Tuesday, February 01, 2011

२७. पैसा

श्वासात अडकला पैसा,पैशात अडकला श्वास;श्वासाने सार्थक पैसा कीपैशाने चाले श्वास?
स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारला आहे. स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोमन धारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे मी लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर जे लिहिलंय त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा.
तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्याकडे आचरणात आणता येईल असं उत्तर आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. म्हणजे पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळू शकेल पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.
तर पहिली गोष्ट, स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे एक कारण आहे ते असं की प्रत्येकानं स्वतःकडे असलेल्या पैशाचं ‘रेव्हेन्यू आणि कॅपिटल’ असं विभाजन केलं आहे. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!
कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका ‘भांडवली पैसा’ हवा की त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्म असंच चालू राहील!
मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार घटना आपसूक घडतात त्या अशा:
एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा ‘वापरणं’ म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
तीन, तुमच्या वागण्यात एक बिनधास्तपणा सहजच येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात सक्रिय न होऊ देता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात यायला लागतं. पैसा ही कल्पना आहे, आपण सार्थक आहोत, आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.
इथे मला अजून एक गैरसमज दूर करावा असं वाटतं, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झाली आहे. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
हा गैरसमज दूर झाल्यावर पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!
मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!
एक दिवस तुम्ही ही माझ्यासारखी जीवनाची प्रायॉरिटी पूर्णपणे बदलू शकाल, तीस सप्टेंबर ही इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची अंतिम तारीख असताना जे कोणताही सी ए करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल, केवळ मजा वाटते म्हणून इथे लिहू शकाल!
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी त्याला म्हणालो अरे असं जगून बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भीतीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

No comments:

Post a Comment