स्वीकृतीचं कारण? तर एकच, की त्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला नेहमी सुखद वाटतो, यू आर ऍबसोल्यूटली कंफर्टेबल इन इच अदर्स कंपनी. तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांबरोबर असता तेव्हा तुमच्या दोघांचं मिळून एक वेगळं जग तयार झालेलं असतं. सर्व वैवाहिक जीवनाची खुमारी या ‘निर्भार सहवासाच्या’ सुखात आहे. एका अर्थानं तुम्हाला ती आपल्या बरोबर आहे हे जाणवत देखील नाही आणि एका अर्थानं तुमचा आनंद शेअर करायला तुम्ही जर जगातली कोणतीही व्यक्ती निवडायची म्हटली तर पहिला पर्याय निर्विवादपणे तुमची पत्नी असते!
______________________________________

विवाहाला अत्यंत थोर आध्यात्मिक परिमाण आहे. महावीरानं म्हटलंय ‘एनलाइटन्मेंट इज दि अल्टिमेट अनफोल्डमेंट ऑफ सेल्फ! ’ स्वतः:ला पूर्णपणे उघडणं म्हणजे साक्षात्कार! माझ्या अनुभवानं तुमची पत्नी किंवा पती हे या अनफोल्डमेंटचं द्वार आहे, तुम्ही एकमेकांप्रती दैहिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही अंगांनी निर्वस्त्र होऊ शकता.

काय असावं महावीराच्या या अफलातून व्याखेचं रहस्य? ते असंय की तुम्ही स्वतः:ला संपूर्णपणे उघडलंत, ते साहस केलंत तर तुमच्या लक्षात येतं, अरे! आत कुणीच नव्हतं; न तिच्या, न तुमच्या! तुम्ही आकाश होता आणि ही संधी तुम्हा दोघांना समप्रमाणात असते. जगातल्या प्रत्येक वैवाहिक दु:खाचं फक्त एकच कारण आहे, स्वतः:ला स्वतः:च्या पती किंवा पत्नीपासनं लपवणं! मग त्या नात्यातली खुमारी संपते, तो सहवास ओझं होतो, माणूस सुखाचा वेध घराबाहेर घ्यायला लागतो. जीवनाची दिशाच बदलते, अनावश्यक कार्यमग्नता, वारसा असेल तर किंवा तशी सभोवतालची मंडळी असतील तर राजकारण, कधी व्यसनाधीनता तर कुठे विवाहेतर संबंध आणि अगदीच काही नसेल तर आनंदासाठी चुकीचा आध्यात्मिक प्रवास असं आयुष्य होतं. एकमेकांच्या सहवासाचा आनंद जो घरातल्या घरात सौख्य निर्माण करू शकला असता, तो हुकतो.

परस्परांशी ट्यूनिंग जमलेलं जोडपं आणि एक सुरेख संगोपन केलेलं मूल, असं कुटुंब सृजनात्मक जगण्याचे अनेक विकल्प निर्माण करू शकतं. इतकंच नाही तर अशा कुटुंबातून, सर्वांची काळजी घेणारं एकत्रित कुटुंब, संपन्नता आणि वैश्विक शांततेची शक्यता निर्माण होऊ शकते हा माझा आशावाद आहे.
______________________________

आता खुद्द वैवाहिक जीवन काय आहे ते पाहू.

वैवाहिक संबंध ही केवळ पारस्परिक मान्यता आहे या एका बोधासरशी त्या नात्यातलं ओझं संपतं! नाऊ ट्राय टू अंडरस्टॅंड, हे एकदम महत्त्वाचंय, एखादी गोष्ट कल्पना आहे हा बोध सुज्ञ व्यक्तीला दोन पर्याय उपलब्ध करतो. एकतर तो ती गोष्ट अत्यंत सहजपणे पेलू शकतो कारण ती त्याच्या आयुष्याचा अनिवार्य आणि असह्य भाग आहे या भ्रमामुळे त्याला ती जड झालेली असते; ते ओझं उतरून जातं!

वेळ ही वास्तविकता नसून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होणारा भास आहे हे समजता क्षणी आपण वेळेचं ओझं सहज पेलू शकतो, वेळेचं टेन्शन राहत नाही, अगदी तसं!

आणि दुसरी गोष्ट या हलकेपणातून तो त्या नात्याप्रती जास्त जवाबदार होतो, त्याची आपुलकी वाढते!
हे थोडं विरोधाभासी वाटेल पण वेळेचं ओझं नाहीसं झाल्यावर तुम्ही जास्त वक्तशीर होता, तुमची कामं वेळेपूर्वीच संपायला लागतात! कारण वेळेचा धसका संपल्यानं उपलब्ध झालेली एनर्जी युनीडायरेक्शनल होऊन कामाकडे लागते! हे देखील तसंच आहे, संसार हलका झाल्यानं तो पेलायला व्यक्ती अधिक सक्षम होते. यू बिकम मोर एफिशियंट इन हँडलींग द रिलेशनशिप! आणि त्या नात्यात मजा येऊ लागल्यानं तुम्ही जास्त जवाबदारीनं ते नातं निभावू लागता!
_________________________________

सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत (माझ्या ‘अर्थ, काम आणि मोक्ष’ या लेखात मी या विषयी सविस्तर लिहिलंय म्हणून पुन्हा लिहीत नाही) पण अत्यंत निर्विवादपणे, एकमेकांविषयीच्या आकर्षणातून निर्माण झालेला पारस्परिक अनुबंध, निर्वेध चित्तदशा आणि दुसऱ्याला सुख देण्याची आस या तीन गोष्टींशिवाय तृप्त करणारा प्रणय अशक्य आहे.

मनाविषयीच्या माझ्या अत्यंत सखोल, विस्तृत आणि सर्वांगीण अभ्यासावरून मी सांगतो की सार्थक प्रणयाला विवाह हे एकमेव उत्तर आहे. ती कमिटमेंट, ती ओढ, तो निर्धास्तपणा, एकमेकांविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेतून येणारी ती शेअरींगची उत्कटता दुसऱ्या कोणत्याही संबंधात अशक्य आहे.

कुणीही विवाहेतर संबंधाबद्दल कितीही फुशारकी मारली, चित्रपट आणि सिनेसृष्टीत काहीही चित्तवेधक घटना घडल्या आणि दाखवल्या गेल्या, कुणाही प्रतिभावान लेखकानं काहीही वर्णन केलं तरी तो निव्वळ कल्पना विलास आहे, जे घडलं नाही ते दाखवण्याचा तो प्रयत्न आहे.

आणि त्या ही पुढे जाऊन मी सांगीन की कुणाही राजानं कितीही मोठा जनानखाना ठेवला आणि कितीही आणि कसाही शृंगार केला तरी त्याचा प्रणय सार्थक होणार नाही कारण जोपर्यंत राणी एकुलती एक नाही तोपर्यंत राणीसाठी तो प्रणय तृप्तिदायी नाही आणि जो राणीला तृप्त करत नाही तो प्रणय राजाला कदापिही तृप्त करणार नाही!
सार्थक प्रणय म्हणजे जो दोघांना स्वतः:प्रत आणतो, कमालीचं स्वास्थ्य निर्माण करतो आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचं निरसन झाल्यामुळे जो समाधीचं सुख देतो असा प्रणय!
______________________________

मी जेव्हा मानवी जीवनाच्या जन्म ते मृत्यू अशा समग्रतेनं केलेल्या विचाराला विवाह हे अत्यंत सौख्यदायी उत्तर आहे असं म्हणतो तेव्हा मला दोन गोष्टी अभिप्रेत आहेत. एका परस्परांशी अनुबंध जुळलेल्या जोडप्याच्या सार्थक प्रणयातून जन्मलेलं मूल ही आयुष्याची अत्यंत विधायक सुरुवात आहे. अशा कुटुंबातलं संगोपन हे पुन्हा अहोभाग्य आहे. मृत्यू अनिवार्य आहे पण त्याची तृप्ती, त्याची उत्कटता व्यक्ती किती समाधानानं आणि आनंदात जगली यावर आहे.

तुम्हाला जर आनंदाच्या तिन्ही परिमाणांची (दैहिक म्हणजे दृक, श्राव्य, गंध, स्वाद आणि स्पर्श, मानसिक म्हणजे चित्ताची प्रसन्नता आणि आध्यात्मिक म्हणजे शून्याचा बोध) उपलब्धी संसारातच झाली तर मृत्यू हा परम आनंदाचा सोहळा आहे कारण जे जे म्हणून जगायला आणि भोगायला हवं होतं ते तुमचं जगून आणि भोगून झालंय. आता ज्या शरीरानं आपण हे भोग भोगले, या प्रकट जगाचा आनंदोत्सव अनुभवला ते शरीर लयाला जाईल आणि आपण शांत झोप आल्यावर तिला अविरोध समर्पित होतो तसं ते मृत्यूच्या हवाली करून निसर्गाच्या या अफलातून बुद्धिमत्तेप्रती कृतज्ञ होऊ.

संजय

Saturday, October 08, 2011

५०. उत्सव!

उत्सव या लेखानं माझ्या लेखमालेची अर्धशताब्दी होतेय. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे मला लिहीत राहावंस वाटलं, तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!_________________________________________

विषयात उतरण्यापूर्वी एक सांगावंस वाटतं की तुम्ही लेखनातली तरलता समजून घ्या. मी सत्य वेगळ्या पद्धतीनं मांडतोय, एकदम सोपं, ओघवतं आणि तुम्हाला स्पर्श करेल असं. शब्दांच्या योजनेत मी प्रवाहीपणा आणतोय, साध्या, सोप्या, रोजच्यातल्या शब्दांची निवड केलीये कारण शब्द गौण आहे, अर्थ महत्त्वाचायं, तुम्ही ओपन राहा तुम्हाला मजा येईल.उत्सव हा एक मूड आहे तो तनमनात भिनवावा लागतो. सभोवतालची परिस्थिती तितकिशी साथ देत नाही पण तुम्हाला लावून धरावं लागतं. आपण उत्सवपूर्ण होतो तेव्हा कुणाच्या विरुद्ध नसतो पण जनमानसाची स्थिती दारुण आहे त्यामुळे आनंदी माणूस ऑड वाटतो. लोक ठरवून ठरवून प्रसंग गंभीर करतात, काहीही प्रसंग नसेल तर गंभीर विषय आणि भेदक चर्चा छेडतात आणि तशात तुम्ही मूड लाइट करण्याचा प्रयत्न केलात तर सगळे तुमच्यावर उसळतात पण उत्सव हा सत्याप्रत जाण्याचा मार्गही आहे आणि ती सत्य गवसल्याची अभिव्यक्ती पण आहे, त्यामुळे सेलिब्रेशन काय आहे आणि तो रंग आयुष्यात कसा उतरवायचा हे समजून घेणं एकदम अगत्याचं आहे.
______________________________

मला विचाराल तर जगातल्या सर्व दु:खाचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे ‘जोडलं जाणं’! दॅटस ऑल! द होल ट्रबल इन लाईफ इज जस्ट अ जॉईंट-पेन! सर्व भवताप हा केवळ संधिवात आहे. या एकमेव कारणापलीकडे दु:ख नाही मग ते कोणतंही असो, शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक.
शारीरिक दु:खाला जरा तरी वास्तविकता आहे आणि त्या दुःखाला वैद्यकीय इलाज आहे पण मानसिक आणि भावनिक दु:ख निव्वळ जोडामुळे निर्माण झालेलंय आणि कितीही साधना केली आणि जोड सुटला नाही तर त्याची परिणिती दारुण आध्यात्मिक दु:खात आहे.

आता हे अफलातून महत्त्वाचंय, एकदम लक्षपूर्वक वाचा.

कुठायत हे जोडबिंदू? तर तीन ठिकाणी, तीन बिंदूंमुळे आपण जोडले गेल्यासारखे वाटतो. पाठ टेकून एकदम रिलॅक्स्ड बसा, वेळ रात्रीची असेल तर उत्तम, पहिला बिंदू तुमचे ओठ आणि जीभ यांच्या मध्ये आहे, हे शब्दाचं जन्मस्थान आहे. या बिंदूवर तुमचं अवधान केंद्रित करा, तुम्हाला पहिल्यांदा आजूबाजूला काय चाललंय ते स्पष्ट ऐकू यायला लागेल, सगळं अचानक शांत झाल्यासारखं वाटेल.

काय असेल या शांत वाटण्याचं कारण? तर तुम्ही मनाच्या एका फॅकल्टीतून, ‘म्हणजे आत सतत चालू असलेल्या बोलण्यातून’, मुक्त झालात.

आत मध्ये जी सदैव बडबड चालू होती आणि जीनं तुमचं लक्ष संपूर्णपणे वेधून घेतलं होतं ती थांबली. जे बोलणं अनावर झालं होतं, या आयुष्यात कधी थांबणार नाही असं वाटत होतं ते थांबलं.

शांता शेळक्यांनी लिहिलंय :

माझीया मना जरा थांबना
पाऊली तुझ्या या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

ही वेदना संपली, शांतता प्रस्थापित झाली! का थांबला हा अविरत सुरू असलेला लक्षवेधी संवाद? तर तुम्हाला जे वाटत होतं की ‘आपणच बोलतोय’ तो भ्रम संपला, जर आपणच बोलत असू तर थांबवणार कोण? मन बोलत होतं, आपल्याला ऐकू येत होतं पण आपल्याला वाटत होतं आपणच बोलतोय, हा पहिला जोडबिंदू निखळला, तीन पैकी एका परिमाणातून तुम्ही मुक्त झालात!

दुसरा जोडबिंदू कपाळात आहे, कपाळ हा मनाच्या विडीओचा स्क्रीन आहे. जसा ओठ आणि जीभ यात मनाच्या ऑडिओचा माइक आहे तसा त्याचा दुसरा भाग, दृश्य दाखवणारा पडदा, कपाळात आहे. प्रत्येक संवेदनेसरशी कपाळाच्या पडद्यावर तदनुषंगिक दृश्य प्रकट होतंय. ही प्रक्रिया आत्यंतिक वेगानं घडतेय, सरळ प्रसंगच अंत:चक्षू (म्हणजे बंद केलेल्या डोळ्यां) समोर सरकतोय. आणि तुम्ही अत्यंत सावधपणे बघितलंत तर भर दिवसा असे प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोरून सरकतायत.या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूचा वेध अत्यंत साकल्यानं घ्यायला हवा कारण आपली नजर स्थिर नाहीये, ती पटकन दृश्यात गुंतून जाते आणि आपण मन:चक्षूं समोर चाललेल्या प्रसंगात हरवून जातो, इतके की आपल्याला वाटतं खरंच तो प्रसंग घडतोय, आपल्याला वास्तवाचा, सद्य स्थितीचा संपूर्ण विसर पडतो. कोणतीही संवेदना झाल्या क्षणी तुम्ही सावध व्हा आणि ज्या क्षणी तुम्हाला कपाळात प्रकट झालेलं दृश्य दिसेल त्या क्षणी तुम्ही दुसऱ्या जोडबिंदू पासून मुक्त झालेले असाल, वर्तमानात आलेले असाल, आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण शरीराचा एकसंध बोध तुम्हाला होईल, तुम्ही शरीरापासून वेगळे झालेले असाल, विदेह झालेले असाल!

