Tuesday, February 01, 2011

१४. न्यूनगंड

ओशोंनी असं म्हंटलयं की माणसानी दोन गोष्टी फार दडवून ठेवल्या आहेत, एक म्हणजे प्रणय आणि दुसरी मृत्यु! पहिली गोष्ट जीवनाचं प्रवेशद्वार आहे आणि दुसरी निर्गमनाचं; या दोन द्वारांमध्ये जीवनाचा प्रवाह आहे; जर तुम्ही याच गोष्टींकडे डोळेझाक केली तर तुम्हाला जीवन काय कळणार? मला वाटतं या पेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट माणसानी दडवली आहे आणि ती म्हणजे न्यूनगंड!
न्यूनगंड म्हणजे रूढ अर्थानी जे समजले जाते ते स्वतःला कमी लेखणे किंवा अपयशी मानणे असे नव्हे, तर तुमची स्वतः विषयी असलेली कल्पना, मग तुम्ही स्वतःला यशस्वी समजता, सर्वोच्य समजता की अपयशी समजता यानी काहीही फरक पडत नाही. तुमची स्वतः विषयीची कल्पना आणि तुमचे स्वरूप यातली तफावत हे जीवनातल्या तणावाचं मुख्य कारण आहे आणि तेच आपण दडवून ठेवलयं!
तुम्ही बघा कोणीही स्वतःला न्यूनगंड आहे असे मानत नाही तर प्रत्येक जण आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण असा आत्मविश्वास दाखवणारा माणूसच जगात यशस्वी होताना दिसतो. स्वतःला अयशस्वी समजणारा माणूस खंतावलेला असतो पण तो अशा आत्मविश्वास दाखवणाऱ्याशी एकतर स्वतःला जोडून तरी देतो किंवा त्यानी यशस्वी होण्यासाठी काय केले हे बघून स्वतःच्या जीवनाची दिशा ठरवत असतो. थोडक्यात काय तर आपण अस्वस्थ आहोत हे मानायला कुणीच तयार नसतो याला मी न्यूनगंड लपवणे म्हणतो.
वास्तविकतः न्यूनगंड किंवा हे मानसिक अस्वास्थ्य ही, स्वरूप न कळल्यामुळे अतिशय ओघानी आणि स्वाभाविकपणे झालेली प्रत्येकाची मनोदशा असते आणि विधायकपणे पाहिले तर तीच तुमची तुम्हाला स्वतःप्रत नेणारी ओढ असते पण ती दडवल्यामुळे अस्वास्थ्य वाढत जाते आणि मग पेच काही केल्या सुटत नाही.
हा न्यूनगंड, ही अस्वस्थता, अध्यात्माची सुरुवात आहे आणि त्याचे निराकरण ही अध्यात्माची फलश्रुती आहे.
स्वतःचे स्वरूप गवसण्याला बुद्धाने म्हणूनच 'अल्टिमेट अन्फोल्डमेंट ऑफ सेल्फ' असं म्हंटलं आहे. म्हणजे आता दडवण्यासारखे काहीही राहिले नाही!
माणूस ही अस्वस्थता दडवण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत असतो आणि त्याचा सगळ्यात जवळचा आधार कार्यमग्नता हा असतो. गरज असो वा नसो सतत काही तरी करत राहणे! यात अर्थप्राप्ती हे प्रमुख आणि समाजमान्य व्यवधान असले तरी सतत टि व्ही बघणे, नेट सर्फिंग, चॅटिंग, निष्कारण माहिती गोळा करणे, अत्यंत दूरच्या आणि झंझावाती सहली काढणे, हालापेष्टानी ग्रस्त अशा परिक्रमा करणे यापासून ते वरवर निरूपद्रवी वाटणारे पण सतत गुंतवून ठेवणारे नामस्मरण किंवा जप करणे असे अनेक प्रकार येतात.
याचे समीकरण असे आहे की जेवढी अस्वस्थता अधिक तेवढे ध्येय भव्य! याचे (थोडेसे लांबचे वाटेल पण) आगदी उघड उदाहरण म्हणजे हिटलर, स्वतःची अस्वस्थता दडवण्यासाठी त्यानी सगळ्या जगाला कामाला लावलं. अर्थात जो पर्यंत हे लोक यशाच्या शिखरावर असतात तोपर्यंत यांच्या विरूद्ध ब्र काढण्याची कुणाची हिम्मत नसते एवढच नाही तर आपल्या हातून असे काही तरी संस्मरणिय व्हायला हवे होते अशी मनोमन खंतही सगळ्याना वाटत असते. एकदा का यांचा बहर ओसरला की यांनी केलेल्या नुकसानाची कल्पना येते पण माणूस शिकत नाही तो नवीन रोल मॉडेल शोधायला लागतो!