आता हे अत्युच्च आहे, एकदम नीट वाचा. हा दुसरा जोडबिंदू एकदम मजेशीर आहे, या बिंदूमुळे, म्हणजे या बिंदूशी जोडलं गेल्यामुळे आपल्याला दुहेरी भास होत असतो, एक, आपण शरीर आहोत आणि दोन, आपण प्रसंगात सापडलेली व्यक्ती आहोत! अँड माइंड यू, हा भास एकदा नाही, दोनदा नाही तर सतत होत असतो. जागेपणी तर होतच असतो पण स्वप्नात सुद्धा होतो, आपण सदैव दृश्यानं घेरल्यासारखे वाटतो.

ईलही जमादारच्या ओळी आहेत:

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलही
दाही दिशा कशाच्या,
हा पिंजरा असावा

अशी आपली स्थिती झाल्यासारखी वाटते, कुठेही जा सुटका नाही पण हा बिंदू गवसता क्षणी तुम्ही एकदम मोकळे होता, तरल होता, आकाश होता. काय कारण असेल या मुक्ततेचं? या हलकं वाटण्याचं? तर आपण निराकार आहोत, केवळ या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूनी आपलं लक्ष सतत वेधून घेतल्यानं आपल्याला आपण आकार झाल्याचा भास होत होता, तो भास संपला म्हणून ही तरलता आहे, आपण निर्भार झालेलो आहोत.

संपूर्ण शरीराची जाणीव हा तिसरा जोडबिंदू आहे, पहिल्या दोन जोडबिंदूंसारखं त्याचं ठराविक स्थान नाहीये, इट इज अ ‘फिल’!. हे जरा समजून घेण्यासारखं आहे, एकदम नजाकतीचं आहे, लक्षपूर्वक वाचा.

तुम्ही कधी गाणं म्हणत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला संगीताची शास्त्रीय माहिती काहीही नसली (म्हणजे लय, ताल, स्वर, सम) तरी गाणं चुकलंय हे लगेच लक्षात येतं. काय असेल याचं कारण? त्याचं कारण असंय की स्वर, लय, ताल आणि सम हे सगळं मिळून एक फिल आहे. तुम्हाला लय सांगता येईल, स्वर गाऊन दाखवता येईल, ताल हातानं धरता येईल, सम थोड्या प्रयत्नानं समजेल पण हा फिल जाम दाखवता येणार नाही कारण हा फिल म्हणजे खुद्द आपण आहोत! लय, ताल, स्वर, सम सर्व जाणणारी निराकार जाणीव आहोत, म्हणजे ‘आहोत’ नक्की पण ‘नक्की असे’ कुठे नाही आहोत, किंवा इतके सर्वत्र आहोत की त्यामुळे नक्की कुठे आहोत हे सांगता येत नाहीये.
हा तिसरा जोडबिंदू दोन परिमाणांचा बनलाय, एक म्हणजे आपल्याला संपूर्ण शरीराची जाणीव आहे त्यामुळे आपण कुठे तरी आहोत असं वाटतंय, (थोडक्यात जिथे शरीर आहे तिथे आहोत असं वाटतंय) आणि ‘कुठे तरी आहोत’ म्हणून ‘कुणी तरी’ आहोत असं वाटतंय (म्हणजे व्यक्ती आहोत असं वाटतंय). ज्या क्षणी हा तिसरा जोडबिंदू किंवा हा भार-बिंदू तुमच्या लक्षात येतो, तुमच्या जाणीवेच्या कक्षेत येतो त्या क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त होऊन फक्त एक तरलता होता, एक निर्भार उपस्थिती होता! आपण कुणीही नाही आणि कुठेही नाही अशा अत्यंत तरल स्थितीला तुम्ही येता, आणि तुमच्या जीवनात उत्सव सुरू होतो!

____________________________

उत्सवाला तीन परिमाणं आहेत, ती नुसती लक्षात आली की काम झालं!

पहिलं परिमाण म्हणजे आपण अस्तित्वाशी समरूप आहोत, वी आर वन विथ द एक्झिसटन्स. याची नुसती दखल घ्या, म्हणजे ज्याप्रमाणे इतर सजीव आणि निर्जीवांची काळजी अस्तित्व घेतंय त्याचप्रमाणे आपणही अस्तित्वाच्या छत्रछाये खाली आहोत, आपण इथे उपरे नाही, आपल्याला निराकार अंतर्बाह्य घेरून आहे.

दुसरी महत्त्वाची आणि या एकरूपतेतून येणारी गोष्ट म्हणजे, ज्या बुद्धिमत्तेनं हे अस्तित्व सक्रिय आहे तीच बुद्धिमत्ता आपल्याला देखील क्षणोक्षणी उपलब्ध आहे, काय करावं, कोणती दिशा घ्यावी, काय सुखाचं, सहज आणि आनंदाचं होईल हे जसं पशुपक्ष्यानां समजतंय तसं आपल्यालाही समजू शकतं कारण आपल्या जाणीवेशी अस्तित्वाची बुद्धिमत्ता एकरूप आहे.

तिसरी गोष्ट, आपण आणि अस्तित्व यात कुठेही भेद नाही त्यामुळे आपल्याला मृत्यू नाही कारण अस्तित्व लयाला जाऊ शकत नाही, म्हणजे प्रकट जग ज्याप्रमाणे एखादं शरीर लयाला जातं तसं लयाला जाईल पण ज्यात ते प्रकट झालंय तो निराकार तसाच राहील. आपण अस्तित्वाशी समरूप आहोत म्हणजे निराकाराशी एकसंध आहोत आणि आकारातून प्रकट झालोत त्यामुळे शरीर लयाला जाईल पण आपण तसेच राहू, सध्या आपल्या उपस्थितीला शरीराचं आवरण आहे, मृत्यूनंतर ती उपस्थिती निराकार होईल इतकंच.

या तीन गोष्टी लक्षात आल्या की जीवनात उत्सव सुरू होतो कारण आपण आकारात असूनही आकाराशी जोडलेलो नसतो, कुठेही जोडलेलो नसल्यानं सदैव तरल असतो आणि ही तरलता अस्तित्वागत बुद्धिमत्तेशी संलग्न असल्यानं क्षणोक्षणी नवे स्वच्छंद विकल्प आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण अस्तित्वासमवेत त्या उत्सवात रंगून जातो.

संजय

Thursday, September 01, 2011

४९. समाधी

समाधी या अफलातून डायमेन्शनवर मी आज लिहिणार आहे. हा लेख तुमचे सर्व आध्यात्मिक गैरसमज दूर करेल आणि तुम्ही जर शांतपणे, अत्यंत मन:पूर्वक वाचला तर तुम्हाला त्या स्थितीचा अनुभवही देईल.
पहिली गोष्ट, समाधी ही व्यक्तिगत बाब नाही ती अस्तित्वागत आणि सर्वकालीन स्थिती आहे. आपण जेव्हा अमका समाधी अवस्थेला पोहोचला तमक्याला समाधी अवस्था प्राप्त झाली असं म्हणतो तेव्हा समाधी ही वैयक्तिक घटना आहे असं वाटतं पण ते तसं नाही. कुणीही आणि केव्हाही त्या स्थितीचा अनुभव घेऊ शकतं आणि त्या स्थितीत राहू शकतं. खरं तर समाधी ही गुरुत्वाकर्षणासारखी स्थिती आहे आणि ती हर क्षणी प्रत्येकाला आकर्षित करतेय, आपण दैनंदिन विवंचनात गुंतल्यानं आणि त्या स्थितीची दखल न घेतल्यानं ती जाणवू शकत नाही इतकंच.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, समाधी ही प्रत्येक सजीव आणि निर्जीवाची देखील आंतरिक स्थिती आहे. हे जरा लक्षात घेण्यासारखं आहे म्हणून थोडं विस्तृत लिहितो..
ओशोंनी म्हटलंय ‘एन्लाईटन्मेंट इज द स्टफ विथ वीच द एक्झिसटन्स इज मेड’ याचा अर्थ समाधीनंच सर्व अस्तित्व बनलंय म्हणजे ती स्थिती केवळ अंतर्बाह्य व्यापून आहे असं नाही तर प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू समाधीचंच ‘रूपांतरण’ आहे. ही अफलातून गोष्ट लक्षात घ्या, समाधी आपल्या आतबाहेर आणि सर्वत्र तर आहेच पण आपण स्वतःला कुणीही समजत असलो तरी खुद्द आपणच ‘समाधी आहोत’, ती सर्वकालीन समस्थिती आहोत!_______________________________
हा फार नजाकतीचा विषय आहे, बघा समजतंय का, नाही समजलं तर पुन्हा वाचा, समजेल.
समाधीही अस्तित्वाची एक स्थिर आणि अविचल स्थिती आहे आणि तिची अनेक परिमाणं आहेत, त्यातलं शांतता हे एक सर्वज्ञात परिमाण आहे.
नाऊ ट्राय टू अंडरस्टॅंड, धिस इज इंटरेस्टिंग.
प्रत्येक ध्वनी हे शांततेचं रूपांतरण आहे कारण ध्वनी शांततेतच निर्माण होतो आणि शांततेतच विरून जातो. कोणताही ध्वनी निर्माण होतो किंवा आपण कोणताही ध्वनी निर्माण करतो तेव्हा आपण काय करतो किंवा नक्की काय होतं? आपण शांतता ‘हालवण्याचा’ प्रयत्न करतो, कोणताही ध्वनी शांततेत कंपनं निर्माण करतो. आपण शांततेला ध्वनीचं रूप देण्याचा प्रयत्न करतो. एका अर्थानं शांतता ही सार्वभौम आहे आणि एका अर्थानं ती फक्त ‘ध्वनीचा अभाव’ आहे, इट इज ‘नथिंगनेस’, त्यामुळे शांतता हालणं असंभव आहे. शांतताही एक निरवस्तु आहे, ती सर्वव्यापी आणि अनिर्बध स्थिती आहे, शांतता हालवायला तुम्हाला शांततेच्या बाहेर जायला हवं पण ते असंभव आहे. हाऊ कॅन वन ट्रान्सेंड द सायलेंस? तिच्यात जे सामावलंय ते हालेल पण खुद्द शांतता कशी हालेल?
हे असंही मांडता येईल, शांतता हा नथिंगनेस आहे, आभाव आहे या आभावाचं रूप कसं बदलू शकेल? विज्ञानाच्या म्हणण्या प्रमाणे एका वस्तुचं दुसऱ्या वस्तूत रूपांतर होऊ शकेल पण जी वस्तूच नाही तिच्यात कसा बदल होईल?
शांतता हे समाधी या अविचल स्थितीचंच रूप असल्यानं ती हालणं अशक्य आहे किंवा ती अनिर्बध व्यापकत्व असल्यानं ध्वनी निर्माण होईल आणि विरून जाईल; त्या अविचल सनातन व्यापकत्वावर त्याचा सकृद्दर्शनी परिणाम झाला असं वाटलं तरी काहीही परिणाम होणार नाही.
मग अशा स्थितीतही ध्वनीचा शांततेवर परिणाम झाल्यासारखा वाटतो, तो कशानं? तर ध्वनी निर्माण झाल्यावर आपण ध्वनीकडे उन्मुख होतो आणि ज्या क्षणी आपण ध्वनीकडे उन्मुख होतो त्या क्षणी आपल्याला स्वतः:चा विसर पडतो, आपण स्वतः: अविचल आहोत, आपल्यावर कसलाही परिणाम होत नाही याचं आपल्याला विस्मरण होतं आणि ध्वनीचा शब्द, शब्दाचा अर्थ आणि मग त्यातून मागच्या स्मृती, पुढची चित्रं, भावना, विवंचना असा कल्लोळ सुरू होऊन मग ‘आता काही तरी उपाय करायला हवा’ असं मनानं तुम्हाला पटवलं की शरीर सक्रिय होतं आणि मग आपल्याला वाटतं आपण निघालो! शांततेला स्वतः:चं इतकं विस्मरण होतं की तिला वाटतं आपण देह आहोत, नश्वर आहोत, प्राक्तनानं बद्ध आहोत आणि संसारात सापडलोत आता काही तरी उपाय करायला हवा! मग आपलं सभोवतालच्या घटनांशी इतकं तादात्म्य होतं की आपल्याला वाटतं आपणच हालतोय!
आपण कधीही हालत नाही, आपलं फक्त लक्ष वेधलं जातं, हे लक्ष वेधलं जाणं आपल्याला स्वतः:चं विस्मरण घडवतं, आपण समाधी आहोत, आपण ती शांतता आहोत याचा विसर पडतो, हे लक्षात आलं की तुमचं काम झालं!
___________________________________________
जाणीवेची तीन परिमाणं आहेत आणि जाणीवेमुळेच आपलं लक्ष वेधलं जातं ही अत्यंत प्रार्थमिक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. निराकाराचं आकारात रूपांतर करणारी एकमेव प्रक्रिया जाणीव आहे. हे रूपांतरण म्हटलं तर वास्तविक आहे पण ते कालबद्ध असल्यानं स्वप्नवत आहे, आज आहे, उद्या नाही किंवा आता होतं, आता नाही, जागेपणी आहे, झोपेत नाही!
निसर्गदत्त महाराज म्हणतात, सर्व जग हा ‘जाणीवेत चाललेला खेळ आहे’! म्हणजे सूर्य ही अत्यंत व्यापक वस्तू घ्या, जोपर्यंत सूर्याची जाणीव होत नाही तोपर्यंत (तो सदैव असला तरी) आपल्यासाठी नसल्यासारखाच असतो. तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती घ्या जोपर्यंत त्या व्यक्तीचा आपल्या जाणीवेच्या कक्षेत प्रवेश होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती नसल्यासारखीच असते. थोडक्यात जाणीवेमुळे जग सार्थक आहे.
हीच गोष्ट अशीही मांडता येईल, जोपर्यंत जाणीवेतली घटना किंवा वस्तू आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेत नाही तोपर्यंत आपल्यावर तिचा परिणाम होऊ शकत नाही. आपल्या अगदी डोळ्यासमोर जरी अपघात झाला आणि त्यात आपलं कुणीही हितसंबंधी नसलं तर ती घटना आपल्यासाठी फक्त घटनाच राहते याचं कारण घटनेची जाणीव आपलं 'संपूर्ण लक्ष' वेधून घेऊ शकत नाही. या उलट एखाद्या झोका खेळणाऱ्या मुलावर संपूर्ण लक्ष केंद्रित झालेली आई झोक्यानं जरासा आडवा हेलकावा घेतला तरी शहारून उठते, याचं कारण माया, भावना, सहृदयता वगैरे जरी म्हटलं असलं तरी खरं कारण जाणीवेनं आपल्या मूळ स्थितीचं, समाधीचं केलेलं ते परिवर्तन असतं! अविचल स्थिती विचलित झालेली असते.
जाणीवेची तीन परिमाणं अशी आहेत:
एक, शरीर; शरीर ही एक संवेदना आहे, जाणीव आहे. तुम्ही शरीराचा एकसंध वेध घ्या, ‘संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे’ हा तुमचा अनुभव करा, ती वस्तुस्थिती आहे. आपण वेगवेगळ्या शारीरिक संवेदनांकडे वेगवेगळ्या वेळी लक्ष दिल्यानं शरीराच्या एकसंध जाणीवेचा आपल्याला बोध होत नाही.
भूक, तहान, उत्सर्ग, स्पर्श, गंध, दृष्टी, श्रवण, स्वाद, शारीरिक वेदना असे आपण शरीर या एकसंध जाणीवेचे वेगवेगळे भाग केल्यानं शरीराचा आवाका मोठा वाटतो. तुम्ही शरीर हीच एक जाणीव आहे हा बोध सघन करा. तुम्ही स्त्री आहात की पुरुष यानी काही फरक पडत नाही. तुम्हाला जर आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे हा तुमचा अनुभव व्हायला हवा. ज्या क्षणी संपूर्ण शरीराची तुम्हाला एकसंध जाणीव होईल त्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत!
कोणत्याही योगासनात जेव्हा ते आसन पूर्ण स्थितीला जातं (पर्फेक्ट पोस्चर) त्यावेळी जी शांतता अनुभवाला येते ती आपण स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे असते. ज्या शरीराच्या जाणीवेनं आपलं लक्ष वेधून घेतलं होतं ती जाणीव परत आपल्याकडे, त्या समाधी अवस्थेकडे आलेली असते. ही अवस्था थोडा वेळ टिकते की मग पुन्हा विचार सुरू होतात आणि आपलं लक्ष तिकडे वेधल्यानं आपल्याला स्वतःचा विसर पडतो.
दुसरी जाणीव आहे दृश्य, मग ती वस्तू असो की व्यक्ती की घटना. आपली नजर सदैव सभोवतालच्या दृश्यांकडे लागलेली असते. निराकार हे समाधीचं दुसरं परिमाण आहे, म्हणजे जगातला प्रत्येक ध्वनी जसा शांततेतून प्रकट होतो तसा प्रत्येक आकार हा निराकारातून प्रकट होतो.
हीच गोष्ट अशीही मांडता येईल की प्रत्येक आकार हा निराकाराचाच बनलेला आहे त्यामुळे कोणत्याही आकाराच्या आत कुणीही नाही! हे तुम्हाला मंजूर न होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण स्वतःला व्यक्ती समजतो. तुम्ही जर नीट बघितलं तर व्यक्ती हा ‘देहाची जाणीव आणि आपली स्वतः विषयीची कल्पना’ मिळून झालेला एकत्रित परिणाम आहे. पण प्रत्येक जण स्वतः:ला आणि दुसऱ्याला व्यक्तीच समजतो आणि त्याच धारणेतून आपण संपूर्ण आयुष्य जगतो त्यामुळे कुणाच्याही आत कुणीही नाही हे आपल्याला काही केल्या मंजूर होत नाही.
स्वतःला व्यक्ती समजण्यात सगळ्यात मोठा भाग आपण करत असलेल्या कृत्याचा, आपल्या मालकी हक्काच्या वस्तूंचा आणि आपण जोडलेल्या आणि मानलेल्या नात्यांचा असतो. आपण सतत वापरत असलेल्या वस्तु म्हणजे आपलं घर, वाहन, उपकरणं यांचे आपल्या मनात आकार निर्माण झालेले असतात आणि त्यांच्या स्वामित्वामुळे आपण त्यांचे वापरकर्ते न वाटता मालक वाटतो म्हणून आपण स्वतःला व्यक्ती समजतो. सदैव आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींशी आपण अनेकानेक वर्ष वेगवेगळ्या स्मृतीतून जोडले गेलेलो असतो त्यातून जवाबदारी, कर्तव्य, पराधीनता अशा मानसिकता तयार होतात आणि मग या सर्वांच्या केंद्रस्थानी आपण स्वतः:ला कल्पून व्यक्ती ठरत असतो आणि सभोवतालचे सगळे लोक आपला हा समज सघन करत असतात.
सदैव कार्यरत असल्यानं कार्य शरीर आणि मन या पातळीवर घडत असूनही आपल्याला आपणच काम करतोय असं वाटतं.
घटनांचं देखील असंच आहे, घडलेल्या घटनांवरून आपण आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी, नशीबवान किंवा कमनशिबी, कर्तृत्ववान किंवा कर्तृत्वशून्य व्यक्ती ठरवलेलं असतं. वास्तविकात घटनेला असंख्य परिमाणं असतात आणि तीच घटना त्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपआपल्या दृष्टीनं इंटरप्रिट केलेली असते पण घटनांच्या या इंटरप्रिटेशनमुळे आपण व्यक्ती झालेलो असतो.
या व्यक्तित्वामुळे, म्हणजे व्यक्ती म्हणून आणि व्यक्तित्वातूनच सदैव जगल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण आकारबद्ध आहोत आणि आपल्याला आपल्या निराकार स्थितीचा पूर्णपणे विसर पडत असतो.
तिसरी जाणीव आहे ध्वनी, ध्वनी म्हणजे शब्द, आवाज, शरीरांतर्गत किंवा बाह्य संवाद किंवा कोणतीही श्राव्य जाणीव.
ध्वनी ही अत्यंत लक्षवेधी जाणीव आहे. कुणी अपमानास्पद बोललं किंवा आपल्या धारणे विरुद्ध लिहिलं, भविष्यकालीन चिंतेचा नुसता विचार उमटला किंवा मनानं आपल्याला कोणत्याही कारणानं न्यून आहोत असं म्हटलं तरी आपलं संपूर्ण लक्ष त्या ध्वनीची जाणीव वेधून घेते. आपण विश्व व्यापून स्थित असलेली शांतता आहोत याचं आपल्याला विस्मरण होतं, आपण भावनिक कल्लोळात सापडून संपूर्ण स्वास्थ्य गमावून बसतो!
संवाद ही आपली प्रत्येक क्षणाची गरज आहे, बोलताना आपण इतके इन्वॉल्व होतो की मन या उपकरणातून आपण बोलतोय असं न वाटता आपणच बोलतोय असं आपल्याला वाटायला लागतं. शांततेला आपणच बोलतोय असा भास होतो! आपल्याला स्वतःचं विस्मरण होतं! मनाच्या संवादानी आपली संपूर्ण चित्तदशा व्यापल्यानी आपण ध्वनीरूप होतो, आपण निरव शांतता आहोत, आपल्यावर ध्वनीचा कोणताही परिणाम होत नाही याचं आपल्याला विस्मरण होतं!
समाधीला निसर्गदत्त महाराजांनी 'शुद्ध जाणीव' म्हटलंय, काय कारण असेल त्याचं? समाधी ही जाणीवेनि कोणतंही रूप धारण करण्यापूर्वीची स्थिती आहे, निराकार ही शुद्ध जाणीव आहे. आध्यात्मिक दृष्टीनं जाणीव तीनच रूपं घेऊ शकते, एकः शारीरिक संवेदना, दोनः दृष्य, किंवा तीन: ध्वनी. आपण जाणीवेनं कोणतंही रूप घेण्यापूर्वीची स्थिती आहोत, याला समाधी म्हटलंय!
मी लिहिलेली एकेक गोष्ट पुन्हा पुन्हा वाचा तुम्ही स्वतःप्रत याल, तुम्ही समाधी या शांत, सर्वकालीन आणि अविचल स्थितीशी, तुमच्या स्वरूपाशी कनेक्ट व्हाल, ट्राय!

संजय


Sunday, August 21, 2011

४८. कार्य-उन्मुखता!

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्याला सत्य न गवसण्याचं एक महत्त्वाचं कारण कार्योन्मुखता आहे.

कर्मयोगाच्या नांवाखाली पब्लिक इतकं कार्योन्मुख झालंय आहे की निष्कामाची भेट अशक्य झालीये!

प्रथम कार्योन्मुखता म्हणजे काय ते पाहू. कार्योन्मुखता म्हणजे सदैव काही तरी करावं किंवा किमान ‘काही तरी घडावं’ ही मानसिकता! हे असं सततचं वाटत राहणं म्हणजे निष्कारण गाडी गिअरमध्ये टाकून ठेवण्यासारखं आहे.

जरा स्वास्थ्य लाभलं, म्हणजे कामातून थोडी उसंत मिळाली की बरं वाटतं, पण ते अत्यल्पकाळ की पुन्हा आता काय करायचं हा प्रश्न उभा! आणि काही करायला नसेल, टीव्हीवर काही करमणूक नसेल, फोनवर सगळ्यांशी सगळे विषय बोलून झाले असतील, नव्या कार्यक्रमाचे मनसुबे करायला सुट्टीचा अडसर येत असेल, कुणी येणार नसेल तर मग एकदम बोअर व्हायला लागतं. काही करायला नाही, नजिकच्या काळात काही घडण्याची शक्यता नाही म्हणजे आपण इन्वॅलिड झालो की काय असं वाटायला लागतं, आयुष्य एकदम निरस वाटायला लागतं.

तशात गीतेतल्या ‘कर्मयोगाची’ भर, फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा असा खुद्द कृष्णानं दिलेला सल्ला!

फलाची अपेक्षा न ठेवता काम करणारी गृहिणी कामानं बेजार तर फलप्राप्तीसाठी बाहेर पडलेले स्त्रीपुरुष स्वास्थ्याच्या शोधात! एकुणात काय तर, घरात राहायचं स्वास्थ्य लाभलेले म्हणजे निवृत्त झालेले किंवा हाऊसवाइव्ज काही करायला उरलं नाही किंवा नवं काही करायला मिळत नाही म्हणून खंत काढतायत आणि कामावर जाणारे कधी एकदा कामातून सुटका होईल या आशेनं काम करतायत असा सिनॅरिओ आहे!

आपल्याला वाटतं की काम करणं किंवा काम नसणं हे आपल्या अस्वास्थ्याचं कारण आहे पण आपली सदैव कर्मोन्मुखता हे त्या अस्वास्थ्याचं खरं कारण आहे!

जप किंवा नामस्मरण हा खरं तर या अस्वास्थ्यावरचा आध्यात्मिक उपाय फार पूर्वापार प्रसिद्ध आहे पण त्यानं व्यग्रता कणभरही कमी होत नाही, वर्षानुवर्ष जप किंवा

नामस्मरण करणाऱ्यांनी नुसतं नामस्मरण थांबवलं तर त्यांना इतकी कमालीची शांतता लाभेल की बोलता सोय नाही.
__________________________________

काम करणं आणि कामातला आनंद म्हणजे 'कार्यमग्नता' वेगळी आणि सततचं ओझं होऊन राहिलेली 'कार्योन्मुखता' वेगळी, ती काम नसल्यानं, कामातून सुटका हवी या अपेक्षेनं किंवा नवं काही घडत नाही या मानसिकतेतून येणारी अस्वस्थता आहे!

काम करण्यातला आनंद ही पूर्णत: वेगळी गोष्ट आहे आणि ती तीन गोष्टींवर अवलंबून आहे.

एक, कामातला तुमचा रस. इथे माणसानं प्रचंड घोळ घालून ठेवलाय म्हणून थोडं सविस्तर लिहितो.

पहिली गोष्ट, सर्व कामं सारखी आहेत, रस कामात नाही तुमच्यात आहे आणि हे लक्षात येणं अत्यंत अगत्यच आहे. आजपर्यंत आपली अशी समजूत करून दिलीये की चित्रं काढणं, वाद्य वाजवणं, नृत्य, शिल्पकला, अभिनय, कंठसंगीत, वेगवेगळे खेळ अश्या गोष्टीच रसमय आहेत आणि त्यामुळे लाखात एखादाच आपल्या कामानं आनंदून गेलेला दिसतो. काम हाच त्याचा आनंद वाटत असला तरी तुम्ही सखोल जाऊन बघितलं तर तो आनंद त्याला कामापोटी मिळणारं भरमसाठ मानधन आणि सामाजिक प्रतिष्ठेवर बेतलेला असतो मग तो प्रतिथयश उद्योजक असो, दिग्गज कलाकार असो नामवंत खेळाडू असो की जनमानसावर अधिराज्य करणारा अभिनेता असो.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली एक हकीकत इथे नमूद करावीशी वाटते. एकदा भारतातले प्रसिद्ध शहनाई नवाज आणि सरोद उस्ताद यांची कलकत्त्याला एका संगीत समारोहात जुगलबंदी ठेवली होती, साधारण तासभर वाजवून झाल्यावर शहनाई नवाज भर मैफिलीतून उठून गेले. आता येतील मग येतील म्हणून सरोद नवाज वाजवत राहिले आणि नंतर त्यांना शागीर्दांनी सांगितलं की उरलेली मैफिल तुम्ही पूर्ण करा, ते घरी गेलेत, परत येणार नाहीत!

दुसऱ्या दिवशी सरोद उस्तादांनी भर पेपरात, शहनाई नवाजांनी संगीताचा अपमान केलाय, त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान काढून घ्यावा असं स्टेटमेंट केलं! मग शहनाई नवाजांनी त्यांना फोन करून सांगितलं की आयोजकांनी मला एक तासाचेच पैसे दिले होते, मी त्याप्रमाणे वाजवलं! सरोद उस्तादांनी त्यावर मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त केली आणि स्टेटमेंट मागे घेतलं! तर सांगायचं असं की प्रचंड सामाजिक प्रतिष्ठा आणि बेतहाशा पैसा यातून अशा व्यक्तींना मिळणारा आनंद निव्वळ कृत्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा कित्येक पटींनी मोठा असतो.

तुम्हाला थोडं अणखर वाटेल पण खेळ माझं सर्वस्व आहे म्हणणाऱ्याला लिलाव वगैरे न करता माफक मानधन देऊन नित्यनेमानं नेट प्रॅक्टिस करून फ्रेंडशिप मॅचेस खेळायला लावल्या तर त्याचा खेळातला रस संपून जाईल, ही वोंट प्ले जस्ट फॉर द सेक ऑफ प्ले! त्याची मानसिकता नुसता बॉल ठोकण्यातली व्यर्थता त्याला दाखवून देईल मग तो किती का कौशल्यानं टाकलेला बॉल असो आणि कुणीही टाकलेला असो. काय असेल कारण याचं? तर क्रिकेटमध्ये असलेला अफाट पैसा, त्या पैशामुळे खेळाला मिळालेली अमाप प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धीमुळे पब्लिकनी त्यात घेतलेला इंटरेस्ट! क्रिकेट हा जगातला एकमेव रंगतदार खेळ नाहीये, तुम्ही त्यात रस घेताय म्हणून तो उत्कंठावर्धक झालाय.

तर कामात मजा आणणारा पहिला पॅरामिटर आहे ‘तुम्ही कामात घेतलेला रस! ’
ऑल वर्क पर से इज न्यूट्रल, इट इज योर इंटरेस्ट दॅट मेक्स द वर्क इंटरेस्टिंग, हे लक्षात आलं की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतील. किंवा असंही म्हणता येईल की ज्यात तुम्ही रस घ्याल ते तुमच्यासाठी रसमय होईल, फलाकांक्षा वगैरे गोष्टी दुय्यम आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.
___________________________________

कामात आनंद निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे विकल्प किंवा कामातल्या अनिवार्यतेचा अभाव! द व्हेरी ऑप्शन नॉट टू वर्क! तुम्हाला एकदम ऍप्रिशियेट होणार नाही पण हे परिमाण रसमयते इतकंच महत्त्वाचं आहे.