या सततच्या अस्वास्थ्याची परिणीती आत्महत्येत होते. सध्या हा विषय जोरदार चर्चेत आहे पण जो पर्यंत या अस्वास्थ्याची चर्चा होत नाही तो पर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. हिटलर पासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे हे अस्वास्थ्य! या अस्वास्थ्याला एकहार्ट 'द बॅकग्राउंड स्कोअर ऑफ लाईफ' म्हणतो (द न्यू अर्थ). स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवणे हीच एक नामी शक्कल माणसाने या अस्वास्थ्याला वाट मोकळी करून देण्यासाठी निवडली आहे पण जरा का उसंत मिळाली की परत हे अस्वास्थ्य जाणिवेत प्रवेश करू लागते. त्यामुळे शेक्स्पिअरनि जीवनाला : ' अ फ्युटाइल स्टोरी ऑफ फ्युरी अँड ककॉफनी कंटेनिंग नथींग' असे म्हंटले आहे.
आत्महत्या सोडता या अस्वास्थ्याचे निकडीने निराकारण करायची गरज फक्त दोनच परिस्थितीत वाटू शकते: एक : अत्यंत संपन्न अवस्था आल्यावर किंवा दोन : अत्यंत बिकट परिस्थितीत सापडल्यावर; आणि तुमचे स्वतःवर प्रेम असेल तर इथेच अध्यात्माची सुरुवात होते! सामान्यतः माणसाला अध्यात्माची गरज न वाटण्याचे कारण म्हणजे त्याच्या जीवनात अशी परिस्थीती उद्भवली नसते हे आहे.
अत्यंत संपन्न माणसाच्या लक्षात येते की जीवन ही पुनरावृत्ती आहे आणि त्याची परिणीती मृत्युत होणार आहे मग तो अत्यंत निकडीनी पेच सोडवायला लागतो, हे बुद्धाच्या जीवनात अंत्ययात्रा पाहून घडलं. दुसरी गोष्ट अर्जुनाच्या जीवनात घडली, प्रसंग इतका बिकट की जिंकलो तरी हार आणि हरलो तर मृत्यु!
या अस्वस्थतेवर एकमेव उपाय म्हणजे आपण स्वतः विषयी केलेल्या कल्पनेचं निराकरण हा आहे. आपण आकार नसून निराकार आहोत हे कळता क्षणी तुम्ही प्रसंगा बाहेर होता मग तो प्रसंग कोणताही असो! तुमच्या लक्षात येतं की प्रसंग आहे पण आपण, प्रसंग ज्यात घडतो आहे त्याच्या आत-बाहेर असलेली जागा आहोत, ज्याच्यावर प्रसंग बेतला आहे ती व्यक्ती नाही; तुम्ही गर्तेतून बाहेर येता! त्यामुळे अध्यात्मात जीवनाला भवसागर म्हंटले आहे, तुम्ही जो पर्यंत स्वतःला व्यक्ती समजता तोपर्यंत तुम्ही कोणीही असा तुमची नांव गर्तेत आहे आणि ज्या क्षणी तुम्हाला निराकाराचा बोध होतो त्या क्षणी तुम्ही सागर होता, तुम्ही भवसागर पार करून जाता, सारी अस्वस्थता दूर होते, हे जीवन उत्सव होते.
"तुम्ही आता ईशावास्य उपनिषदातला हा श्लोक बघा, म्हणजे तुम्हाला ते उपनिषद लिहीणाऱ्या ऋषीच्या बुद्धीमत्तेची कमाल लक्षात येईल. या श्लोकाच्या नुस्त्या उच्चारणाने सारा न्यूनगंड दूर होतो, तुम्ही व्यक्तीमत्वातून मोकळे होता आणि निराकाराच्या पूर्णतेशी संलग्न होऊन शांत होता. काय कमालीचा श्लोक आहे बघा:
पूर्णं इदं (म्हणजे निराकार पूर्ण आहे), पूर्णं अदाः (मी देखील, स्वतःला देह समजत असलो तरी, पूर्ण आहे), पूर्णात पूर्ण उदिच्चते (कारण पूर्णातून पूर्णच निर्माण होते)
पूर्णात पूर्ण अदायस्य (म्हणजे तुम्ही पूर्णात जेंव्हा, देह म्हणून जरी, विलीन झालात), पूर्णं-एव-अवशिश्यते (तरी पूर्ण हे पूर्णच राहते)
ॐ शांतिः शांतिः शांतिः

No comments:

Post a Comment