किशोरी अमोणकरला एकदा मुलाखतीत विचारलं होतं की आयुष्याच्या इतक्या परिपूर्ण स्थितीला तुम्हाला काही सांगीतिक वैषम्य वाटतं का? तिचं उत्तर अफलातून होतं, ती म्हणाली ‘गाणं मी मला हवं तेव्हा चालू करते पण मला हवं तेव्हा ते थांबवता येत नाही! ’ हे समजून घेण्यासारखं आहे, याचा अर्थ गाणं अनावर होतं असा नाही तर संयोजक जुमानणार नाहीत असा आहे. एकदा संयोजकांशी झालेल्या हुज्जतीमुळे त्यांना स्वत:चा कार्यक्रम पुढची तारीख जाहीर करून विनामूल्य ठेवावा लागला होता.

मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला कामातला आनंद मिळवण्यासाठी फार अलौकिक कलाकार किंवा जागतिक दर्जाचे खेळाडू होण्याची आवश्यकता नाही, समोर आलेलं काम कसं रंगतदार करायचं ही कला साधली की झालं! यात एक खुबी आहे, काम जगाच्या दृष्टीनं जितकं साधं आणि सरळ म्हणजे ज्यात आर्थिक स्टेक्स कमी तितका तुमचा कर्मबंधाचा लेप कमी म्हणजे कर्माची अनिवार्यता कमी आणि तुम्हाला ते तुमच्या पद्धतीनं करण्याची सवलत जास्त. तेच काम रोज नव्या पद्धतीनं, नव्या अंदाजानं करण्याचा विकल्प जास्त, जितका हा विकल्प जास्त तितका निव्वळ कामातून मिळणारा आनंद जास्त.

आता हे लेखन पाहा, कोणतीही अनिवार्यता नाही, काय लिहावं ते सगळे विकल्प उपलब्ध, आर्थिक स्टेक्स शून्य आणि मी जितका रस घेईन तितकी मलाही मजा आणि वाचकांनाही आनंद!

मी हे एक उदाहरण म्हणून दिलं, मला कामातल्या अनिवार्यतेच्या अभावानं येणारी मानसिकता दर्शवायची होती, ही मानसिकता तुम्ही नॉर्मल आर्थिक स्टेक्स असलेल्या कामात देखील आणू शकता आणि ते एकदा जमलं की पैसा दुय्यम होतो आणि आपण प्रार्थमिक होतो. आपण आणि हातातलं काम यांचा सरळसरळ संबंध येतो, तुम्ही रिलॅक्स्ड मूडमध्ये काम करू शकता आणि तो मूड कामातल्या आनंदाचा अनिवार्य घटक आहे.
_______________________________

तिसरी गोष्ट, अकर्त्याशी संलग्नता! ही गोष्ट सर्वोच्च आहे. ट्राय टू अंडरस्टँड....

मागच्या पोस्टवर एका प्रतिसादात मी न्यूट्रल गिअरबद्दल लिहिलं होतं. तुम्हाला ते समजलं असेल नसेल आणि ते प्रतिसादाबरोबर निघूनही गेलं असेल पण ती एक जादूमय गोष्ट आहे. कोणत्याही कर्माचं साधन शरीर आहे ही उघड गोष्ट आहे आणि मन म्हणजे मेंदूत साठवलेली सर्व माहिती, तुमची कार्यपद्धती, तुमचं कार्यकौशल्य आणि तुमचा कामाविषयीचा दृष्टिकोन ही सर्व सहसाधनं आहेत, या दोन्हीच्या समन्वयानं कोणतंही काम पूर्ण होतं.

आता कोणत्याही कामात आपला सहभाग न्यूट्रल गिअर सारखा असतो, हा न्यूट्रल गिअर कामातली विश्रांती आहे. तुम्ही जर त्याची दखल घेतली तर तुमच्या कोणत्याही कामात एक लयबद्धता येते, एक रिदम येतो. काम हा एकसंध चालणारा आयुष्याचा अनिवार्य भाग न राहता प्रत्येक कृत्याचे तुमच्या शरीराला आणि मनाला झेपतील असे खंड होतात.

तुम्ही सिनेमाचा अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण सिनेमा जरी एक वाटला तरी त्यात साधारण बावीस ते तेवीस फ्रेम्स (म्हणजे वेगवेगळे प्रवेश) असतात. प्रत्येक फ्रेमला एक सुरुवात, क्लायमॅक्स आणि शेवट असतो आणि अतिशय कौशल्यानं ती पुढच्या फ्रेमशी अशी काही जोडली असते की सगळं अखंड वाटतं.

एकदा तुम्हाला हा न्यूट्रल गिअरचा बोध झाला की तुमच्या संपूर्ण कार्यकालाच्या वेगवेगळ्या फ्रेम्स होतात, या फ्रेम्स मुळात असतातच पण त्या तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतात, मग काम तुमच्या आवाक्यात येतं. तुम्ही एकेक फ्रेम रंगवू शकता. त्या फ्रेममधले तुमचे संवाद, त्या फ्रेममधल्या व्यक्ती आणि तिच्यात घडणाऱ्या घटनांची तुम्ही मजा घेऊ शकता, कामातली निरसता, तोच तो पणा निघून जातो. काम एक सरळ रेषा न राहता सिक्लिकल होतं.

एकदा हा न्यूट्रल गिअर सापडला की तुम्हाला रोज तेच तेच वाटणारं आयुष्य नवे रंग घेतं कारण तो गिअर भूतकाळ संपवतो, भूतकाळाचा चलतपट सारखा डोळ्यांसमोरून चालल्यानं आणि कानामध्ये घुमल्यानं प्रत्येक प्रसंगातला नवेपणा आपल्याला जाणवत नाही. खरं तर आयुष्यात रिपीटीशन नाही, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना काही ना काही नवं परिमाण घेऊन येत असते हे तुमच्या लक्षात येतं.

हा न्यूट्रल गिअर तुमचं काम रसपूर्ण करतो, एका अर्थानं तुमची कार्यानिवार्यता कमी करतो कारण तो कामाचे सुव्यवस्थित खंड करून तुम्हाला वेळोवेळी विश्रामात आणतो आणि तुम्ही स्वत:शी जोडले गेल्यानं कामात निवांतपणा आणतो.

हा न्यूट्रल गिअर सृजनात्मकतेचा सोर्स आहे, आपल्याला वाटतं मनाला नवी कल्पना सुचली, नाही ते तसं नसतं, ती कल्पना त्या स्वास्थ्यातून निर्माण होऊन मेंदूत प्रकट झालेली असते, आपण स्वस्थ झाल्यानं आपल्याला नवी कल्पना सुचलेली असते! मेंदूत घडलेल्या घटनांची नोंद असते आणि त्यामुळे जर स्वास्थ्य नसेल तर मेंदू तेच काम त्याच पद्धतीनं करत राहतो.

कामातून थोडी फुरसत काढा आणि ही सततची कार्योन्मुखता कायमची संपवून टाका, तुमची जाणीव फिरून तुमच्याप्रत येईल. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा या न्यूट्रल गिअरच भान ठेवून कार्योन्मुख व्हा तुमचं काम, मग ते कोणतंही असो, आनंदाचं होईल.

संजय

Thursday, July 21, 2011

४७. दहशत!

मुंबईतले बाँबस्फोट ही या लेखाची प्रेरणा आहे.

मी स्वत: किती सुरक्षित आहे, तुम्हाला मुंबईत काय दिवस काढायला लागतायेत, सुरक्षा ही वैयक्तिक जवाबदारी की राजकीय, दहशतवादाचं समूळ उच्चाटन कसं आणि कुणी करावं; अशा व्यर्थ दिशेनं प्रतिसाद न देता जर मन:पूर्वक लेख वाचला तर तुम्ही कुठेही आणि कितीही असुरक्षित असलात तरी अत्यंत समर्थपणे परिस्थिती हाताळू शकाल यासाठी हे लेखन.
___________________________________________

विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक निर्विवाद गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुम्ही कितीही सुरक्षा निर्माण करा जोपर्यंत आपल्याला काहीही होत नाही, मग तो बाँबस्फोट असो की प्रलय, हा उलगडा होईपर्यंत भय कायम राहील; तुम्ही झेड सिक्युरिटीत असा की अमेरिकेचे अध्यक्ष त्यानं जरा सुद्धा फरक पडत नाही.

साखर एक चमचा की दीड, जेवणानंतर गोळी घेतली की नाही किंवा रात्री निजायला उशीर झाला आता सकाळी जाग येईल का? यापैकी कोणतीही गोष्ट भय निर्माण करेल. भय आणि दहशत यात फरक फक्त डिग्रीचा आहे, जे आपण हाताळू शकू असं वाटतं ते टेन्शन आणि जे टेन्शन समूळ हादरवून टाकतं ती दहशत इतकाच फरक आहे पण एकदा आपण हरेक स्थितीत अबाधित आहोत म्हटल्यावर सगळेच प्रश्न संपले.

सरकार सुरक्षा करेल, काश्मीर प्रश्न सुटेल न सुटेल, अल कायदाला म्होरक्या मिळेल न मिळेल, गडचिरोलीत वातावरण निवळेल न निवळेल ते आपल्या हातात नाही; आपण सत्य आहोत, नित्य आहोत आणि प्रसंगानं अस्पर्शित आहोत हे जाणणं हा एकमेव सूज्ञमार्ग आपल्याला उपलब्ध आहे मग इतर कुणी त्याला स्वार्थ म्हणो की आत्मकेंद्रितता, ते अज्ञानी माणसाचं परिस्थितीचं आकलन आहे.
___________________________________

प्रणय आणि भय या दोन आत्यंतिक भावनांमध्ये माणसाचं आयुष्य दोलायमान आहे. कळायला लागण्यापूर्वीचा बालपणीचा काळ सोडला आणि त्या वेळी जर अवतीभवती सगळेच प्रेमळ असतील तर या दोन भावना नसतात पण एकदा कळायला लागलं की मिळणारं सुख हिरावून घेतलं जाईल ही भीती आणि मग वयात आल्यावर प्रणयाची आस यात आपण शेवटापर्यंत हिंदकळत राहतो. पुढेपुढे वय वाढल्यावर शारीरिक दौर्बल्य आणि जगण्याच्या असंख्य विवंचनांमुळे प्रणयाची आस कमी होते, तो कैफ राहत नाही आणि मग उरते फक्त भीती, जगण्याचा सारा रंगच उडून जातो.
________________________________

प्रणय ही जशी अस्तित्वागत भावना आहे तसंच भय देखील नैसर्गिक आहे, प्रणय ही निसर्गाच्या पुननिर्मीती प्रक्रिया आहे तर भय ही शरीराला असलेल्या धोक्याची सूचना आहे. सुनामी येण्यापूर्वी तिथल्या वन्यजीवनानी त्या भागातून आधीच स्थलांतर केलं होतं आणि हवामानाच्या इतक्या प्रभावी यंत्रणा आपल्याला योग्य सूचना देऊ शकल्या नाहीत त्यामुळे अपरिमित मनुष्यहानी झाली असं मी वाचलंय.

भय ही मानसशास्त्रीय संकल्पना किंवा शरीराला संभवणाऱ्या धोक्याची सूचना आहे हा बोध आपल्याला त्या संवेदनेचा योग्य उपयोग करून देऊ शकतो, म्हणजे भयानं भयभीत न होता आपण ती संवेदना, तो सिग्नल योग्यप्रकारे डिकोड करून आवश्यक ती उपाय योजना करू शकतो.

भय ही प्रणयासारखीच नैसर्गिक संवेदना आहे पण ती शारीरिक धोक्याची सूचना आहे. आपल्याला धोका वाटण्याचं कारण गोंधळून गेल्यानं आपण ती संवेदना योग्य रीतीनं डिकोड करू शकत नाही हे आहे. स्वत:ला शरीरच समजत असल्यानं आपण आपल्यालाच धोका आहे असं समजतो आणि मग उपाय योजनेची दिशा चुकते. खरं तर शरीर जगवणं (किंवा त्याचा मृत्यू) ही निसर्गाची जवाबदारी आहे आपण निसर्गाकडून मिळालेली संवेदना योग्य रीतीनं डिकोड केली तर शरीराचं जगणं आणि मृत्यू दोन्हीही सुखाचे होतील.

शरीराला जर मृत्यू यायचा असेल तर भयाची संवेदना तीव्रतेनं येईल आणि त्यावेळी प्रसंग हाताबाहेरचा असेल, अशा स्थितीत मृत्यूचा स्वीकार करणं सुखाचं होईल, मृत्यू शरीर घेऊन जाईल, आपण जसेच्यातसे राहू.

___________________________________

काय असेल या निश्चिंत करणाऱ्या स्थितीच्या बोधाची साधना? ती साधना अशी आहे:
कोणत्याही सुट्टीच्या दिवशी पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास उठा, सुट्टीचा दिवस अशासाठी की तुम्हाला कोणतंही भविष्यकालीन व्यवधान नको. बसल्या जागी मांडी घालून उजव्या हातानं उजव्या पावलाचा वरचा भाग (घोट्याच्या वर) आणि डाव्या हातानं डाव्या पावलाचा वरचा भाग व्यवस्थित धरा. तुमचं शरीर एका स्क्वेअर पोझिशनला येईल म्हणजे पाठ सरळ आणि दोन्ही खांदे गुढघ्यांच्या समान रेषेत येतील. आता पिंगा घालतात त्याप्रमाणे शरीराचा वरचा भाग उजवीकडून डावीकडे नेत गोल फिरवायला सुरुवात करा.

तुमचं डोकं सहा पॉंईंट्स मधून जायला हवं. १) उजवा गुडघा २) शरीराच्या बरोबर मध्ये समोरच्या जमिनीलगत ३) डावा गुडघा ४) डावा खांदा ५) मानेच्या मागचा भाग आणि ६) उजवा खांदा.

या रोटेशननी तुमच्या शरीराचा वरचा भाग आणि मान मोकळी व्ह्यायला लागेल, तुम्ही बसलेले असल्यानं चक्कर येणार नाही आणि तुम्ही निर्धोकपणे रिपीटीशन्स करू शकाल. दहा, बारा, पंधरा तुम्हाला हव्या तितक्या आणि सुखावह वाटतात तेवढ्या रोटेशन्स करा. त्यानंतर त्याच पोझिशनमध्ये फक्त तीन किंवा चार रोटेशन्स डावीकडून उजवीकडे (पहिल्या पिंग्याच्या विरुद्ध क्रमानं) करा.

या प्रक्रियेचा हेतू शरीराचा वरचा भाग (मुख्यत: पाठ) आणि विशेषत: मान रिलॅक्स करणं आहे त्यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तप्रवाह मिळू लागतो, मेंदूचा रक्तप्रवाह मानेच्या मागचा भाग रिलॅक्स होण्यावर अवलंबून असतो.

यानंतर आपण ‘होकार’ देतो त्याप्रमाणे प्रथम उजवा कान उजव्या खांद्याकडे आणि मग डावा कान डाव्या खांद्याकडे प्रत्येकी तीन-चार वेळा नेऊन आणि त्यानंतर ‘नाही’ म्हणतो त्याप्रमाणे हनुवटी प्रथम उजव्या आणि नंतर डाव्या खांद्याकडे तीन-चार वेळा नेऊन मान संपूर्ण शिथिल करा.

आता उठून एक कप पाणी (दोनशे मिली) पिऊन नंतर चहा करायला ठेवा. मग एक फुल कप कडक चहा (कॉफी असेल तर अर्धा कप) आणि दोन कोणतिही चांगली बिस्कीटं यांचा शांतपणे आस्वाद घ्या.

आता शांतपणे मांडी घालून आणि सुखद अशा कुशन्सला पाठ टेकून घरातल्या सर्वात शांत जागी बसा (बेडरूम, हॉल, बाल्कनी काहीही चालेल). सभोवताली संपूर्ण अंधार हवा आणि डोळे मिटलेले हवेत. वेळ साधारण पहाटे साडेचारची हवी.
_____________________________________

आता हे मेडिटेशन :

या संपूर्ण अस्तित्वात एक अदृश्य पण अत्यंत सघन असा उभा तोल आहे, द व्हर्टिकल इक्विलिब्रीयम. प्रत्येक व्यक्त गोष्टीच्या बरोबर मधून एक सरळ उभी रेघ गेलेली आहे. या रेषेला अध्यात्मात साक्षी म्हटलंय.

ही रेष आपल्या मेंदूच्या बरोबर मधून वरून सरळ नाभी आणि पाठीचा कणा यांच्या मधल्या भागातून ऍनसपर्यंत आली आहे, या सरळ रेषेशी संलग्न व्हा. एका क्षणात तुम्हाला लक्षात येईल की शरीर बसलंय आणि आपण शरीरापासून वेगळे आहोत.

आपण पदार्थ नाही, अपदार्थ आहोत. आपण व्यक्ती नाही तर तो अदृश्य पण सतत उभा असलेला तोल आहोत. या तोलाशी संलग्नता तुम्हाला भय मुक्त करेल कारण कोणत्याही हादर्‍यानं काहीही हालेल पण हा तोल तसाच राहील.

या तोलाचं विस्मरण भयाच्या सूचनेचं भीतीत आणि प्रसंगी दहशतीत रूपांतर करतं पण एकदा हा तोल सापडला की आपण विदेह होतो. एका अर्थानं नाहीसे होतो आणि एका अर्थानं एकसंध होतो, अभंग होतो.

इकहार्टनी म्हटलंय साक्षात्कार झाल्यापासनं मला अनेकाअनेक अनुभव आले आणि गेले पण एक अभिन्न शांतता मला सदैव साथ करत असते. ही शांतता म्हणजे अस्तित्वात असलेलं हे अंगभूत, निर्वैयक्तिक स्थिरत्व, याच्याशी एकरूप व्हा, तुम्ही ते स्थिरत्व व्हाल.

घटना आणि प्रसंग या पदार्थाच्या पदार्थाशी घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व घटना आणि प्रसंगात एक अदृश्य तोल कायम असतो आणि तो तोल नेहमी आपण असतो!

संजय

Sunday, June 26, 2011

२७. पैसा

श्वासात अडकला पैसा,
पैशात अडकला श्वास;
श्वासाने सार्थक पैसा की
पैशाने चाले श्वास?

स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारला आहे. स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोमन धारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.

मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे मी लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर जे लिहिलंय त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा.

तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्याकडे आचरणात आणता येईल असं उत्तर आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. म्हणजे पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळू शकेल पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.

तर पहिली गोष्ट, स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे एक कारण आहे ते असं की प्रत्येकानं स्वतःकडे असलेल्या पैशाचं ‘रेव्हेन्यू आणि कॅपिटल’ असं विभाजन केलं आहे. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!

कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका ‘भांडवली पैसा’ हवा की त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्म असंच चालू राहील!

मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.

हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार घटना आपसूक घडतात त्या अशा:

एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा ‘वापरणं’ म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.

दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.

तीन, तुमच्या वागण्यात एक बिनधास्तपणा सहजच येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात सक्रिय न होऊ देता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!

चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात यायला लागतं. पैसा ही कल्पना आहे, आपण सार्थक आहोत, आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.

पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.

इथे मला अजून एक गैरसमज दूर करावा असं वाटतं, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झाली आहे. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
हा गैरसमज दूर झाल्यावर पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!

मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!

एक दिवस तुम्ही ही माझ्यासारखी जीवनाची प्रायॉरिटी पूर्णपणे बदलू शकाल, तीस सप्टेंबर ही इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची अंतिम तारीख असताना जे कोणताही सी ए करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल, केवळ मजा वाटते म्हणून इथे लिहू शकाल!

माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी त्याला म्हणालो अरे असं जगून बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भीतीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

Wednesday, June 22, 2011

४५. सिनेमा, सिनेमातला सिनेमा आणि आपण

प्रथम ‘सिनेमातला सिनेमा’ काय चीज आहे ते पाहू.

रात्रंदिवस आपल्या डोळ्यासमोर असंख्य चित्र सरकतायत आणि मनात संवाद उमटतायत, आपल्याला त्यांची जाणीव इतकी न्यून आहे की असं चाललंय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. अर्थात सगळ्यांचीच अशी स्थिती असल्यानं हा अहोरात्र चाललेला सिनेमा आपल्या जीवनाचा भागच झालंय म्हणजे या सिनेमाशिवाय सभोवतालच्या जगाशी आपला प्रत्यक्ष संबंध येऊ शकेल याची आपल्याला कल्पना देखील नाहीये. हा सिनेमा जगण्याचा इतका अविभाज्य भाग झालाय की हा सिनेमा बघत बघतच आपण बाकी आयुष्य जगतो.

तुम्हाला खरं वाटणार नाही पण रात्री आपल्याला दिसणारी स्वप्न हा त्या सिनेमाचा केवळ अंधार व्यवस्थित झाल्यानं होणारा बोध आहे म्हणजे सिनेमा सकाळी सुरूच असतो पण पडदे उघडल्यावर थिएटरमध्ये जसा पिक्चर फिक्का दिसायला लागतो तसा तो एकदम तीव्रतेनं जाणवत नाही एवढंच.

थोडक्यात आपल्याला सभोवतालच्या जगाचं दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध स्वाद यांनी होणारं ज्ञान, हा सिनेमा बघताना जेवढी काही उसंत मिळते त्यातून झालेलं असतं. या सिनेमानं आपलं लक्ष संपूर्ण वेधून घेतलंय हे लक्षात येणं, हा बोध तो सिनेमा बंद करणारी पहिली कृती आहे.

हा सिनेमा म्हणजे मन आहे आणि सभोवतालचं जग हा खरा सिनेमा आहे, जोपर्यंत हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद होत नाही तोपर्यंत जग खरं वाटतं, आणि एकदा हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद झाला की मग जग निव्वळ सिनेमा होतं!

__________________________________________

आता सिनेमा म्हणजे काय ते बघू.

कोणताही सिनेमा बघणाऱ्यावर किती परिणाम करणार हे बघणारा त्यातल्या संकल्पना किती खऱ्या मानतो यावर अवलंबून असतं म्हणजे कुणीही कुणाचा प्रियकर किंवा प्रेयसी, आई किंवा वडील नसतं, कुणीही विलन नसतं पण दिग्दर्शक अशी काही मांडणी करतो आणि सिनेमात काम करणारी मंडळी असा काही प्रभावी अभिनय करतात की आपल्याला ते सगळं खरंच वाटायला लागतं! आपण त्या सिनेमात संपूर्ण गुंतून जातो, कुणीही कुणाचं काहीही नसताना आपल्याला पात्रांचा विरह दुखवून जातो, खलनायकाची चीड येते, आईचं ममत्व भावनिक करतं आणि बापाचा विरोध अनाठायी वाटायला लागतो, दुष्टांचं निर्दालन व्हावं आणि काहीही करून प्रेमिकांचं मिलन व्हावं आणि सुखांत शेवट व्हावा असं वाटायला लागतं.

तुम्हाला मी जरी उगीच स्टोरी लावतोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमची टिवी सिरियल्स मधली इनवॉल्वमेंट बघा, उत्तम टिआरपी असलेल्या सिरियल्सचं यश पाहा आणि तरीही नाही पटलं तर क्रिकेटचे सामने आणि त्यात प्रचंड जनसमुदायाचे असलेले आंतरिक लागेबांधे पाहा, वास्तविक बोल्ड, कॅच, एलबीडब्ल्यू, स्कोर सगळ्या मानवी कल्पना आहेत पण मॅच चालू असताना जरा काही व्यत्यय आला किंवा तुमचा भरवशाचा फलंदाज आऊट झाला तर आपली होणारी अस्वस्थता पाहा म्हणजे मी काय म्हणतोय ते समजेल.

तर थोडक्यात काय की प्रेक्षकाचं सिनेमा किंवा समोरचं दृश्य खरं मानणं त्याच्यावर किती परिणाम करणार हे ठरवतं. तुम्हाला एकदा तुमची इनवॉल्वमेंट तुमच्या धारणेवर अवलंबून आहे हे समजलं की परिणाम शून्यता यायला लागते, प्रसंग खरा न वाटता सिनेमा सारखा वाटायला लागतो, मग तो सिनेमा असो की क्रिकेट असो की वास्तविक आयुष्यातला प्रसंग असो!
________________________________

सिनेमाला दृक आणि श्राव्य असे दोन परिणाम आहेत आणि याच दोन संवेदनांनी आपल्या जाणीवेचा नव्वद टक्के भाग व्यापला आहे, बाकीच्या तीन संवेदना (स्पर्श, गंध आणि स्वाद) फक्त दहा टक्के आहेत.

आता हे समजून घेणं एकदम महत्त्वाचं आहे, कोणत्याही जाणीवेचा उलगडा होण्यासाठी प्रथम जाणीव त्या संवेदनेकडे उन्मुख व्हावी लागते आणि जाणीव उन्मुख होता क्षणी आपल्या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या दृष्टी आणि श्रवण या दोन फॅकल्टीजनी आपण ती डिकोड करायचा प्रयत्न करतो. त्यातही, म्हणजे नव्वद टक्क्यातल्या दृकश्राव्य आकलनात, दृक भाग जवळजवळ पंचाहत्तर टक्के आहे आणि श्राव्य भाग पंधरा टक्के यामुळेच गायक आणि वादक दुर्मिळ आहेत कारण त्यांची श्राव्य संवेदना इतरांपेक्षा जास्त आहे.

हे लिहिण्याचं कारण असं की जर तुम्हाला दृकश्राव्य परिणामाची तीव्रता कमी करायची असेल तर इतर तीन संवेदना हळूहळू तीव्र केल्या पाहिजेत आणि त्या तीव्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या वापरायला हव्यात.

तुम्ही कधी दखल घेऊन बघा, आइसक्रीम खाताना आपल्याला पहिल्या स्वादाला एकदम ‘अहाहा! ’ वाटतं मग पुन्हा आपलं लक्ष संवाद किंवा सभोवतालच्या दृश्याकडे वेधलं जातं आणि मग एकदम आइसक्रीम संपल्यावरच लक्षात येतं, अरे संपलं!

स्पर्शाची संवेदना तर इतकी पुसट झालीये की फक्त तारुण्यातच काय तो स्पर्शाचा मोह असतो आणि मग नंतर सगळं इतकं रूटीन होतं की स्पर्शाप्रती आपण जवळजवळ बधिरच होतो. अंघोळ करताना पहिला पाण्याचा स्पर्श झाला की पुढे ‘सिनेमातला सिनेमा’ असा काही अवधान वेधून घेतो की बाकीचं सगळं यंत्रवत करून आपण एकदम रेडी, चलो नेक्स्ट आयटम!

श्वासाकडे तर निव्वळ दुर्लक्षच आहे आणि त्यामुळे तो इतका उथळ झालाय की गंधाची जादू अभावानंच लक्षात येते.

तर सांगायचं म्हणजे आपण स्पर्श, गंध आणि स्वाद या संवेदना जितक्या प्रगल्भ करू तेवढ्या सर्व संवेदना बॅलन्स होतील आणि मग अनायासे दृकश्राव्याचा परिणामही संतुलित होईल.

बोधाच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक प्रसंगात स्वस्मरण कोणत्याही प्रसंगाचा आपल्यावर होणारा परिणाम न्यून करतं कारण आपण जाणीवेचे जाणते आहोत, शुद्ध जाणीव आहोत म्हणजे इंद्रियगम्य जाणीवेचे जाणते आहोत, निराकारावर कसलाही परिणाम होत नाही!
________________________________________

दृष्टीत आणि श्रवणात सुस्पष्टता (क्लॅरिटी) आणणं मनाचा किंवा ‘सिनेमातल्या सिनेमाचा’ परिणाम शून्य करत जातं.

इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करतो, मनाचा प्रोजेक्टर नेहमी जे नाही ते दाखवत असतो, म्हणजे तुम्ही घरी आहात पण तुम्हाला ऑफिसची दृश्य आणि संवाद दिसत आणि ऐकू येत असतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या समोर घरचे प्रसंग चालू असतात.

साधनेच्या दृष्टीनं तुम्हाला दृष्टी आणि श्रवणाच्या मेंदूत गेलेल्या लिंक्स क्लिअर करायला हव्यात.

यासाठी सर्वोत्तम साधना म्हणजे निवांत वेळ मिळेल तेव्हा शांत पाठ टेकून बसणं आणि डोळे मिटून आतून मेंदूकडे बघणं आणि असं करत असताना आजूबाजूला जे चालू आहे ते अत्यंत अवधानपूर्वक ऐकणं. ही दुहेरी साधना आहे आणि ती मेंदूकडे डोळे आणि कानामार्फत येणाऱ्या दृकश्राव्य लिंक्स क्लिअर करत नेते.

या साधनेच्या प्रगतीचा निकष म्हणजे शरीर बसलंय आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येतंय हा अनुभव तुम्हाला येईल आणि मनाचा चलतपट थांबल्यानं शांत वाटायला लागेल. तुम्ही जसजसे या साधनेत प्रगत होत जाल तसे डोळे उघडे असताना तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसेल आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येईल, तुम्ही सदैव वर्तमानात राहाल, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्यकाळाची भीती तुम्हाला सचिंत करणार नाही. तुम्ही एकदम फोकस्ड होत जाल.
__________________________________

आता सिनेमाची संकल्पना माणसाला जीवनावरून सुचलीये म्हणजे जे वास्तविकात घडतंय ते कथा म्हणून वेगवेगळ्या प्रसंगातून आणि आकर्षक मांडणीतून दृकश्राव्य माध्यमातून दाखवणं म्हणजे सिनेमा.

जसा सिनेमाचा परिणाम बघणाऱ्याच्या मान्यतेवर आहे तसाच आयुष्यातल्या घटनांचा परिणामही आपल्या धारणेच्या सघनतेवर आहे. आपण स्वत:ला भारतीय मानलं तर इतर देशांचा धोका वाटतो, आपण स्वत:ला स्त्री मानलं तर जगात पुरुषी वर्चस्व वाटतं किंवा पुरुष मानलं तर स्त्रिया अनाकलनीय वाटतात, आपली स्वत:विषयीची मान्यता किंवा धारणा आपल्यावर प्रसंगाचा काय परिणाम होणार ते ठरवते.

जर आपण स्वत:विषयी कोणतीही धारणा ठेवली नाही तर आपण शुद्ध जाणीव होतो, खरं तर आपण शुद्ध जाणीवच आहोत हे आपल्या लक्षात येतं. मग प्रसंग फक्त घडतो आणि आपल्याला कळतो, आपण मात्र जसेच्या तसे राहतो अगदी सिनेमा बघून त्याची मजा घ्यावी तसे. सिनेमाची मजा निश्चित येते पण त्याचा आपल्यावर परिणाम मात्र काहीही होत नाही.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

Wednesday, June 08, 2011

साधक, साधना आणि साध्य! (दोन)

साधना निवडीचा पर्याय हा व्यक्तीगत चॉइस आहे आणि ते तुमचं स्वातंत्र्य आहे. एखाद्या गायकानी अभिव्यक्तीसाठी एखादं घराणं निवडावं किंवा एखाद्या चित्रकारानी स्वत:ला एक्सप्रेस करायला एखादी स्टाईल निवडावी तशी ती हृद्य प्रक्रिया आहे.
नामस्मरण या सकृद्दर्शनी सोप्या वाटणार्‍या प्रक्रिये विषयी इथे लिहावंस वाटतंय.
____________________________________

आपलं मन ही रेकॉर्डिंग आणि आयडेंटिफिकेशन करणारी प्रोसेस आहे, म्हणजे मनामुळे आपण विविध घटना, वस्तु, प्रक्रिया, व्यक्ती वगैरे लक्षात ठेवून त्यांचं पुन्हा रिट्रायवल करू शकतो. ही प्रोसेस जगायला अत्यंत उपयोगी आहे आणि मानवाकडे सर्वात प्रगल्भ मन किंवा रेकॉर्डिंग सिस्टम आहे.

पण मानवी मन अनकंट्रोल्ड झालंय हा मानवी जीवनातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मनाची प्रक्रिया अनैच्छिक झालीये. तुम्हाला हवं असो की नसो ती प्रक्रिया प्रत्येक स्टिम्युलंटनी असंख्य स्मृती किंवा रेकॉर्डिंग्ज सुरू करते आणि ती प्रक्रिया इतकी अनिर्बंध झालीये की तिनी सर्व जीवनावर नियंत्रण मिळवलंय.

उदाहरणार्थ, घड्याळ दिसायचा आवकाश की किती वाजलेत, मग आता काय करायला हवं, बापरे! इतका वेळ गेला किंवा अजून झोप कशी आली नाही, आता उठायला हवं, आता जेवायला हवं किंवा तत्सम विचार आणि लगोलग शारिरिक हालचाली सुरु होतात. वेळ हा भास आहे हे आपण विसरुनच जातो आणि जाणिवेकडे दुर्लक्ष करून, म्हणजे शारिरिक हालचाल (विहार किंवा व्यायाम) करावा अशी सुक्ष्म जाणिव होत असून देखील आपण जेवायला बसतो!

आध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं हे प्रार्थमिक मानलं गेलंय. आता बोधाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर मनाचं नियंत्रण हे विविध धारणांमुळे आहे, म्हणजे वेळ वास्तव आहे या धारणेमुळे जाणिवेकडे दुर्लक्ष होऊन किती वाजले हे मानसिक इंटरप्रिटेशन आपण काय करणार याचं निर्णायक होतं.

जात, पत्रिका, कुंडली या मानसिक कल्पनांमुळे विवाह, व्यक्तीची पारख, पारस्पारिक अनुकूलता आणि एकमेकातलं आकर्षण या अत्यंत महत्वाच्या गोष्टीं ऐवजी भलत्याच निकषांना प्राधान्य देऊन होतं आणि मग सहजीवनातली मजाच संपून जाते.
आता बोध असेल तर विवाहा सारखा दूरगामी परिणाम करणारा निर्णय संपूर्ण व्यक्तीगत जवाबदारी घेऊन आणि सहजीवनाला पूरक असणा‍र्‍या गोष्टी लक्षात घेऊन घेता येतो.

अशा तर्‍हेनी मनाच्या अनिर्बंध प्रक्रियेतून सुटका आपल्याला वस्तुनिष्ठ बनवते, आपण वर्तमानात राहून अत्यंत समर्थपणे प्रसंग किंवा परिस्थिती हाताळू शकतो म्हणून आध्यात्मात मनाच्या नियंत्रणातून मुक्त होणं आगत्याचं मानलं गेलंय. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे आपण ‘दॅट वीच इज’ या फॅक्च्युअल स्टेटला येऊ शकतो किंवा ओशो म्हणतात तसे ‘हिअर अ‍ॅंड नाऊ’ मधे येऊ शकतो.
_____________________________________

तर या मानसिक बंधनातून किंवा अनैच्छिक मानसिक प्रक्रियेतून मुक्ती साठी मन एकाच दिशेनी नेणं, त्याचं इंटररिलेटेड कोऑर्डिनेशन असलेल्या स्मृती प्रवाहातून स्वैर भ्रमण थांबवणं यासाठी साधकाला नामस्मरण ही प्रक्रिया सांगीतली जाते. म्हणजे तुमचं मन एकच प्रक्रिया ऐच्छिकपणे प्रदीर्घ कालावधीसाठी करु शकेल अशी अपेक्षा असते.

पण नामस्मरण ही इतकी ढोबळ प्रक्रिया आहे की गाडी चालवतांना जसं आपण एकीकडे गाडी चालवतोय आणि दुसरीकडे विचार करतोयं असं लिलया करु शकतो तशी परिस्थिती सहज येते आणि त्या प्रक्रियेचा काहीही उपयोग होत नाही.

त्यात एखाद्यानी फारच मनावर घेऊन एकाजागी बसून अत्यंत परिश्रमपूर्वक नामसाधना प्रलंबीत काळ केली तर पुनरुक्ती आणि मोनोटोनीनी त्याचा मेंदू बधीर होऊन त्याला वेगवेगळे भास व्हायला लागतात. म्हणजे ‘दॅट वीच इज’ या फॅक्चुअल रियालिटीला येण्या ऐवजी तो एका भ्रामक विश्वात जायला लागतो, त्याला जे नाही ते दिसायला लागतं आणि ऐकू यायला लागतं!

त्यामुळे साधना निवडतांना सजग रहाणं अनिवार्य आहे.
______________________________________

बोधाच्या दृष्टीनी बघीतलं तर स्पेस किंवा शून्य हे सर्वव्यापी आहे आणि ती निर्विवाद वस्तुस्थिती आहे. स्पेस नाही अशी कोणतीही जागा नाही किंवा प्रत्येक आकाराच्या आत-बाहेर स्पेस आहेच.

ही स्पेस किंवा शून्य अंतीम आहे कारण आकारांचं प्रकटीकरण, अस्तित्व आणि विघटन यानी ती अनाबाधित रहाते.

सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि मग ती स्पेस किंवा तो निराकर हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे हे जाणणं आहे.

बोधाच्या दृष्टीनी ही स्पेस इतकी शाश्वत आहे की आपण जरी तिला आपलं स्वरूप मानत नसलो तरी त्यामुळे तिच्या शाश्वततेवर कोणताही परिणाम होत नाही आणि अर्थात ही गोष्ट उघड आहे.

त्यामुळे बोध किंवा सांख्ययोग म्हणतो की या स्पेसची निव्वळ दखल,केवळ स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल! आपणही शाश्वत आहोत याची प्रचिती देईल.

कोणत्याही प्रसंगात किंवा परिस्थितीत किंवा अस्वस्थ मन:स्थितीत केवळ या निराकाराच्या असण्याचं स्मरण किंवा स्वत:चं स्मरण तुम्हाला स्वस्थ करेल, मानसिक उहापोहातून मुक्त करेल कारण सरते शेवटी तुम्ही आणि स्पेस एकच आहात!

संजय

जे जगतो तेच लिहीतो

सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

Friday, June 03, 2011

साधक, साधना आणि साध्य!

प्रथम आध्यात्मिक जगात साध्य काय आहे ते पाहू.
आध्यात्मिक अर्थानं साध्य म्हणजे स्वत:ची स्वत:शी भेट. मीटिंग वनसेल्फ!

अध्यात्म हा सर्वात मोठा पॅराडॉक्स आहे, पॅराडॉक्स म्हणजे संभ्रम नाही; पॅराडॉक्स म्हणजे विनोद कारण भेट व्हायला आपण स्वत:पासून दुरावलेलोच नाही!

पण हे सुरुवातीला लक्षात येत नाही, म्हणजे आपण जर स्वत:पासून दुरावलेलो नाही तर मग भेट कसली? असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणू शकत नाही कारण तो तुमचा अनुभव नाही त्यामुळे हा पॅराडॉक्स आहे हे कळण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रिया काय आहे ते समजावून घ्यावंच लागतं.

काय उपयोग आहे या साध्याचा? तर, एकदा आपण स्वत:ला भेटलो की सगळे प्रश्न संपले, अक्षरशः एका क्षणात सगळं जीवन आल्हाददायक होतं. जे जीवन उगीच ओढूनताणून जगत होतो ते स्वप्नवत वाटायला लागतं, नव्हे स्वप्नवत होतं! जे खरं वाटत होतं, सार्थ वाटत होतं, ज्यात बदल करावासा वाटत होता आणि बदल झाला की सुखाला पारावर राहणार नव्हता ते सगळं पिक्चर सारखं वाटायला लागतं. घडतंय सगळं, कळतंय सगळं पण होत काही नाही अशी आपली स्थिती होते. वी रिमेन अनफेक्टेड बाय द इव्हेंटस ऑर द सिट्यूएशन!

_________________________________________

मुळात आध्यात्मिक साधनेचा हेतू एक भ्रम दूर करणं आहे, तो भ्रम इतकाच आहे की निराकार स्वत:ला आकार समजतोय, किंवा निराकाराला आपण आकार आहोत असा भास होतोय.

आता, भास कितीही सघन असला तरी त्यामुळे निराकाराचं आकारात रूपांतर होत नाही आणि त्यामुळे कोणतीही साधना आपल्याला स्वरूप उपलब्ध करून देऊ शकत नाही!

साधनेनं स्वरूप बदलू शकत नाही त्यामुळे प्राप्तही होऊ शकत नाही.

थोडक्यात, आपण निराकारच होतो, निराकारच आहोत आणि निराकारच असू शकतो या बोधाप्रत आणण्याचं काम साधना करते.

किंवा, द अदर वे, साधना आपल्याला आपण आकार आहोत हा वाटणारा भास दूर करते.

हे लिहिण्याचं कारण एवढंच की साधना निवडताना फार सजग असावं लागतं, जर साधनेचा हेतू आणि साध्य लक्षात घेतलं नाही तर साधना, भ्रम दूर करण्या ऐवजी सघन करत जाते!
____________________________________

साधनेची निवड हा अध्यात्मातला अत्यंत महत्त्वाचा भाग कसा आहे ते पाहू.

वेळ हा आपल्याला क्षणोक्षणी होणारा भास आहे कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे रात्र झाली किंवा दिवस उजाडला असं वाटतं. ही गोष्ट सर्वज्ञात आहे पण वेळ हा भास आहे हे आपण मंजूर करत नाही.

आता वेळ हा भास आहे हा उलगडा होण्यासाठी सूर्य सदैव प्रकाशमान आहे या गोष्टीचं स्मरण पुरेसं आहे. या उलगड्यानी वेळेचं मनावरचं दडपण शून्य होतं. अध्यात्मात सांगितलेली समयशून्यता सहज उपलब्ध होते, जीवनातली घाईगडबड एकदम कमी होते.
तुमच्या लक्षात येईल की कालरहितता साधण्यासाठी कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही, केवळ, अस्तित्वात वेळ नाही किंवा वेळ हा भास आहे हे स्मरण पुरेसं आहे.

या बोधाला आणखी एक पैलू आहे, ज्याला वेळ हा भास आहे हा बोध होतो तो स्वत:ही कालातीत होतो कारण ज्याला वेळ खरी वाटते तो स्वत:लाही कालबद्ध समजत असतो!

आता आपण कालरहित आहोत हे समजण्यासाठी तुम्ही कोणतीही साधना केलीत तर तुम्ही वेळेशी झुंजत राहाल आणि मग या आयुष्यात तुम्हाला तो बोध होणं शक्य नाही कारण वेळ होतच राहणार! फक्त वेळ हा भास आहे हा बोध होऊ शकतो, वेळ नाहीशी होत नाही.

मला एकानं अत्यंत निर्बुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली होती तेव्हा मी म्हटलं होतं की अशा प्रश्नांना उत्तरं देण्यात माझा वेळ जातो. यावर त्यानं लिहिलं की वेळ हा भास आहे तर मग वेळ जातो असं तुम्ही कसं म्हणता?

आता वेळ जातो असं बोली भाषेत म्हणतात, खरं तर त्रास होतो असं म्हणायला हवं, पण त्रास होतो असं म्हटलं की सत्य गवसलेल्याला त्रास कसा होईल? हा पुन्हा प्रश्न!

तर सांगायची गोष्ट म्हणजे वेळ हा भास आहे हे उघड आहे आणि व्यक्त जगात वेळ सार्थ आहे हे ही तितकंच खरंय पण आपण कालबद्ध नाही हा बोध तुम्हाला वेळ उत्तम मॅनेज करायला मदत करतो, हा त्या बोधाचा लाभ आहे, तुम्हाला वेळेचं टेन्शन येत नाही!

मुद्दा असा आहे की जीवनातलं वेळेचं प्रचंड दडपण घालवण्यासाठी तुम्ही साधना किंवा टाइम मॅनेजमेंट सारख्या उपाय योजना सुरू केल्यात तर वेळेचं दडपण जाणं तर दूरच पण वेळ अधिकाधिक खरी वाटायला लागेल!
___________________________________

आता मूळ भ्रमाकडे किंवा भासाकडे वळू.

निराकाराला आपण आकार आहोत असा होणारा भास म्हणजे अहंकार! हा अहंकार दूर करण्यासाठी अनेक क्लिष्ट आणि जाचक प्रक्रिया निर्माण झाल्यायेत. उदाहरण म्हणून आपण परिक्रमा ही अत्यंत खडतर साधन बघू.

निराकार निश्चल आहे, तो कुठेही जात येत नाही. या निश्चलाचं वर्णन अष्टावक्रानी त्याच्या संहितेत, ‘न क्वचित गंता न आगंता’ असं केलंय. आता या निश्चलाला भेटण्यासाठी आपण चालायला सुरुवात करणं हीच प्रार्थमिक चूक आहे.

या प्रार्थमिक चुकीतून पुढेपुढे किती गोंधळ होत जातो ते बघण्या सारखं आहे. पहिली गोष्ट, परिक्रमा ही अनेक वर्ष किंवा महिने चालणारी साधना आहे त्यामुळे परिक्रमेची सुरुवात आणि शेवट कालाचा भास सघन करते, म्हणजे सत्य किंवा स्वरूप जे आता, या क्षणी उपलब्ध आहे ते काही वर्षांनी किंवा महिन्यांनी, परिक्रमेची सांगता झाल्यावर मिळेल असा भ्रम निर्माण होतो.

आता जे परिक्रमेची सुरुवात होण्यापूर्वीच उपलब्ध आहे ते परिक्रमेची सांगता झाल्यावर कसं उपलब्ध होईल? म्हणजे ते परिक्रमेच्या सांगतेला उपलब्ध नाहीये असं नाही पण ज्यानं ते परिक्रमे नंतर उपलब्ध होईल या धारणेनं परिक्रमा सुरू केलीये त्याला ते सांगते नंतरही गवसणार नाही कारण शोध निश्चलाचा आहे हेच त्याच्या लक्षात आलेलं नाही! किंवा शोध निश्चलाचा आहे हे लक्षात न आल्यानंच तर त्यानं परिक्रमा सुरू केलीय!

पुढेपुढे तर आणखी मजा आहे. निश्चल, किंवा निराकार,किंवा खुद्द आपण अजिबात हालत नाही, ज्यानं परिक्रमा केली जाते ते शरीर असतं पण परिक्रमेचा ध्यासच इतका प्रगाढ असतो की ती करणाऱ्याला आपणच परिक्रमा केली असं वाटायला लागतं!
आता आजूबाजूचं पब्लिक पण इतकं भारी असतं की अश्या परिक्रमा करणाऱ्याला ते
असं काही मानायला लागतं की परिक्रमा करणारा पुन्हा परिक्रमेचं अनुष्ठान करायला निघतो!

आता खरंतर परिक्रमा न करू शकणाऱ्यांना आपण ती करू शकत नाही याची खंत असते आणि म्हणून ते परिक्रमीला मानतात आणि परिक्रमीला निश्चल न गवसल्यानं तो ही नम्रपणे आपण अजून साधक असल्याचं त्यांना सांगतो पण त्यांना वाटतं याला म्हणतात निरहंकारिता!

वास्तविकात अहंकार दूर होणं म्हणजे आपण आकार आहोत हा भास दूर होणं आहे पण परिक्रमीची विनम्रता हेच अहंकार दूर झाल्याचं लक्षण इतरांनी ठरवून टाकल्यानं परिक्रमी आणखीच विनम्र होतो! ही प्रक्रिया मग परिक्रमा न करू शकणाऱ्यांची खंत आणि परिक्रमीची विनम्रता यामुळे अव्याहत चालू राहते!

यात पुन्हा परिक्रमीच्या अनुभवांची भर पडते, ते एक आणखी बघण्या सारखं आहे!

श्री निसर्गदत्त महाराजांनी म्हटलंय की ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे’ आता ही गोष्ट एकदम अफलातून आहे. सगळे अनुभव जरी आपल्याला येत असले तरी आपण, किंवा निराकार, किंवा आपलं स्वरूप त्या अनुभवांनी अनाबाधित राहतं. अनुभव स्मृतीत राहतो पण प्रत्येक अनुभवानंतर आपण जसेच्या तसे राहतो.

हे प्रत्येक साधकाला लक्षात घेण्यासारखं आहे कारण अनुभव कोणताही असो तो आध्यात्मिक नसतो, अध्यात्म हा अनुभवणाऱ्याचा शोध आहे, अनुभवाचा नाही कारण अनुभव अनेक आहेत पण अनुभवणारा एक आहे!यामुळे सत्यप्राप्ती हा अनुभव नाही किंवा तो क्षणिक अनुभवासारखा वाटला तरी तो उलगडा आहे, अनुभव नाही!

आता परिक्रमे सारख्या खडतर साधनेत काय वाट्टेल ते अनुभव येतात आणि परिक्रमीचे अनुभव हीच त्याच्या साधनेची फलश्रुती असते. हे अनुभव मग इतरांना गूढ आणि आध्यात्मिक वाटायला लागतात आणि ते पुन्हा त्या अनुभवांच्या जोरावर परिक्रमीला श्रेष्ठत्व बहाल करतात. परिक्रमी पुन्हा विनम्र होतो कारण त्याचं लक्ष अनुभवांवर असल्यामुळे त्यालाही वाटत असतं की अजून बरेच अनुभव यायचेत, आता कुठे सुरुवात आहे! तो पुन्हा नवनवीन अनुभवांच्या शोधार्थ निघतो आणि अनुभवणाऱ्याला, किंवा स्वत:ला विसरतो, त्याला वाटतं की हा अनुभव आला की झालं आता सत्य गवसलंच आणि त्याच्या लक्षातच येत नाही की कोणताही अनुभव आपल्याला स्वत:प्रत आणणार नाही कारण आपण स्वत:पासून कधी दुरावलेलोच नाही!
_________________________________
असो, तर साधना अशी निवडा की ज्यातून फक्त भासाचं निराकरण होईल आणि भास काय आहे? तर आपण स्वत:ला निराकार असताना आकार समजतोय!

सगळ्यात सोपी साधना म्हणजे बोध आहे, जस्ट अंडरस्टॅंडींग, हा लेख नुसता वाचून देखील तुम्हाला बोध होईल कारण स्वत:ला शोधायला कशाला प्रयास हवा?

अष्टावक्र संहितेवर भाष्य करताना ओशोंनी म्हटलंय, ‘समझकी कमी साधनासे पूरी करनी पडती है, अन्यथा बोध काफी है! ’

_________________________________

या लेखाचा उद्देश खडतर किंवा वर्षानुवर्ष चालणारी साधना कशी स्वत:ला स्वत:ची भेट दुर्लभ करते हे सांगणं आहे. तिचा फायदा खडतर साधना करणार्‍यांना तर होईलच पण अशी साधना न करता येण्याची खंत असलेल्यांना ही होईल.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

Friday, May 20, 2011

४२. भोजन

विषयाला सुरुवात करण्यापूर्वी:

भोजन हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.

जे लिहिलंय तो माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यावर कोणताही विचार न करता, स्वतः प्रयोग करून न बघता काही मिनिटात प्रतिसाद देणं अयोग्य होईल. प्रयोग करून बघणार असाल तर कोणताही प्रश्न स्वागतार्ह आहे.
-----------------------------------------------------
आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले आनंद आहेत.
हे आनंद नैसर्गिक आहेत याचा अर्थ ते मिळवायला कोणत्याही प्रशिक्षणाची किंवा कौशल्य संपादनाची गरज नाही, ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत.

हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही, मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय आणि उत्सर्गाच्या आनंदाची 'आहार, विहार आणि निद्रा' ही परिमाणं आहेत. सरते शेवटी प्रणयासाठी लागणारी ऊर्जा या चारही प्रक्रियांवर अवलंबून आहे.
त्यामुळे भोजनाचा विचार हा (प्रणय वगळता) इतर तीन आनंदांशी संबंधीत आहे.
भोजनाचा आनंद दुर्लभ होण्याचं मुख्य कारण भूक लागल्यावर न जेवता वेळ झाली म्हणून जेवण्याची लावून घेतलेली सवय हे आहे. मुळात वेळ ही कल्पना आहे आणि भूक ही संवेदना आहे त्यामुळे भोजनासाठी भूक लागणं महत्त्वाचं आहे.

सर्व मानवी जीवनाची मुख्य दिशा अर्थ प्राप्ती असल्यामुळे भोजनाचा आधार भूके ऐवजी वेळ झालाय. भूक लागो न लागो सर्वांनी एकाच लंच टाइमला जेवणं यामुळे भोजन हा केवळ उपचार राहिला आहे त्यात आनंद वगैरे उरला असेल तर तो फक्त सणासुदीला!
भूकेची संवेदना प्रखर होण्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विहार आहे. काय वाटेल ते झालं तरी सकाळी सहाच्या आत उठून तीन प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत.

एक, पोटावर दाब येईल अशी योगासनं, यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वज्रासनात बसून कपाळ समोर जमिनीला टेकवणं आणि ते करत असताना हाताच्या मुठी क्रमाक्रमानं, नाभी जवळ, पोटाच्या मध्य भागी आणि मांडी वर ठेवल्या तर पोटाला उत्तम मसाज होऊन पचन क्रियेत कमालीची सुधारणा होते.

कपाळ जमिनीवर टेकवताना श्वास सोडणं आणि वर येताना श्वास घेणं या क्रिया इतक्या सहजतेनं होतात की त्यामुळे श्वसनाचा जोम वाढून श्वास पोटा पर्यंत पोहोचायला लागतो.
उत्तम श्वसन आणि पोटाची लवचीकता हे भूक, उत्सर्ग आणि सर्वांगीण शरीर स्वास्थ्य एकाच वेळी साधतात.

दोन, दोन्ही पायांची लवचीकता आणि स्नायूंचा जोम यावर शारीरिक चापल्य आणि उत्साह अवलंबून आहे त्या साठी दोन्ही हात आणि पायांच्या तळव्यांवर दहा बाय दहाच्या रूमला किमान दहा फेर्‍या मारणं (वॉकिंग ऑन फोर) हा उत्तम व्यायाम आहे.
तीन, सकाळी चहा घेण्या पूर्वी अंतरा अंतरानं किमान तीन ग्लास (सहाशे मिली) पाणी पिणं शरीराचं डिटॉक्सीकेशन करतं.

एकदा शरीरात पुरेशी लवचीकता आली की टेकडी चढणं किंवा टेबल टेनिस सारखा खेळ खेळणं ही संपूर्ण दिवसाची अत्यंत विधायक सुरुवात आहे.
-------------------------------------------
उत्तम उत्सर्गा साठी सर्वात महत्त्वाची पण संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट म्हणजे उत्छ्वासाचा जोम आहे. या विषयावर काढे आणि चूर्ण यांचं वर्णन करणारं अत्यंत निर्बुद्ध आणि दिशाभूल करणारं लेखन प्रकाशित झालंय आणि त्यावर तितक्याच सुमार दर्जाचे प्रतिसाद दिले गेलेत पण उत्सर्गाचं खरं रहस्य रेचकात नाही तर उत्छ्वासात आहे.

उत्तम उत्छ्वास तीन गोष्टी साधतो : एक, पोटाच्या स्नायूंची लवचीकता, दोन, जोमदार श्वासाची निर्मिती आणि तीन, अपरिग्रह! अपरिग्रह म्हणजे (उत्सर्गाच्या संदर्भात) शरीरावर असलेली आपली पकड सोडण्याची (किंवा ढिली करण्याची) चित्तदशा.
अपरिग्रह ही मनोदशा आपला मूड सकाळ पासूनच लाइट ठेवते आणि लाइट मूड उत्सर्गाच्या आनंदाची प्रचिती देतो.

जोमदार उत्छ्वासामुळे साधलेला अपरिग्रह मनातला मत्सर (जेलसी) हा दोष दूर करतो, मनाला विधायक आणि उमदं बनवतो.
----------------------------------------
उत्तम भूकेचं एकमेव लक्षण म्हणजे काय खावं ते आतून उमगणं आहे. भूकच तुम्हाला शरीराला काय हवंय ते सांगते. ही संवेदना रस स्वरूप असते म्हणजे : आंबट, गोड, तिखट या तीन प्रमुख आणि तुरट, खारट आणि कडू या दुय्यम रसांपैकी नक्की कोणता रस किती प्रमाणात सेवन करावा हे तुम्हाला कळतं.

सुरुवाती सुरुवातीला जरी आवेगानं जे समोर येईल ते खावं असं वाटलं तरी सकाळी लवकर उठण्याचा दिनक्रम जसजसा नियमित होत जाईल तशी रस संवेदना प्रगल्भ होत जाईल आणि नेमका आहार घेण्या कडे कल होत जाईल.

जेवण हे नेहमी रस परिपोष करणारं हवं. जेवण रस परिपोषक आहे की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जेवताना साधलेली तन्मयता (तुम्ही जेवताना बोलूच शकत नाही), ते सुरू राहावं अशी चित्तदशा आणि नंतर येणारी तृप्ती आणि कृतज्ञता!

भूकेनं जेवताना येणारा एक अफलातून अनुभव म्हणजे जेवण किती ही रसपूर्ण असलं तरी केव्हा थांबावं याची होणारी जाणीव. ही जाणीव एका थ्रेशोल्ड पॉंईंट सारखी असते, तुम्ही तिच्या कडे सहज दुर्लक्ष करू शकता पण एकदा त्या पॉंईंटला थांबायची मजा कळली की तुम्हाला कोणतंही डाएट करावं लागत नाही. ती जाणीव हाच सर्वोत्तम डाएट पॉंईंट आहे.
------------------------------------------------
संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे त्यामुळे उत्तम भोजन, उत्तम शरीर स्वास्थ्य, उत्तम निद्रा, उत्तम उत्सर्ग आणि उत्तम ऊर्जा अशी साखळी आहे.

आयुर्वेदाचं सूत्रंच असं आहे की योग्य आहार कोणताही शारीरिक दोष दूर करतो त्यामुळे केव्हा खाऊ नये (उपवास) आणि नक्की कोणता आणि किती आहार घ्यावा हे एकदा साधलं की कोणत्याही औषधाची जरूर नाही, अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे.
--------------------------------------------------
माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते', तुम्हाला तो पदार्थ, ती रेसिपी 'दिसते'.

मला सुरुवातीला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण मग नंतर लक्षात आलं की ही निसर्गाची अंतर्निहित योजनाच आहे. माणूस सोडला तर सर्व सजीव सृष्टी आपलं अन्न याच पद्धतीनं शोधते कारण निसर्गाशी एकरूप असल्यानं त्यांना एकाच वेळी अन्न आणि ते कुठे आहे ती दिशा यांचा बोध होतो.

प्रगल्भ भुकेचा अत्यंत सहज आणि आपसूकपणे येणारा दुसरा पैलू म्हणजे शरीराला आवश्यक असणार्‍या अन्नाची कमीत कमी प्रयास आणि वेळेत होणारी उपलब्धता! याचं ही कारण तितकंच नैसर्गिक आहे, निसर्गच भूक निर्माण करत असल्यानं तिच्या तृप्तीची योजना निसर्ग स्वयेच करत असतो.

भूक, भोजन आणि उत्सर्ग या तीन्ही प्रक्रिया निसर्गाच्या अंगभूत येजनेचा (कॉस्मिक इंटेलिजन्स) भाग असल्यामुळे एकदा भूक हे परिमाण साधलं की आपण निसर्गाच्या बुद्धीमत्तेशी संलग्न होतो आणि मग इतर दोन प्रक्रिया सहजपणे घडतात.

भोजनाचा, इतर सजीव सृष्टीला जाणीवेची प्रगल्भता नसल्यामुळे न गवसू शकणारा, पण मानवाला आनंदित करणारा तिसरा पैलू म्हणजे कृतज्ञता आहे. भूक, तिच्या मुळे होणारं अन्नाचं दर्शन ( द व्हिज्युअल साईट ऑफ फूड), रस परिपोष करणारं भोजन आणि त्यातून निर्माण होणारी तृप्ती यानी आपण इतके भारून जातो की अन्नाला ब्रह्म का म्हटलंय ते कळतं!

भोजन केवळ एक नित्यक्रम न राहता उत्सव होतं आणि रोजच्या जगण्याला आनंदाचं एक नवं परिमाण उपलब्ध होतं.

Tuesday, February 01, 2011

१४. न्यूनगंड

ओशोंनी असं म्हंटलयं की माणसानी दोन गोष्टी फार दडवून ठेवल्या आहेत, एक म्हणजे प्रणय आणि दुसरी मृत्यु! पहिली गोष्ट जीवनाचं प्रवेशद्वार आहे आणि दुसरी निर्गमनाचं; या दोन द्वारांमध्ये जीवनाचा प्रवाह आहे; जर तुम्ही याच गोष्टींकडे डोळेझाक केली तर तुम्हाला जीवन काय कळणार? मला वाटतं या पेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट माणसानी दडवली आहे आणि ती म्हणजे न्यूनगंड!
न्यूनगंड म्हणजे रूढ अर्थानी जे समजले जाते ते स्वतःला कमी लेखणे किंवा अपयशी मानणे असे नव्हे, तर तुमची स्वतः विषयी असलेली कल्पना, मग तुम्ही स्वतःला यशस्वी समजता, सर्वोच्य समजता की अपयशी समजता यानी काहीही फरक पडत नाही. तुमची स्वतः विषयीची कल्पना आणि तुमचे स्वरूप यातली तफावत हे जीवनातल्या तणावाचं मुख्य कारण आहे आणि तेच आपण दडवून ठेवलयं!
तुम्ही बघा कोणीही स्वतःला न्यूनगंड आहे असे मानत नाही तर प्रत्येक जण आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण असा आत्मविश्वास दाखवणारा माणूसच जगात यशस्वी होताना दिसतो. स्वतःला अयशस्वी समजणारा माणूस खंतावलेला असतो पण तो अशा आत्मविश्वास दाखवणाऱ्याशी एकतर स्वतःला जोडून तरी देतो किंवा त्यानी यशस्वी होण्यासाठी काय केले हे बघून स्वतःच्या जीवनाची दिशा ठरवत असतो. थोडक्यात काय तर आपण अस्वस्थ आहोत हे मानायला कुणीच तयार नसतो याला मी न्यूनगंड लपवणे म्हणतो.
वास्तविकतः न्यूनगंड किंवा हे मानसिक अस्वास्थ्य ही, स्वरूप न कळल्यामुळे अतिशय ओघानी आणि स्वाभाविकपणे झालेली प्रत्येकाची मनोदशा असते आणि विधायकपणे पाहिले तर तीच तुमची तुम्हाला स्वतःप्रत नेणारी ओढ असते पण ती दडवल्यामुळे अस्वास्थ्य वाढत जाते आणि मग पेच काही केल्या सुटत नाही.
हा न्यूनगंड, ही अस्वस्थता, अध्यात्माची सुरुवात आहे आणि त्याचे निराकरण ही अध्यात्माची फलश्रुती आहे.
स्वतःचे स्वरूप गवसण्याला बुद्धाने म्हणूनच 'अल्टिमेट अन्फोल्डमेंट ऑफ सेल्फ' असं म्हंटलं आहे. म्हणजे आता दडवण्यासारखे काहीही राहिले नाही!
माणूस ही अस्वस्थता दडवण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत असतो आणि त्याचा सगळ्यात जवळचा आधार कार्यमग्नता हा असतो. गरज असो वा नसो सतत काही तरी करत राहणे! यात अर्थप्राप्ती हे प्रमुख आणि समाजमान्य व्यवधान असले तरी सतत टि व्ही बघणे, नेट सर्फिंग, चॅटिंग, निष्कारण माहिती गोळा करणे, अत्यंत दूरच्या आणि झंझावाती सहली काढणे, हालापेष्टानी ग्रस्त अशा परिक्रमा करणे यापासून ते वरवर निरूपद्रवी वाटणारे पण सतत गुंतवून ठेवणारे नामस्मरण किंवा जप करणे असे अनेक प्रकार येतात.
याचे समीकरण असे आहे की जेवढी अस्वस्थता अधिक तेवढे ध्येय भव्य! याचे (थोडेसे लांबचे वाटेल पण) आगदी उघड उदाहरण म्हणजे हिटलर, स्वतःची अस्वस्थता दडवण्यासाठी त्यानी सगळ्या जगाला कामाला लावलं. अर्थात जो पर्यंत हे लोक यशाच्या शिखरावर असतात तोपर्यंत यांच्या विरूद्ध ब्र काढण्याची कुणाची हिम्मत नसते एवढच नाही तर आपल्या हातून असे काही तरी संस्मरणिय व्हायला हवे होते अशी मनोमन खंतही सगळ्याना वाटत असते. एकदा का यांचा बहर ओसरला की यांनी केलेल्या नुकसानाची कल्पना येते पण माणूस शिकत नाही तो नवीन रोल मॉडेल शोधायला लागतो!
या सततच्या अस्वास्थ्याची परिणीती आत्महत्येत होते. सध्या हा विषय जोरदार चर्चेत आहे पण जो पर्यंत या अस्वास्थ्याची चर्चा होत नाही तो पर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. हिटलर पासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे हे अस्वास्थ्य! या अस्वास्थ्याला एकहार्ट 'द बॅकग्राउंड स्कोअर ऑफ लाईफ' म्हणतो (द न्यू अर्थ). स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवणे हीच एक नामी शक्कल माणसाने या अस्वास्थ्याला वाट मोकळी करून देण्यासाठी निवडली आहे पण जरा का उसंत मिळाली की परत हे अस्वास्थ्य जाणिवेत प्रवेश करू लागते. त्यामुळे शेक्स्पिअरनि जीवनाला : ' अ फ्युटाइल स्टोरी ऑफ फ्युरी अँड ककॉफनी कंटेनिंग नथींग' असे म्हंटले आहे.
आत्महत्या सोडता या अस्वास्थ्याचे निकडीने निराकारण करायची गरज फक्त दोनच परिस्थितीत वाटू शकते: एक : अत्यंत संपन्न अवस्था आल्यावर किंवा दोन : अत्यंत बिकट परिस्थितीत सापडल्यावर; आणि तुमचे स्वतःवर प्रेम असेल तर इथेच अध्यात्माची सुरुवात होते! सामान्यतः माणसाला अध्यात्माची गरज न वाटण्याचे कारण म्हणजे त्याच्या जीवनात अशी परिस्थीती उद्भवली नसते हे आहे.
अत्यंत संपन्न माणसाच्या लक्षात येते की जीवन ही पुनरावृत्ती आहे आणि त्याची परिणीती मृत्युत होणार आहे मग तो अत्यंत निकडीनी पेच सोडवायला लागतो, हे बुद्धाच्या जीवनात अंत्ययात्रा पाहून घडलं. दुसरी गोष्ट अर्जुनाच्या जीवनात घडली, प्रसंग इतका बिकट की जिंकलो तरी हार आणि हरलो तर मृत्यु!
या अस्वस्थतेवर एकमेव उपाय म्हणजे आपण स्वतः विषयी केलेल्या कल्पनेचं निराकरण हा आहे. आपण आकार नसून निराकार आहोत हे कळता क्षणी तुम्ही प्रसंगा बाहेर होता मग तो प्रसंग कोणताही असो! तुमच्या लक्षात येतं की प्रसंग आहे पण आपण, प्रसंग ज्यात घडतो आहे त्याच्या आत-बाहेर असलेली जागा आहोत, ज्याच्यावर प्रसंग बेतला आहे ती व्यक्ती नाही; तुम्ही गर्तेतून बाहेर येता! त्यामुळे अध्यात्मात जीवनाला भवसागर म्हंटले आहे, तुम्ही जो पर्यंत स्वतःला व्यक्ती समजता तोपर्यंत तुम्ही कोणीही असा तुमची नांव गर्तेत आहे आणि ज्या क्षणी तुम्हाला निराकाराचा बोध होतो त्या क्षणी तुम्ही सागर होता, तुम्ही भवसागर पार करून जाता, सारी अस्वस्थता दूर होते, हे जीवन उत्सव होते.
"तुम्ही आता ईशावास्य उपनिषदातला हा श्लोक बघा, म्हणजे तुम्हाला ते उपनिषद लिहीणाऱ्या ऋषीच्या बुद्धीमत्तेची कमाल लक्षात येईल. या श्लोकाच्या नुस्त्या उच्चारणाने सारा न्यूनगंड दूर होतो, तुम्ही व्यक्तीमत्वातून मोकळे होता आणि निराकाराच्या पूर्णतेशी संलग्न होऊन शांत होता. काय कमालीचा श्लोक आहे बघा:
पूर्णं इदं (म्हणजे निराकार पूर्ण आहे), पूर्णं अदाः (मी देखील, स्वतःला देह समजत असलो तरी, पूर्ण आहे), पूर्णात पूर्ण उदिच्चते (कारण पूर्णातून पूर्णच निर्माण होते)
पूर्णात पूर्ण अदायस्य (म्हणजे तुम्ही पूर्णात जेंव्हा, देह म्हणून जरी, विलीन झालात), पूर्णं-एव-अवशिश्यते (तरी पूर्ण हे पूर्णच राहते)
ॐ शांतिः शांतिः शांतिः

२७. पैसा

श्वासात अडकला पैसा,पैशात अडकला श्वास;श्वासाने सार्थक पैसा कीपैशाने चाले श्वास?
स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारला आहे. स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोमन धारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे मी लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर जे लिहिलंय त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा.
तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्याकडे आचरणात आणता येईल असं उत्तर आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. म्हणजे पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळू शकेल पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.
तर पहिली गोष्ट, स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे एक कारण आहे ते असं की प्रत्येकानं स्वतःकडे असलेल्या पैशाचं ‘रेव्हेन्यू आणि कॅपिटल’ असं विभाजन केलं आहे. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!
कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका ‘भांडवली पैसा’ हवा की त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्म असंच चालू राहील!
मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार घटना आपसूक घडतात त्या अशा:
एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा ‘वापरणं’ म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
तीन, तुमच्या वागण्यात एक बिनधास्तपणा सहजच येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात सक्रिय न होऊ देता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात यायला लागतं. पैसा ही कल्पना आहे, आपण सार्थक आहोत, आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.
इथे मला अजून एक गैरसमज दूर करावा असं वाटतं, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झाली आहे. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
हा गैरसमज दूर झाल्यावर पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!
मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!
एक दिवस तुम्ही ही माझ्यासारखी जीवनाची प्रायॉरिटी पूर्णपणे बदलू शकाल, तीस सप्टेंबर ही इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची अंतिम तारीख असताना जे कोणताही सी ए करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल, केवळ मजा वाटते म्हणून इथे लिहू शकाल!
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी त्याला म्हणालो अरे असं जगून बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भीतीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

३४. जागृती

झोप ही मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे. झोपेची आध्यात्मिक उकल हा अनेक रंगी अध्यात्माच्या एक अनोखा रंग आहे.
सत्य समजलेल्या व्यक्तीला ‘जागृत पुरुष’ म्हणतात कारण त्याला झोपेच्या या पैलूचा उलगडा झालेला असतो. झोप हा अध्यात्माचा एकदम काव्यात्मक पैलू आहे. आज झोपे विषयी लिहावंस वाटतंय.
अस्तित्वाची एकरूपता ही ऑरगॅनिक युनिटी आहे. मेकॅनिकल युनिटी आणि ऑरगॅनिक युनीटीमध्ये फरक आहे. कार ही मेकॅनिकल युनिटी आहे पण शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे. ऑरगॅनिक युनीटीत सगळे पार्टस् जरी मेकॅनिकल युनिटी सारखे एकमेकाशी निगडित असले तरी ते एकाच मूलद्रव्या पासून बनलेले असतात. मेकॅनिकल युनीटीत तशी अशी अट नाही. शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे कारण सगळं शरीर हे अन्न या एकाच मूलद्रव्याचं रूपांतरण आहे.
आता अस्तित्व ही ऑरगॅनिक युनिटी आहे म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. अस्तित्वातलं सगळं प्रकटीकरण जाणीव या एका मूलद्रव्याचं रूपांतरण आहे. जाणीवेलाच निराकार किंवा शून्य असंही म्हटलंय.
इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर पुढे मजा आहे. झोप ही जाणीव या अस्तित्वाच्या मूलतत्त्वाला रूपांतरित करणारी प्रक्रिया आहे. सगळ्या प्रकट जगाच्या निर्मितीच कारण झोप आहे!
अगदी सरळ सरळ सांगायचं झालं तर माणूस ही जाणीवेला आलेली जाग आहे आणि दगड ही जाणीवेच्या झोपेची अंतिम अवस्था आहे. देवाच्या मूर्ती दगडाच्या बनवण्याचं कारण टिकाऊपणा नसून प्रतिकात्मकता आहे. दगड हे निम्नतम रूप, माणूस ही मधली अवस्था आणि सिद्ध पुरुष ही जाणीवेची अंतिम अवस्था असा क्रम आहे. जागृत पुरुष हे जाणीवेचं अंतिम रूप आहे. संपूर्ण जागी झालेली जाणीव म्हणजे अनंत मोकळं आकाश, मुक्तता, अनंतता आणि गाढ झोपलेली जाणीव म्हणजे दगड!
जाणीवेच्या रूपांतरणाची प्रक्रिया अत्यंत लोभस आहे. जाणीवेचं रूपांतरण म्हणजे शून्याचा आकार होणं, निराकाराचा आकार होणं! काही नाही त्यांनी रूप धरण करणं! अस्तित्वाला त्यामुळे रहस्य म्हटलंय आणि जादूचं माणसाला खोल कुठे तरी आकर्षण आहे. हे अस्तित्व जादूमय आहे!
या जादूगिरीला आणखी एक रम्य पैलू आहे, जाणीव या रूपांतरणात जशीच्या तशी राहते! जाणीव रूप धारण करते पण स्वतः निराकारच राहते. ते आरशा सारखं आहे, आरसा छबी धरण करतो पण स्वतः जसाचा तसा राहतो. झेन संप्रदायात जाणीवेला आरशाची उपमा दिलीय.
रोजची झोप हे जाणीवेचं नेणीवेत रुपांतर आहे म्हणजे आपण कळण्याकडून न कळण्याकडे जातो. आपण बिछान्यावर आहोत, डोळे मिटलेत, सगळं ऐकू येतंय, जाणवतंय, विचारांची मालिका हळूहळू इल्लॉजिकल होते आणि मग एकदम काही कळेनासं होतं. या कळण्याच्या क्षमतेचं न कळण्यात रुपांतर झालं तरी जाणीव, म्हणजे थोडक्यात आपण, जसेच्या तसे राहतो कारण जाणीव कधीही स्वभाव बदलत नाही. त्यामुळे कितीही गाढ झोप लागली आणि काहीही कळेनासं झालं तरी झोप उघडल्यावर आपल्याला गाढ झोप लागली होती आणि काहीही कळत नव्हतं हे कळतंच!
जागृत पुरुषात आणि इतरे जनात फक्त इतकाच फरक असतो, या कळण्याकडून न कळण्याच्या प्रदेशात जाताना तो स्वतःला विसरत नाही, तो या रूपांतरणात जसाच्या तसा राहतो. सामान्य माणूस सांसारिक विवंचनांनी इतका दमलेला असतो की तो स्वतःला विसरून जातो आणि त्याला आपण आहोत ही आठवण जाग आल्यावर येते.
कधी तरी हा प्रयोग करून पाहा ‘मी आहे’ हे भान झोपताना कायम ठेवायचा प्रयत्न करा, स्वतःला विसरू नका, एक दिवस असा येईल की झोप तुम्हाला कळण्याच्या क्षेत्रातून न कळण्याच्या क्षेत्राकडे नेऊ शकणार नाही. तुम्ही सदैव कळण्याच्या क्षेत्रातच राहाल, शरीर झोपेल पण तुम्ही जागे असाल!
या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमीचा असा अर्थ आहे.